इस्लामी देशांच्या संघटनेच्या बैठकीत काश्मीरवर चर्चा होणार नाही !

पाकला पुन्हा चपराक !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – ‘ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ (ओ.आय.सी.) या इस्लामी देशांच्या संघटनेच्या बैठकीमध्ये काश्मीरवर कोणतीही चर्चा होणार नाही. या बैठकीसाठी हा विषयच ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे पाकला पुन्हा एकदा चपराक बसली आहे. या बैठकीत इस्लामी देशांचे परराष्ट्रमंत्री सहभागी होणार आहेत. यापूर्वी पाकने घोषित केले होते की, या बैठकीत तो काश्मीरच्या प्रश्‍नावर चर्चा करणार आहे.

ओ.आय.सी.चे सरचिटणीस युरुफ अल्-ओथाईमीन यांनी सांगितले की, परराष्ट्र मंत्र्यांच्या या बैठकीमध्ये ‘आतंकवादाच्या विरोधात शांती आणि विकास यांसाठी एकजूट’, असा विषय असणार आहे. यामध्ये पॅलेस्टाईन, हिंसेच्या विरोधात युद्ध, कट्टरतावाद, आतंकवाद, इस्लामोफोबिया, धर्माचा अवमान, तसेच मुसलमान अल्पसंख्यांक, संघटनेच्या बाहरील देशांतील मुसलमानांची स्थिती आणि रोहिंग्यांसाठी आर्थिक निधी जमवणे या विषयांवर चर्चा होणार आहे.