प्रत्येक घरात ज्याप्रमाणे देवघराला महत्त्व आहे, त्याचप्रमाणे समाजात मंदिरांना महत्त्व आहे. मंदिरे ही हिंदूंसाठी ऊर्जास्रोत आणि धर्माची आधारशीला आहेत. कोरोनामुळे अनेक मास बंद असलेली मंदिरे उघडण्यासाठी महाराष्ट्रातील भाविकांना पुष्कळ संघर्ष करावा लागला. अखेर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील मंदिरे उघडण्यात आली.
त्यानंतर सरकारीकरण झालेल्या महाराष्ट्राच्या श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाची नियोजनशून्यता समोर आली. सध्या मंदिरात दर्शनासाठी अधिक रक्कम आकारून भाविकांची लुबाडणूक चालू आहे. मंदिर प्रशासनाने भाविकांना विनामूल्य दर्शन पास देण्यासाठी शहरामध्ये ३ ठिकाणे निश्चित केली आहेत. साधारण पहाटे दर्शनपास देण्यासाठी प्रारंभ केल्यानंतर २-३ घंट्यांतच पास संपतात आणि पैसे देऊन म्हणजेच ‘पेड दर्शन’ पास घेण्यास सुचवले जाते. यापूर्वी १०० रुपयांना मिळणारा ‘पेड दर्शन’ पास आता ३०० रुपयांना दिला जात आहे. देवतेचे दर्शन ही विकत घेण्याची गोष्ट नसल्याने ‘पेड दर्शना’ला भाविकांचा कायम विरोधच राहिला आहे. त्यात तुळजापूर शहरात येऊन दर्शनाविना परतण्यास मनाची सिद्धता नसल्याने भाविकांना पर्याय नसतो. काही भाविकांना तर कोणताच पास न मिळाल्याने मंदिराच्या बाहेरूनच कळसाचे दर्शन घेऊन माघारी फिरावे लागते.
विनामूल्य पास किंवा ‘पेड दर्शन’ पास घेण्यासाठी भाविकांना अनेक घंटे रांगेत उभे रहावे लागते. त्यात एवढा वेळ उभे राहून पास मिळेलच, याची निश्चिती नसते. काही भाविकांना एका ठिकाणचे पास संपल्यास दुसर्या ठिकाणी जाण्यासाठी द्यावा लागणारा कालावधी आणि पैसा व्यय होतो, तसेच मनस्तापही सहन करावा लागतो. मंदिराच्या बाहेर गर्दी नियंत्रणासाठी ‘बॅरिकेटींग’ किंवा अन्य कोणतीही व्यवस्था प्रशासनाने केलेली नाही. यावरून सरकारीकरण झालेल्या मंदिर प्रशासनाची नियोजनशून्यता आणि त्यांचे गल्ला भरू धोरण प्रकर्षाने जाणवते. ‘पेड दर्शना’ची रक्कम वाढवून भाविकांची लुबाडणूक करणारे मंदिर प्रशासन भाविकांच्या श्रद्धेचा आदर कधीतरी करेल का ? भाविकांच्या नामुष्कीचा अशा प्रकारे अपलाभ उठवणारे मंदिर प्रशासन सोयी-सुविधा देण्यासाठी प्रयत्न करेल, याची सूतराम शक्यता नाही. त्यामुळे हिंदूंनी मंदिर पुन्हा भक्तांच्या अधीन कसे होईल, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
– श्रीमती वर्षा कुलकर्णी, सोलापूर