तमिळनाडूमध्ये हिंदु महासभेच्या नेत्याची अज्ञातांकडून घराबाहेर हत्या

काही मासांपूर्वी पोलिसांनी सुरक्षेची मागणी फेटाळली होती !

देशात हिंदुत्वनिष्ठांच्या होणार्‍या हत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

होसूर (तमिळनाडू) – तमिळनाडू हिंदु महासभेचे राज्य सचिव नागराज यांची २२ नोव्हेंबर या दिवशी येथील आनंद नगरातील त्यांच्या घराजवळ अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी वार करत हत्या केली. या मारेकर्‍यांनी त्यांना प्रथम घराबाहेर येण्यास सांगितले आणि नंतर त्यांची हत्या केली, तर काही जणांच्या मते नागराज सकाळी फिरायला गेले असता त्यांची चारचाकी गाडी थांबवून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला असता त्यांची हत्या करण्यात आली. नागराज यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा आणि ३ मुली आहेत.

१. पोलिसांचे म्हणणे आहे की, ही हत्या रियल इस्टेट (बांधकाम व्यवसाय) आणि अन्य व्यावसायातील वादातून झाल्याची शक्यता आहे. यामागे कोणतेही धार्मिक कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

२. काही मासांपूर्वी नागराज यांनी पोलिसांकडे संरक्षण देण्याची मागणी केली होती, तेव्हा पोलिसांनी सुरक्षा देण्यास नकार दिला होता.

३. सप्टेंबर मासामध्ये याच भागात रंगनाथन् नावाच्या भाजप नेत्याची त्यांच्या घराबाहेर धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली होती. ते अण्णाद्रमुक सोडून भाजपमध्ये सहभागी झाले होते. त्यांना या गावातील भाजप युवा शाखेचे अध्यक्षही नेमण्यात आले होते.