८ डिसेंबरच्या भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा

‘बंद’ म्हणजे स्वतःच्या मागण्यांसाठी देश आणि जनता यांना वेठीस धरून त्यांची सहस्रो कोटी रुपयांची हानी करणारा गुन्हाच होय ! अशा प्रकारे हानी करणे जनताद्रोहच होय ! सरकारनेही कुणावर अशा प्रकारचे आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, याकडे लक्ष द्यायला पाहिजे !

नवी देहली – काँग्रेसने ८ डिसेंबर या दिवशी शेतकर्‍यांनी घोषित केलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी ही माहिती दिली. खेडा म्हणाले की, ८ डिसेंबरला आम्ही आमच्या पक्ष कार्यालयांबाहेरही आंदोलन करणार आहोत. भारत बंद आणि आंदोलन यशस्वी होवो, यासाठी आम्ही प्रयत्न करू.

 (सौजन्य : Hindustan Times)

देहलीच्या सीमेवर गेल्या ११ दिवसांपासून शेतकर्‍यांचे आंदोलन चालू आहे. सरकारशी ५ वेळा झालेली चर्चा अपयशी ठरली आहे. कडाक्याच्या थंडीतही सहस्रो शेतकरी देहलीच्या सिंघु, टीकरी, देहली, गाजियाबाद, चिल्ला आदी सीमांवर आंदोलनाला बसले आहेत. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मागे फिरणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.