देहलीच्या सीमेवर शेतकर्‍यांचे कृषी कायद्यांच्या विरोधात प्रखर आंदोलन

पोलिसांकडून पाण्याचे फवारे आणि अश्रूधूर यांचा वापर करून पांगवण्याचा प्रयत्न

नवी देहली – केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब आणि हरियाणा या राज्यांतील शेतकर्‍यांनी २६ नोव्हेंबरला सकाळी देहली-हरियाणा सीमेवर मोठ्या संख्येने आंदोलन केले. शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा यंत्रणेला शेतकर्‍यांना सीमेवरच रोखण्याचे निर्देश देण्यात आल्याने सगळ्या सीमा सील करण्यात आल्या.

 (सौजन्य : NDTV) 

पंजाबमधून सहस्रो ट्रॅक्टर – ट्रॉलीमधून अन्न, पाणी, डीझेल आणि औषधे समवेत घेऊन शेतकरी देहलीकडे निघाले. त्यांना पोलिसांनी अंबाला-कुरुक्षेत्र राष्ट्रीय महामार्गावर रोखल्याने आक्रमक झालेल्या शेतकर्‍यांनी बॅरिकेड्स उचलून उड्डाणपुलाच्या खाली फेकून दिले. आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. आंदोलकांना पांगवण्यासाठी देहली पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचे फवारे आणि अश्रूधूर यांचा वापर केला.

१. २५ नोव्हेंबर या दिवसापासून विविध गटांद्वारे शेतकरी देहलीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे देहलीतील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली. याच रात्री आंदोलकांना पांगवण्यासाठी त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारण्यात आले. यावर ‘देहलीतील सध्याच्या कडाक्याच्या थंडीत पोलीस आंदोलकांवर पाण्याचे फवारे कसे काय मारू शकतात ?’ असे प्रश्‍न विचारले जात आहेत.

२. देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पोलिसांच्या कारवाईवर म्हणाले की, शेतकरी केंद्राने आणलेल्या ३ कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. हे कायदे मागे घेण्याऐवजी शांततेत आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना आंदोलन करण्यापासून रोखले जात आहे. त्यांच्यावर पाण्याच्या तीव्र फवार्‍यांचा वापर केला जात आहे. अशा प्रकारे शेतकर्‍यांवर अन्याय करणे योग्य नाही. शांततेत आंदोलन करणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे.