वास्को येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून हुतात्मा चौकात झेंडे लावून चौकाचे विद्रूपीकरण

राष्ट्रवादी काँग्रेसने माफी मागण्याची ‘गोवा सुरक्षा मंच’ची मागणी

वास्को, २६ नोव्हेंबर (वार्ता.) – वास्को येथे हुतात्मा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे झेंडे लावल्याने चौकाचे विद्रूपीकरण करण्यात आले आहे. ‘आम्ही राष्ट्रवादी’ असा टेंभा मिरवायचा आणि राष्ट्ररक्षणासाठी ज्यांनी प्राणांचे बलीदान दिले त्यांना अपकीर्त करायचे हे योग्य नाही. या अक्षम्य चुकीविषयी राष्ट्रवादी काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणी ‘गोवा सुरक्षा मंच’चे युवा अध्यक्ष नितीन फळदेसाई यांनी केली आहे.

नितीन फळदेसाई पुढे म्हणाले, ‘‘हे स्मारक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूर्वजांचे नाही, तर ते देशाच्या सैनिकांचे आहे. त्यांचा मानसन्मान ठेवण्याचे दायित्व सर्वांचेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेससारख्या राष्ट्रीय राजकीय पक्षाने याचे भान ठेवणे आवश्यक होते.’’