छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोव्यातील आगमनापासून ते गोवा मुक्ती लढ्यापर्यंत प्रत्येक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांशी निगडित भूमीचे संवर्धन करणार
पणजी, १४ डिसेंबर (वार्ता.) – गोवा शासन राज्याचा ६० वा मुक्तीदिन वर्षभर साजरा करणार आहे. या काळात शासन राज्यातील गोवा मुक्ती लढ्याशी निगडित, तसेच अन्य ऐतिहासिक स्थळे शोधून काढून त्याची स्वच्छता करून जतन करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोव्यातील आगमनापासून ते गोवा मुक्तीलढ्यापर्यंत प्रत्येक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांशी निगडित भूमीचे संवर्धन केले जाणार आहे. गोमंतकियांसाठी हा एक अभिमानाचा भाग असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘१९ डिसेंबर या दिवशी कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची उपस्थिती असणार आहे. प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकाचा या वेळी सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी गोवा शासनाने केंद्राकडे १०० कोटी रुपयांचे साहाय्य मागितले आहे. देशाचे प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश येथेही गोवामुक्ती दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम होणार आहे. ’’