हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महिलांसाठी ‘ऑनलाईन सोशल मिडिया प्रशिक्षण शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

फोंडा, गोवा  सध्याच्या काळात सामाजिक माध्यमांचे महत्त्व लक्षात घेता घरबसल्या समाजात राष्ट्र आणि धर्म विषयक जागृती करण्याच्या उद्देशाने नुकतेच धर्मप्रेमी महिलांसाठी ‘ऑनलाईन सोशल मिडिया प्रशिक्षण शिबिर’ घेण्यात आले. या शिबिराचा अनेक धर्मप्रेमी महिलांनी लाभ घेतला. भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना आणि श्‍लोक म्हणून शिबिराचा आरंभ झाला. या शिबिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या सौ. वेदिका पालन यांनी सामाजिक माध्यमांद्वारे धर्मप्रसार करण्याचे महत्त्व सांगितले. या वेळी त्यांनी ‘हिंदु जनजागृती समितीने आतापर्यंत सामाजिक माध्यमांद्वारे चालवलेल्या चळवळी आणि त्यात मिळालेले यश’ याविषयी माहिती दिली. यानंतर सौ. वैभवी प्रभु आणि सौ. गौरी नायक यांनी ‘व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक आणि ट्विटर या माध्यमांचा वापर कसा करावा’, याचेे ऑनलाईन प्रशिक्षण दिले. अनेक सहभागी महिलांनी घरबसल्या धर्मप्रसार सेवेत सहभाग घेता येत असल्याविषयी आनंद व्यक्त केला. शेवटी कृतज्ञता व्यक्त करून शिबिराची सांगता झाली.

सहभागी महिलांचे अभिप्राय

अलका भोई : मी नोकरी करत असल्याने प्रत्यक्ष सेवा करायला वेळ मिळत नाही; परंतु आता सामाजिक माध्यमांद्वारे नोकरीतील मधल्या सुटी आणि घरी असतांना ही सेवा करू शकते; म्हणून कृतज्ञता वाटली.

सौ. रेश्मा तळावलीकर : सामाजिक माध्यमांतील धर्मप्रसाराविषयी जाणून घेतल्याने स्वयंपूर्ण होता येईल. या प्रशिक्षणामुळे उत्साह निर्माण झाला. ‘ही सेवा आपल्याला जमेल’, असा विश्‍वास वाटला.

हिंदु जनजागृती समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात सहभागी महिलेने मंगळसूत्र हिसकावणार्‍या गुंडाला विरोध केल्याने प्रसंग टळला !

फोंडा – हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी करून घेणे, शौर्य जागृत करणे, साधना आणि काळानुसार स्वरक्षण प्रशिक्षण यांचे महत्त्व प्रतिपादित करणे, यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमी युवती अन् महिला यांच्यासाठी दळणवळण बंदीच्या काळात ‘स्वरक्षण प्रशिक्षण ऑनलाईन वर्ग’ घेण्यात येत आहेत. या वर्गात सहभागी होत असलेली एका महिला बाजारात गेली असतांना तेथील एका गुंडाने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी महिलेने प्रसंगावधान राखून मोठ्याने आरडाओरडा चालू केला आणि गुंडाचा हात झटकून टाकला. महिलेने केलेल्या प्रतिकारामुळे गुंड तेथून घाबरून पळाला. समितीच्या वतीने  धर्मप्रेमी युवती आणि महिला यांच्यासाठी नुकत्याच आयोजित केलेल्या ‘शौर्यजागृती ऑनलाईन सप्ताहा’च्या समारोप सोहळ्यात संबंधित महिलेने याविषयी माहिती दिली. या वेळी संबंधित महिला म्हणाल्या, ‘‘हिंदु जनजागृती समितीच्या स्वरक्षण वर्गात सहभागी झाल्याने मला स्वत:चे रक्षण कसे करायचे, हे शिकायला मिळाले. गुंड गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतांना मी मोठ्याने किंचाळले. ही शक्ती माझ्यात कशी आली, हे मला समजलेच नाही. विपरीत प्रसंगात मी माझे रक्षण करू शकले. यामुळे धैर्य आणि आत्मविश्‍वास वाढला.’’