केंद्र आणि राज्य शासन एकत्र आल्यास कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या भूमीचा वाद सोडवता येईल ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

  • कोरोनाचा प्रादुर्भाव अल्प झाल्यासच शाळा उघडता येतील !

  • पुढील ६ मास मास्क बंधनकारक !

  • महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी आवश्यक नाही !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, २० डिसेंबर (वार्ता.) – जनतेने आपल्याला ‘तुझे-माझे’ करण्यासाठी नव्हे, तर राज्याच्या हितासाठी निवडून दिले आहे. कांजूरमार्ग येथील मेट्रोच्या जमिनीसाठी केंद्र आणि राज्य शासन वाद करत राहिले, तर हा वाद सोडवणार कोण ? सत्ता कायम रहाणार नाही. ही जागा जनतेची आहे. विरोधकांनी हा प्रश्‍न सोडवावा. मी तुम्हाला त्याचे श्रेय देण्यास सिद्ध आहे. हा जनतेच्या हिताचा प्रश्‍न आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य एकत्र येऊन हा वाद सोडवता येईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. २० डिसेंबर या दिवशी उद्धव ठाकरे यांनी जनतेशी ‘ऑनलाईन’ संवाद साधतांना वरील वक्तव्य केले.

या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘कांजूरमार्ग येथील भूमीच्या मालकी हक्कावरून मिठागरीचे आयुक्त न्यायालयात गेले आहेत. केंद्रशासनाच्या ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पासाठी वांद्रे-कुर्ला येथील जगातील सर्वांत महागडी समजली जाणारी जागा प्रस्तावित करण्यात आली आहे; मात्र त्यासाठी आम्ही अडवणूक केली नाही. त्यामुळे कांजूरमार्ग येथील भूमी केंद्र किंवा राज्य शासन यांची असली, तरी हा वाद सोडवता येईल.’

(सौजन्य : Mumbai Tak)

ते पुढे म्हणाले की, काही जण मला अहंकारी म्हणतात; पण मुंबई आणि महाराष्ट्र यांच्या हितासाठी मी अहंकारी आहे. ‘मेट्रो ३’च्या कारशेडसाठी आरे येथील ३० हेक्टर भूमी प्रस्तावित करण्यात आली होती; मात्र त्यामध्ये मेट्रोच्या गाड्या ‘पार्क’ करण्यासाठी जागा प्रस्तावित करण्यात आली नव्हती, हे धक्कादायक होते. त्यामुळे भविष्यात मेट्रोची व्याप्ती वाढून आरे येथील जागा न्यून पडली असती. त्यामुळे भविष्यात जंगल तोडावे लागले असते. आता यासाठी आपण आरेच्या एका टोकाला जागा प्रस्तावित केली आहे. याउलट कांजूरमार्ग येथील प्रदेश ओसाड आहे. तेथे मेट्रो ३, ४ आणि ६ यांची कारशेड होणार आहे. या तिन्ही कारशेडचे डेपो एकत्र असतील. तसेच या ठिकाणी होणार्‍या जंक्शनमधून थेट अंबरनाथला गाडी जाणार आहे. त्यामुळे केवळ तात्पुरता विचार न करता पुढील ५० वर्षांच्या दृष्टीने जे जनतेच्या हिताचे आहे, ते मी करणार आहे.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले,

१. कुटुंबप्रमुख म्हणून नागरिकांना सावध रहायला सांगणे माझे कर्तव्य आहे. कोरोनाच्या परिस्थितीवर अद्यापही आपण पूर्ण नियंत्रण मिळवलेले नाही. त्यामुळे पुढील ६ मास तरी मास्क घालणे बंधनकारक आहे.

२. येत्या नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर युरोपमध्ये पुन्हा कडक दळणवळण बंदी लागू करण्यात आली आहे. तेथे कोरोनाच्या विषाणूचा ‘आर् नॉट’ या प्रकाराचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढत आहे. त्यांच्या अनुभवातून आपण शिकायला हवे.

३. अद्यापही आपण धोक्याच्या वळणावर आहोत. महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्याची आवश्यकता नाही; मात्र आजारापेक्षा काळजी घेतलेली बरी. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा उपयोग करायलाच हवा.

४. कोरोनामुळे आर्थिक चणचण आहे; मात्र आपण रडत बसलेलो नाही. दळणवळण बंदीच्या काळातही महाराष्ट्रात आपण सहस्रो कोटी रुपयांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय करार केले आहेत. जून आणि जुलै मासात केलेल्या करारांमध्ये प्रगती असून कागदोपत्री व्यवहार पूर्ण झाले आहेत.

५. परदेशात शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अल्प झाला, तरच शाळा उघडता येतील.

६. महाराष्ट्र ही गड-किल्ले, साधू-संत आणि देवता यांची भूमी आहे. या भूमीला संस्कृतीचा वारसा आहे. त्यांचे प्रतीक असलेली मंदिरे स्वच्छ रहायला हवीत. मंदिरात गेल्यावर पवित्र भावना निर्माण व्हायला हवी. यासाठी प्राचीन मंदिरांच्या डागडुजीसाठी राज्यशासन योजना चालू करत आहे.

७. काही जण माझ्यावर ‘मी विकासाच्या आड येतो’, अशी टीका करतात; पण राज्यात विकासकामे चालू आहेत. मी स्वत: विकासकामांची पहाणी करत आहे. घाईघाईने काही केले म्हणजे विकास होतो, असे नाही. आपणाला तात्पुरता नको, तर भविष्याचा विचार करून विकास करायचा आहे.

८. जो वाद चालू आहे, तो जनतेच्या हिताचा नाही. हा माझ्या किंवा विरोधी पक्ष यांच्या अहंकाराचा विषय नाही. पंतप्रधान स्वत:ला जनतेचा सेवक समजतात, मग आपणही जनतेचे सेवकच आहोत.

९. मी आयुष्यात खोटे बोललो नाही आणि बोलणारही नाही. जनतेच्या विश्‍वासाला तडा जाईल, असे करणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्यावर वैयक्तिक कारण ठेवता येत नाही. जे महाराष्ट्राच्या हिताचे आहे, तेच मी करणार आहे.


‘मेट्रो ३’च्या कारशेडचा प्रश्‍न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस

मुंबई, २० डिसेंबर (वार्ता.) – मेट्रोसाठी बोगदे खोदण्याचे काम आरेची जागा डोळ्यांपुढे ठेवून करण्यात आले आहे. जवळजवळ ८० टक्के काम पूर्ण होत आहे. आता दुसरी कोणतीही जागा निवडली, तरी पैसा आणि वेळ दोन्ही वाया जाणार. मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे. त्यांना आणखी त्रास नको. हा प्रश्‍न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका, ही हात जोडून विनंती आहे, असे ‘ट्वीट’ विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. २० डिसेंबर या दिवशी जनतेशी ‘ऑनलाईन’ संवाद साधतांना मुख्यमंत्र्यांनी मेट्रो कारशेडसाठी आरेऐवजी कांजुरमार्ग येथील जागा योग्य असल्याचे सांगून त्याविषयी दाखले दिले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हे ‘ट्वीट’ केले.

यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे, ‘‘मुख्यमंत्र्यांच्या ३० मिनिटांच्या संवादातून एक प्रकर्षाने जाणवते की, त्यांनी अद्यापही महाविकास आघाडीच्या उच्चाधिकार समितीचा अहवाल पूर्णत: वाचलेला नाही. एकदा हा अहवाल सार्वजनिक करा. प्रत्यक्ष स्थिती, भूमिका आणि वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेपुढे येईल. या समितीने सांगितले की, कांजूरमार्ग येथे कारशेड नेल्यास किती मोठी आर्थिक हानी होईल, तसेच ४ वर्षांचा विलंब वेगळा. कांजूरमार्ग येथे कारशेड करायची असली, तरीही आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल, हे का लपवून ठेवता ? प्रश्‍न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधा यांचा आहे. ‘श्रेयासाठी काम करणे’, हा भाजपचा स्वभाव नाही. भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसतांना दिशाभूल कशाला ?’’