मणिपूर शासनाच्या अभ्यासक्रमात संस्कृतचा समावेश करण्यास विद्यार्थी संघटनेचा विरोध

देवभाषा संस्कृतचे महत्त्व न जाणताच त्याला विरोध करणार्‍या विद्यार्थी संघटनेचा यातून हिंदुद्वेषच दिसून येतो !

गौहत्ती – काही निवडक शाळा-महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात संस्कृतचा परिचय करून देण्याच्या भाजपच्या मणिपूर सरकारच्या निर्णयाला एका विद्यार्थी संघटनेने विरोध केला आहे. कंगपोकपी जिल्ह्यातील सनातन संस्कृत विद्यालयाच्या भेटीच्या वेळी राज्याचे शिक्षणमंत्री एस्. राजेन यांनी सरकारच्या योजनेविषयी पत्रकारांना सांगितले की, मणिपूर विद्यापीठ या विषयासाठी वेगळा विभाग चालू करण्याच्या विचारात आहे.

(MSAD चे निवेदन वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

‘मणिपूर स्टुडंट्स असोसिएशन दिल्ली’ (एम्.एस्.ए.डी.) नावाच्या विद्यार्थी संघटनेने प्रसारित केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे, ‘मणिपूरच्या विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणार्‍या संस्कृत ग्रंथातील एकही शब्द स्थानिक लोकांच्या मातृभाषेत सापडत नाही. द्वेष, अस्पृश्यता, लैंगिकता, वर्चस्व, गोंधळ यांवर आधारित संस्कृत लादण्याचा प्रयत्न करून सरकार आपला मूर्खपणा उघडकीस आणत आहे. (यातून देवभाषा संस्कृतला विरोध करणार्‍यांचेच अज्ञान आणि मूर्खपणा लक्षात येतो ! – संपादक)

मणिपूरच्या विरुद्ध भारतीय वसाहतवादाच्या प्रक्रियेला पुढे नेण्यासाठी मणीपूरच्या लोकांना शैक्षणिक आणि भाषिक दृष्ट्या गुलाम बनवण्याचा हा प्रयत्न आहे. आदिवासींवर परदेशी भाषा लादणे, हे पूर्णपणे वसाहतवादाचे लक्षण आहे. (भारतापासून स्वत:ला वेगळे समजणार्‍या किंबहुना आपल्या निवेदनातून लोकांना तसा संदेश देणार्‍या या संघटनेवर खरेतर बंदी घालण्याची आवश्यकता आहे ! – संपादक)