केरळमधील जैव तंत्रज्ञान संस्थेच्या परिसराला पू. गोळवलकर गुरुजी यांचे नाव देण्याचा निर्णय

केरळ सरकार आणि काँग्रेस यांच्याकडून तीव्र विरोध

डावीकडून मुख्यमंत्री पिनरयी विजयन् आणि सरसंघचालक पू. गोळवलकरगुरुजी

थिरूवनंतपूरम् (केरळ) – राज्यातील राजीव गांधी सेंटर फॉर बॉयोटेक्नॉलॉजी संस्थेच्या परिसराला द्वितीय सरसंघचालक पू. गोळवलकर गुरुजी यांचे नाव देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा राज्यातील साम्यवादी सरकार आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांनी विरोध चालू केला आहे. त्यांनी आरोप केला की, भाजप प्रत्येक गोष्टीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच ‘विज्ञान क्षेत्रात पू. गोळवलकर गुरुजी यांचे काय कार्य आहे ?’, असा प्रश्‍नही उपस्थित केला आहे.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी या परिसराला ‘श्री गुरुजी माधव सदाशिव गोळवलकर नॅशनल सेंटर फॉर कॉम्प्लेक्स डिजीज इन कॅन्सर अँड वायरल इन्फेक्शन’ ठेवण्याची माहिती दिली होती. यावर राज्याचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन् यांनी या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगतांना एखाद्या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या भारतीय शास्त्रज्ञाचे नाव ठेवण्याची मागणी केली.