कार्तिक कृष्ण पक्ष एकादशी (११.१२.२०२०) या दिवशी पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
पू. (सौ.) अश्विनी पवार यांना मी विवाहापूर्वीपासून ओळखतो. असे असले, तरी पू. वटकर यांनी त्यांच्याबद्दल जी लेखमाला लिहिली आहे, तिच्यातून पू. (सौ.) अश्विनी यांच्यात असलेले अनेक गुण लक्षात आले. या लेखमालेमुळे पू. (सौ.) अश्विनी यांनी एवढ्या लहान वयात साधनेत एवढी प्रगती कशी केली, हेही माझ्या लक्षात आले. याबद्दल पू. वटकर यांचे आभार मानावे, तेवढे थोडेच आहेत. पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्यामुळे पू. वटकर यांना लेख लिहिण्याची संधी मिळाली, म्हणून मी त्यांच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मी मागील १० वर्षांपासून देवद आश्रमात वास्तव्याला आहे. मी आश्रमात राहिल्यामुळे मला साधना आणि सेवा करण्याची संधी लाभली आहे. आश्रमातील साधकांची साधना चांगली होत आहे. पू. (सौ.) अश्विनी पवार आश्रमातील साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. माझा त्यांच्याशी फारसा संपर्क नसतो, तरीही काही अनुभवांवरून मला त्यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळते. मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये कृतज्ञतापुष्पांत गुंफून ती श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.
पू. (सौ.) अश्विनी पवार यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. साधना चांगल्या प्रकारे होण्यासाठी साधकांना रहाण्याच्या खोलीचे नियोजन करण्यास सांगणे
१ अ. ‘आश्रम सोडून २ दिवस घरी रहायला जावे’, असा विचार मनात कधीच न येणे आणि आश्रमाच्या मुख्य दरवाजाच्या आत कोठेही रहायला मिळाले, तरी आनंद अन् कृतज्ञता वाटणे : ‘पूर्वी मी देवद आश्रमातील जुन्या इमारतीतील जवळजवळ सर्व खोल्यांमध्ये राहिलो आहे. मला दुसर्या खोलीत रहायला जायला सांगितल्यावर १० मिनिटांत मी दिलेल्या दुसर्या खोलीत जात असे. आश्रमापासून ३० कि.मी. अंतरावर मुंबई येथे सर्व सुखसोयी असलेला माझा बंगला आहे; मात्र ‘देवद आश्रमातील आश्रय आणि सहसाधकांचा अनमोल सत्संग यांमुळे आश्रम सोडून २ दिवस घरी रहायला जावे’, असा विचार माझ्या मनात कधीच आला नाही. मला आश्रमाच्या मुख्य दरवाजाच्या आत कोठेही रहायला मिळाले, तरी आनंद आणि कृतज्ञता वाटते.
१ आ. निवासव्यवस्थेत केलेले पालट आनंदाने स्वीकारता येणे : आश्रमाच्या जुन्या इमारतीची दुरुस्ती आणि रंगकाम झाल्यावर वर्ष २०१७ पासून ३ वर्षे मी एका खोलीत रहात होतो. ती खोली इतर खोल्यांसारखीच असतांनाही तिथे रहातांना पुष्कळ चैतन्यमय वाटायचे. ‘साधना करण्यासाठी गुरुदेवांनी दिलेला हा सर्वोत्तम निवास आहे’, असे मला वाटायचे. संतपद प्राप्त झाल्यानंतर मला आणि सहसाधकाला अन्य एका खोलीत रहाण्यासाठी जाण्यास सांगण्यात आले. ही खोली तशी आकाराने लहान आहे. तिला एक खिडकी आहे आणि खिडकीतून आकाश किंवा निसर्गसौंदर्य पहाण्यासाठी सोय नाही. यामुळे सहसाधकांनी या खोलीत येण्यास नकार दिला. मला मात्र गुरुकृपेने या खोलीत रहायला जाणे आनंदाने स्वीकारता आले.
१ इ. ‘वृद्धावस्थेत आनंदाने रहाता यावे’, याचा विचार करून पू. आश्विनीताईंनी साधकांना खोलीचे नियोजन करण्यास सांगणे : त्या खोलीत रहायला आल्यावर प्रसंगानुरूप मला या खोलीची उपयुक्तता जाणवली. खोलीलाच जोडलेले प्रसाधनगृह आहे. त्यामध्ये वयस्कर आणि रुग्णाईत व्यक्तीला लागणार्या सर्व सुविधा आहेत. ‘पलंग, कपाट, पडदे, खोलीचा रंग इत्यादींची रंगसंगती आणि सजावट आश्रमाने कशी काय केली ?’, याचे मला आश्चर्य वाटते. ‘ही खोली वैशिष्ट्यपूर्ण अशी पुष्कळ सजवलेली आहे’, असे नाही, तरी मला या खोलीत पुष्कळ चैतन्य आणि आनंद जाणवतो. ‘नियोजन करतांना ‘माझी साधना चांगली व्हावी आणि वृद्धावस्थेत मला आनंदाने रहाता यावे’, याचा विचार करून पू. ताईंनी माझ्या निवासाचे नियोजन करण्याविषयी संबंधित साधकांना सांगितले. पू. ताईंचा संकल्प आणि भाव यांमुळे मला या खोलीत रहातांना आनंद मिळत आहे.
२. पू. (सौ.) अश्विनीताईंनी आईप्रमाणे काळजी घेणे
२ अ. ४ मास पाठीच्या मणक्याचा तीव्र त्रास झाल्याने झोपून असल्याने हतबल होणे, पू. ताईंनी वात्सल्यभावाने विचारपूस केल्यावर मानसिकतेत पालट होणे अन् हतबल स्थितीतून बाहेर येता येणे : मला एप्रिल ते जुलै २०२० या ४ मासांत पाठीच्या मणक्याचा (सायटिकाचा) तीव्र त्रास झाल्यामुळे मी खोलीतील पलंगावर झोपूनच होतो. पू. ताई माझे वैद्यकीय उपचार होतील आणि पथ्य पाळले जाईल, याची काळजी घेण्यास साधकांना सांगत होत्या. मला २ मिनिटे बसून जेवण करणेही कठीण झाले होते. मी हतबल झालो होतो. त्या वेळी पू. ताई मला म्हणाल्या, ‘‘पू. काका, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला पथ्याचे किंवा उपचाराचे जे हवे ते सांगा. आपण आश्रमातील उत्तरदायी साधकांना सांगून नियोजन करू.’’ त्यांच्या या वाक्याने मी हतबल स्थितीतून बाहेर आलो. येथे ‘मी काय मागणार किंवा काय मागणार नाही ? आश्रम मला काय देणार किंवा नाही देणार ?’, हे महत्त्वाचे नव्हते. पू. ताईंनी वात्सल्यभावाने म्हटलेले वरील वाक्य माझ्या मानसिकतेत पालट करून गेले आणि मला रुग्णाईत असतांनाही आनंद अनुभवता आला. याविषयी मी शब्दात सांगू शकत नाही. मी केवळ पू. ताईंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करू शकतो.
२ आ. ४ मास रुग्णाईत असतांना साहाय्य करणार्या पू. (सौ.) अश्विनीताईंच्या रूपात देव भेटल्याचे जाणवणे : ४ मास रुग्णाईत असतांना देवाने माझी काळजी घेतली. देवाने वेदनादायी आणि पलंगाला खिळवून ठेवणार्या आजारातून मला बाहेर काढले. हे सत्य असले, तरी आश्रमातील साधकांच्या माध्यमातून देवाने काळजी घेतली. मला साहाय्य करणार्या पू. अश्विनीताईंच्या रूपात मला देवच भेटला.
२ इ. पू. (सौ.) अश्विनीताईंनी वयस्कर आणि अंथरुणाला खिळून असलेल्या साधकांची सेवा सहसाधकांना करायला सांगणे अन् ‘मला आश्रमातील सर्व सेवांमधून शिकता येते, मी सेवक म्हणून सेवा करते’, असे त्यांनी म्हणणे : मी पू. ताईंना म्हणालो, ‘‘वयस्कर आणि अंथरुणाला खिळून असलेल्या साधकांची सेवा करणे सोपे नाही. कितीही पैसे दिले, तरी अशी आत्मीयतेने सेवा कुणीच करू शकणार नाही.’’ त्या वेळी पू. ताई म्हणाल्या, ‘‘आश्रमातील साधिका सेवांचे नियोजन करतात. सर्व साधक सेवा करतात. ते साधक आहेत; म्हणून माझे म्हणणे ऐकतात. बाहेरच्यांनी माझे ऐकले नसते.’’ त्यावर मी म्हटले, ‘‘तुम्ही साधकांना घडवले आहे. त्यांना ऐकण्याच्या आणि आत्मीयतेने सेवा करण्याच्या स्थितीला नेले आहे. तुम्ही सर्वस्वाचा त्याग करून आश्रमात परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित अशी पूर्णवेळ सेवा करत आहात.’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘मी कोट्यवधी रुपये अर्पण केले असते, तरी मला या सेवा शिकायला मिळाल्या नसत्या आणि आनंदही मिळाला नसता. मी सेवक म्हणून सेवा करते.’’
३. साधकांना साधनेच्या दृष्टीने घडवणार्या पू. ताई !
तीन-चार खोल्यांचे घर आणि घरातील ४-५ माणसांच्या रहाण्याची अन् जेवणाची सोय करणे, हे संसार आणि व्यवहार यांचा अनुभव असणार्या कुटुंबाच्या कर्त्याला कठीण जाते. सध्याच्या काळात तर ‘घरात एकविचाराने आणि आनंदाने रहाणे’, ही गोष्ट दुर्मिळ होत आहे. समाजात कुटुंबव्यवस्था रसातळाला जात आहे. असे असतांना आश्रमातील एवढ्या साधकांचे निवास, भोजन, आरोग्य, साधना आणि सेवा यांचे नियोजन आश्रमातील साधक करतात. त्यांना साधनेच्या दृष्टीने पू. ताईंनी घडवले आहे.
याविषयी पू. ताईंना विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘साधकांना साधनेत कसे घडवायचे ?’, हे शिकवले. मला जे आकलन होते, ते मी सेवा करणार्या साधिकांना सांगते. त्याप्रमाणे त्या करतात. त्याही उच्च लोकातील आहेत. सिद्ध आहेत.’’
४. आश्रमात लागणार्या साहित्याच्या संदर्भात पू. (सौ.) अश्विनीताईंनी साधकांना सखोल अभ्यास करण्यास सांगणे, त्यावरून ‘त्या देवद आश्रमाला हिंदु राष्ट्राचे प्रतीक बनवत आहेत’, असे वाटणे
‘आश्रमात वापरली जाणारी पायपुसणी जुन्या कपड्यांपासून बनवतात. ‘त्याची कडा कुठल्या रंगाची असावी आणि कपडा कोणत्या रंगाचा असावा ?’, याचा अभ्यास केला जातो. ‘ती पायपुसणी प्रसाधनगृह, साधक, संत, पाहुणे आणि प्रतिष्ठित पाहुण्यांची खोली यांमध्ये नेमकी कुठे वापरायची ?’, याची वर्गवारी केली जाते. ‘कोणत्या प्रतीची आणि किती पायपुसणी लागणार ?’, याची मागणी घेतली जाते. त्यानुसार आश्रमात ती शिवली जातात. खोलीत वापरून जुनी झाल्यावर ती प्रसाधनगृहात वापरली जातात. तेथे वापरून झाल्यावर टाकून न देता ती वाहन चालवणार्या साधकांना तेल पुसण्यासाठी दिले जातात. अशा रितीने त्यांचा शेवटपर्यंत योग्य पद्धतीने वापर केला जातो.
आश्रमासाठी झाडू घ्यावयाचे होते. त्याचा अभ्यास २ वर्षांपासून चालू होता. ‘साधकांना किती उंचीचा, किती वजनाचा आणि कोणत्या प्रतीचा झाडू लागतो ?’, याचा अभ्यास करण्यात आला. झाडूसाठी लागणारे गवत आसाममधून येते; मात्र मागील वर्षी अतीवृष्टीमुळे गवत मिळू शकले नाही. त्यामुळे झाडूची उपलब्धता अल्प झाली आणि झाडू महाग झाले. त्यासाठी ते सिद्ध करणार्या कारखान्याची माहिती माहितीजालावरून काढली. त्यांच्याकडून झाडूचे १० नमुने म्हणून विकत घेऊन त्यांचा वापर करून अभ्यास करण्यात आला. ‘ते योग्य आहेत’, याची निश्चिती झाल्यावर त्या कारखान्यातून पूर्वीच्या साठ्याच्या गवतातून अल्प दरात सर्व आश्रमासाठी झाडूंची खरेदी करण्यात आली.
पायपुसणी आणि झाडू यांविषयी एवढे संशोधन अन् अभ्यास पू. ताईंनी साधकांना करण्यास सांगितला होता.
यावरून ‘त्या देवद आश्रमाला हिंदु राष्ट्राचे प्रतीक बनवत आहेत’, असे वाटते. ‘भविष्यात हिंदु राष्ट्राची धुरा सांभाळणार्यांपैकी एक रत्न असतील’, असे वाटते.
५. तीव्र आध्यात्मिक त्रास होत असतांनाही स्वतःकडील सेवा गुणवत्तापूर्ण आणि देवाला अपेक्षित अशी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे अन् त्या वेळी ‘स्व’चे विचार अल्प असल्याने देव साहाय्य करत असल्याचे पू. ताईंनी सांगणे
पू. ताईंना तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. त्यामुळे सेवा करण्यास त्यांना पुष्कळ विरोध होतो, तरीही त्या क्षात्रवृत्तीने आध्यात्मिक उपाय करून त्रासाशी लढतात. याविषयी मी त्यांना म्हणालो, ‘‘त्रास असतांना तुम्हाला सेवा करणे कसे काय जमते ? सर्वसाधारण साधक एवढा आध्यात्मिक त्रास झाल्यावर झोपून राहिला असता,’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘माझ्याकडील सेवा मला पूर्ण केलीच पाहिजे. माझ्याकडून जी सेवा होते, ती गुणवत्तापूर्ण झाली पाहिजे. ‘उगीच काहीतरी केले’, असे होत नाही. देवाला अपेक्षित असे करण्याचा मी प्रयत्न करते. मला झोपायला जमत नाही. देव मला झोपू देत नाही.’’
मी म्हणालो, ‘‘आध्यात्मिक त्रास म्हणजे सूक्ष्म युद्ध असते. हे त्रास साधकांना हतबल करून टाकतात. तुम्ही तुमची सेवा परिपूर्ण कशी करता ?’’ त्यावर पू. ताई म्हणाल्या, ‘‘त्या वेळी माझे ‘स्व’चे विचार अल्प असतात. देव मला सेवा पूर्ण करण्यास साहाय्य करतो.’’
(क्रमशः)
– पू. (श्री.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/429997.html
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |