१. दूरदर्शनवर ऐंशीच्या दशकात प्रसारित करण्यात आलेल्या ‘रामायण’ या मालिकेचे दळणवळण बंदीच्या काळात पुनर्प्रसारण होणे आणि तिला जनतेकडून पूर्वीएवढाच उदंड प्रतिसाद मिळणे
‘अलीकडे देशभरातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात दळणवळण बंदी (लॉकडाऊन) लागू करण्यात आली. २८.३.२०२० ते २०.४.२०२० या कालावधीत दूरदर्शनवर ‘रामायण’ ही मालिका दाखवण्यात आली. ऐंशीच्या दशकात ‘रामायण’ या मालिकेचे दूरदर्शनवर प्रथम प्रसारण झाले होते. त्या वेळी ही मालिका लोकांनी खरोखरच ‘रामचरित्राचे पारायण करत आहोत’, या भावाने पाहिली आणि भारतीय दूरचित्रवाणीच्या (टेलिव्हिजनच्या) इतिहासात ती पुष्कळ लोकप्रिय मालिका म्हणून अजरामर झाली. आज दळणवळण बंदीच्या (लॉकडाऊनच्या) काळातही तीच पसंती लोकांनी या मालिकेला दाखवली आणि पुन्हा एकदा ‘रामायण’ ही मालिका आजही लोकांना तेवढीच आवडते’, हे दाखवून दिले.
२. आज मनोरंजनाची इतर अनेक माध्यमे असूनही ‘रामायण’ ही मालिका लोकप्रिय होण्याची कारणे
२ अ. रामायण हे आदर्श जीवन जगण्याचे शाश्वत महाकाव्य असल्याने आणि मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक अन् कलाकार यांचा मालिकेप्रती असलेल्या भावामुळे ती लोकांना आवडणे : ऐंशीच्या दशकात माध्यमे अल्प होती; पण आज अनेक माध्यमे असूनही लोकांना रामायण तेवढेच आवडले. याचे कारण म्हणजे माध्यमे कितीही वाढली आणि प्रगत असली, तरी रामायण हे महाकाव्य शाश्वत सत्य असून आदर्श जीवनाचे सार त्यात सामावलेले आहे. या मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या अन् मालिकेशी जोडल्या गेलेल्या कलाकारांच्या मालिकेप्रती असलेल्या भावामुळे ही मालिका कोणत्याही काळात दाखवली, तरी लोकांना तेवढीच आवडेल.
२ आ. लोकांनी त्यांच्या अंतरात्म्यातील ईश्वराच्या मूळ बिजाकडे धाव घेतलेली असल्याने विरंगुळ्याची अन्य अनेक प्रलोभने असतांनाही त्यांना ‘रामायण’ ही मालिका आवडणे : सनातनचे साधक श्री. दिवाकर आगावणे यांनी सांगितले, ‘‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ म्हणतात, ‘‘माणसाच्या अंतरात्म्यात मूळ बीज ईश्वराचेच आहे; पण त्याच्याभोवती मायेचे कठीण वज्रकवच असते.’’ असे प्रत्येकाचे आहे. आज विरंगुळ्याची अन्य अनेक प्रलोभने असतांनाही लोकांना ही मालिका आवडणे, म्हणजे त्यांनी त्यांच्या अंतरात्म्यातील मूळ बिजाकडे घेतलेली धाव आहे.
३. देवाप्रती भाव आणि श्रद्धा असणारे ‘रामायण’ या मालिकेतील कलाकार !
३ अ. श्रीरामाची भूमिका करण्याची तळमळ असल्याने श्री. अरुण गोविल यांना ती भूमिका मिळणे आणि त्यांनी मिळालेल्या सन्मानाचे श्रेय श्रीरामाला देऊन कृतज्ञता व्यक्त करणे : एका मुलाखतीत या मालिकेत श्रीरामाची भूमिका करणारे श्री. अरुण गोविल यांनी सांगितले, ‘‘श्रीरामाच्या भूमिकेसाठी मी स्वतः निर्माते रामानंद सागर यांच्याकडे जाऊन श्रीरामाची भूमिका करण्याची इच्छा व्यक्त केली. मला स्क्रीन टेस्टमध्ये अनुत्तीर्ण केले होते; परंतु काही दिवसांनी रामानंद सागर यांनी मला बोलावले आणि ते म्हणाले, ‘‘हमे तेरे जैसा राम नही मिलना ।’’
येथे कलाकाराची श्रीरामाची भूमिका करण्याची तळमळही महत्त्वाची ठरते. श्री. अरुण गोविल पुढे म्हणाले, ‘‘माझ्या संपूर्ण कारकीर्दीत अनेक चित्रपट करूनसुद्धा मला हा सन्मान मिळाला नसता, जो श्रीरामाची भूमिका करून मिळाला आहे. मला ठाऊक आहे की, हा सन्मान एका कलाकाराचा नाही, तर श्रीरामाचा आहे. मी त्यासाठी देवाचा अखंड ऋणी आहे.’’
३ आ. सीतेची भूमिका करणार्या दीपिका चिखलिया
३ आ १. ‘सीतेची ही भूमिका मिळणे’, हे भाग्य आहे’, असे वाटणे : ‘रामायण’ या मालिकेतील सीतेची भूमिका करणार्या दीपिका चिखलिया यांनीही सांगितले, ‘‘ही भूमिका मिळणे आणि सीता म्हणून समाजात एवढा मानसन्मान मिळणे’, हे माझे भाग्य आहे. माझी निवड करतांना पापाजी (रामानंद सागरजी) म्हणाले होते की, सीतेसाठी हाच दिव्य तोंडवळा (डिव्हाईन फेस) हवा होता. ते मला ‘सीता’ या नावानेच बोलावत. आम्हा सर्वच कलाकारांना रामानंद सागर यांनी नित्य जीवनातही काही पालट करायला सांगितले, उदा. सात्त्विक कपडे घालणे इत्यादी.’’
३ आ २. सीतेच्या भूमिकेसाठी आवश्यक असलेले सर्व पालट करणे आणि या भूमिकेनंतर सीतेची प्रतिमा अबाधित ठेवून सिनेसृष्टीतील कारकीर्द आनंदाने संपवणे : मालिकेतील ‘सीता श्रीरामाच्या समवेत वनवासात जायला निघते’, या प्रसंगासाठी दीपिका यांनी कॅमेर्याला आवश्यक तेवढीच रंगभूषा करण्याचे ठरवले आणि त्यांनी कपाळावर टिकलीऐवजी कुंकू लावले, तसेच लिप्स्टीकचा वापर पूर्णपणे टाळला. ‘वेशभूषाही अधिक सात्त्विक असायला पाहिजे’, असा विचार करून तशीच वस्त्रे त्यांनी परिधान केली. हे सर्व प्रसंगानुरूप केलेले सात्त्विक पालट सीतेच्या भूमिकेला पोषक ठरले. सिनेसृष्टीत अभिनेत्री होण्यासाठी आलेल्या दीपिका यांनी ‘रामायण’ या मालिकेनंतर फार काही काम केले नाही. जणू त्यांच्या त्या इच्छाच संपल्या आणि त्यांनी विवाह करून सिनेसृष्टीतील सीतेची आपली प्रतिमा अबाधित ठेवून सिनेसृष्टीतील कारकीर्द आनंदाने संपवली.
३ इ. रावणाची भूमिका करणारे श्री. अरविंद त्रिवेदी
३ इ १. ‘रावणाची भूमिका करावी लागते’, याचे वाईट वाटून चित्रीकरण चालू होण्यापूर्वी शिव आणि राम यांची पूजा, तसेच दिवसभर उपवास करणे : ‘रामायणातील रावणाची भूमिका करणारे श्री. अरविंद त्रिवेदी हे सीता अपहरणाचे दृश्य पाहून ‘हे नीच काम करावे लागले’, यासाठी हात जोडून क्षमा मागत आहेत’, असे चलत्’चित्र अलीकडे सामाजिक माध्यमांवर (सोशल मिडियावर) आले.
श्री. अरविंद त्रिवेदी म्हणतात, ‘‘मी शिवभक्त आणि रामभक्त आहे. रावणाची भूमिका करतांना संहितेप्रमाणे श्रीरामाला अपशब्द बोलावे लागत असत. याचे मला दुःख होई; म्हणून चित्रीकरण चालू होण्यापूर्वी मी शिव आणि राम यांची पूजा करत असे अन् चित्रीकरण संपेपर्यंत दिवसभर उपवास करत असे. चित्रीकरण संपल्यानंतर रावणाचे कपडे पालटून मगच मी अन्नग्रहण करत असे.’’
३ ई. हनुमानाची भूमिका केलेले दारा सिंह यांनी मृत्यूच्या आधी रामायण पहाण्याची इच्छा व्यक्त करणे : दारा सिंह यांचा रामायणाप्रती इतका भाव होता की, त्यांच्या मृत्यूच्या आधी त्यांना मायेतली कोणतीच इच्छा राहिली नव्हती. ‘मला रामायण पहायचे आहे’, ही एकच इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्या कालावधीत ते एका दिवसात रामायणाचे पाच-पाच भाग पहात असत आणि पुष्कळ आनंदी रहात.
४. आध्यात्मिक बैठक असलेले दिग्दर्शक आणि निर्माते रामानंद सागर !
४ अ. हिंदु संस्कृती आणि प्रभु श्रीराम यांवर अनन्य श्रद्धा असणे : ‘रामायण दूरचित्रवाणीवर साकार होण्याचे संपूर्ण श्रेय रामभक्त रामानंद सागर यांना जाते. या मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक रामानंद सागर यांची आध्यात्मिक बैठक पक्की होती. हिंदु संस्कृती आणि प्रभु श्रीराम यांवर त्यांची अनन्य श्रद्धा होती.
४ आ. रामानंद सागर यांनी रामायण मालिकेसाठी त्यांचे जीवन समर्पित केलेले असणे आणि दूरचित्रवाणीवर रविवारी सकाळी ९.३० वाजता ‘रामायण’ ही मालिका प्रसारित केली जात असल्याने त्या वेळी भारतातील रस्ते निर्मनुष्य असणे : रामानंद सागर यांनी रामायणासाठी त्यांचे जीवन समर्पित केले होते आणि म्हणूनच त्या काळात म्हटले जायचे, ‘‘चारशे वर्षांनंतर संत तुलसीदासांनंतर पुन्हा एकदा भारताच्या घराघरात प्रभु श्रीरामाविषयी भक्तीभाव निर्माण करण्याचे श्रेय जर कुणाला जाते, तर ते आहेत रामानंद सागरजी !’’ याची पोचपावतीही त्या काळातील लोकांनी मोठ्या श्रद्धेने दिली आहे. त्या वेळी प्रत्येक रविवारी सकाळी ९.३० वाजता अनेक घरांतील लोक दूरचित्रवाणी संचाला हार घालून उदबत्ती ओवाळून मगच रामायण पहात. त्या वेळेत भारतातील गल्लीबोळात एकही व्यक्ती दिसत नसे; कारण त्या वेळी जणू अवघ्या भारताला रामानंद सागरजी रामलीला अनुभवण्यासाठी त्रेतायुगात घेऊन गेलेले असत. एवढ्या परिणामकारक पद्धतीने आणि तळमळीने दृक्श्राव्य माध्यमाचा वापर करून हिंदूंचे आदर्श महाकाव्य रामायण जनतेपर्यंत पोचवणारा निर्माता आणि दिग्दर्शक पुन्हा होणे नाही.
५. ‘आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी साधनेची नितांत आवश्यकता आहे’, ही शिकवण परात्पर गुरु डॉ. आठवले अनेक वर्षांपासून देत असणे
आजही जेव्हा रामायणाचे पुनर्प्रसारण झाले, तेव्हा भारतातील रस्ते निर्मनुष्य होते. फरक एवढाच आहे की, त्या वेळी आपली श्रद्धा अधिक कार्यरत होती आणि आज श्रद्धा तर आहेच; पण त्यासह कोरोनारूपी राक्षसाचे भय आहे. हा राक्षस आपत्काळ बनून ‘आ’ वासून समोर उभा ठाकला आहे. अशातच भारतवासियांना जणू यातून वाचवण्यासाठी रामायणातील शिकवण आधार देत आहे आणि तळमळीने स्वतः प्रभु श्रीरामच सांगत आहे, ‘उत्तिष्ठत जाग्रत । प्राप्य वरान् निबोधत ।’, म्हणजे ‘उठा, जागे व्हा ! श्रेष्ठ, आत्मज्ञानी सत्पुरुषांच्या सान्निध्यात जा. आत्मबोध मिळवा.’
काळ भयंकर आहे. वाचायचे असेल, तर ‘साधना करणे’, हेच प्राप्त कर्तव्य आहे. ‘साधनेला दुसरा पर्याय नाही’, हे आजवर अनेक द्रष्ट्या संतांनी सांगितले आहे. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अनेक वर्षांपासून साधकांना आणि हिंदूंना आपत्काळाच्या भीषणतेविषयी अन् त्यासाठी साधनेची नितांत आवश्यकता असल्याचे सांगून वेळोवेळी जागृत केले आहे. आजही दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आपत्कालीन सिद्धतेच्या संदर्भात ते मार्गदर्शन करत आहेत. ‘असे त्रिकालदर्शी परात्पर गुरु लाभले’, हे आपले सौभाग्य आहे.
६. कुठे ‘रामायण’ ही मालिका आणि त्यातील आदर्श कलाकार, तर कुठे अलीकडील कलाकृती अन् कलाकार ?
६ अ. आज नाव, लौकिक आणि संपत्ती यांमागे असलेले कलाकार अधोगतीला जात असणे आणि त्यामुळे एक पिढी उद्ध्वस्त होणे : आज सिनेसृष्टीतील नाव, लौकिक आणि संपत्ती यांत न्हाऊन निघणार्या कलाकारांनी खरेच हे मिळवले आहे का ? जर उत्तर ‘नाही’ असे आहे, तर मग ‘ते करत असलेल्या भूमिकांमधून त्यांची उन्नती होत आहे कि अधोगती ? आजची कला कलाकारांना आणि त्यांच्या कौशल्याला कुठे घेऊन चालली आहे ?’, असे अनेक गंभीर प्रश्न एक कलाकार म्हणून मला पडतात. तेव्हा त्यांची उत्तरे निराशाजनक असतात; कारण भारतातील आजची एक पिढीच्या पिढी उद्ध्वस्त होत आहे.
६ आ. सिनेसृष्टीने आणि टीव्ही जगताने जागृत होऊन ‘रामायण’ मालिकेचा आदर्श समोर ठेवून अर्थपूर्ण मालिका आणि चित्रपट काढावेत ! : आजच्या सिनेसृष्टीने आणि टीव्ही जगताने आतातरी जागृत होऊन समाजाला चांगले शिकता येईल, अशा कलाकृती कराव्यात. ‘रामायण’ या मालिकेचा आणि त्यातील कलाकारांचा आदर्श समोर ठेवावा अन् समाजाला एकूणच आदर्श जीवन जगायला प्रेरणादायी ठरतील, अशा अर्थपूर्ण मालिका आणि चित्रपट काढावेत; कारण लोकांनाही ते हवे आहे. आता लोक निरर्थक धिंगाण्याला, तसेच नकारात्मकता पसरवणार्या, कलाकृतींच्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली इतिहासाची अन् पौराणिक कथांची मोडतोड करणार्या चित्रपटांना आणि मालिकांना कंटाळले आहेत.
गुरुमाऊलींनीच मला वरील विचार दिले आणि माझ्याकडून लिहूनही घेतले. ‘हे गुरुमाऊली, ‘या घनघोर आपत्काळात तुम्हीच आमचे रक्षण करत आहात’, त्यासाठी आमच्या मनात आपल्याप्रती अखंड श्रद्धाभाव वाढत राहू द्या. कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. शुभांगी शेळके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.४.२०२०)