वृद्ध महिलेवर चाकूने आक्रमण करणार्‍याला ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

कणकवली – वर्ष २०१९ मध्ये एका वृद्ध महिलेवर चाकूने आक्रमण करणार्‍या आरोपीला जिल्हा न्यायालयाने दंड आणि ७ वर्षे सक्तमजुरी, अशी शिक्षा ठोठावली. १४ फेब्रुवारी २०१९च्या रात्री ८ वाजता कुडाळ येथील श्रीमती अनुराधा बाळकृष्ण तळेकर कणकवली येथील गोपुरी आश्रमाजवळ एस्.टी. बसची वाट बघत होत्या. त्या वेळी मधु कोकरे याने त्यांना ‘आता बस मिळणार नाही. तुम्हाला बसस्थानकात नेऊन सोडतो’, असे सांगून स्वत:च्या दुचाकीने त्यांना बसस्थानकाच्या दिशेने नेत होता. बसस्थानकाच्या दिशेने जात असतांना मधेच त्याने दुचाकी थांबवून श्रीमती तळेकर यांच्यावर चाकूने आक्रमण केले आणि त्यांची पर्स अन् भ्रमणभाष घेऊन तो पळून गेला. याविषयी श्रीमती तळेकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणाचे अन्वेषण करत असतांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कोकरे याला त्याच्या असरोंडी येथील घरातून अटक केली होती. या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी जिल्हा न्यायालयाने कोकरे याला विनयभंगाच्या आरोपासाठी २ वर्षे सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंड अन् दंड न भरल्यास ७ दिवस सक्तमजुरी, तर भा.दं.वि. ३९४, ३९७ नुसार ७ वर्षे सक्तमजुरी, अशी शिक्षा ठोठावली. या दोन्ही शिक्षा एकत्रित भोगण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.