‘अ सुटेबल बॉय’ वेब सिरीजच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार ! – मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

वेब सिरीजमध्ये मंदिरामध्ये मुसलमान प्रियकराकडून हिंदु प्रेयसीचे चुंबन घेण्याचे दृश्य आणि ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन !

वास्तविक केंद्र सरकारनेच अशा प्रकारच्या वेब सिरीजवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे !

भोपाळ (मध्यप्रदेश) – ‘नेटफ्लिक्स’वर प्रसारित झालेल्या ‘अ सुटेबल बॉय’ या वेब सिरीजमध्ये मध्यप्रदेशातील महेश्‍वर मंदिरामध्ये मुसलमान तरुण हिंदु प्रेयसीचे चुंबन घेत असल्याचे दृश्य आहे. याचा हिंदु धर्मप्रेमींकडून विरोध केला जात आहे. याविरोधात भाजपचे नेते गौरव तिवारी यांनी गुन्हा नोंदवला आहे.

या पार्श्‍वभूमीवर मध्यप्रदेशचे भाजप सरकारमधील गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, जर चुंबनाचे दृश्य मंदिरात चित्रीत झाले असेल, तर ही हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी घटना आहे. मी पोलिसांना या दृश्याचे परीक्षण करण्याचा आदेश दिला आहे. पोलीस अधिकारी परीक्षण करून सांगतील की, संबंधित नेटफ्लिक्स आणि वेब सिरीजचे निर्माता-दिग्दर्शक यांच्यावर धार्मिक भावना दुखावण्यासाठी काय कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

या वेब सिरीजवर बहिष्कार घालण्याची मागणी सामाजिक माध्यमांद्वारे केली जात आहे. ट्विटरवर #BoycottNetflix असा हॅशटॅग ट्रेंडही केला जात आहे. प्रसिद्ध लेखक विक्रम सेठ यांनी लिहिलेल्या ‘अ सुटेबल बॉय’ या पुस्तकावरून मीरा नायर यांनी या वेब सिरीजची निर्मिती केली आहे.