कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिर आणि श्री जोतिबा मंदिर आता ८ घंटे दर्शनासाठी खुली रहाणार

दर्शनासाठी विनामूल्य ई-पासची सोय

कोल्हापूर – करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर, श्री जोतिबा मंदिरासह पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारीतील सर्व मंदिरे २५ नोव्हेंबरपासून ८ घंटे भाविकांना दर्शनासाठी खुली रहाणार आहेत. सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत भाविकांना दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा २ घंट्यांनी वेळ वाढवून दिला आहे. सायंकाळी मात्र पूर्वीप्रमाणेच ४ ते ७ या वेळेत दर्शन मिळेल. यासमवेत देशभरातील भाविकांना दर्शनासाठी विनामूल्य ई-पासची सुविधाही उपलब्ध केली आहे. त्यासाठी www.mahalaxmikolhapur.com या संकेतस्थळावर फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या बैठकीला समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, अभियंता सुरेश देशपांडे आदी उपस्थित होते.

‘कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्यक सर्व नियमांचे पालन करूनच दर्शन दिले जात आहे. भाविकांना दर्शन सुलभ मिळावे, या उद्देशाने समितीच्या अधिकृत संकेतस्थळांवर विनामूल्य ई-पासची सोय केली आहे’, असे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी या वेळी सांगितले.