Delhi Soni Chhoti Murder Case : हत्येचा आरोप असलेली महिला जिवंत असल्याचे आढळल्यावर आरोपीला ६ वर्षांनंतर जामीन संमत

न्यायालयाचे पोलिसांवर ताशेरे

नवी देहली – एका महिलेच्या हत्येच्या प्रकरणात वर्ष २०१८ आजपर्यंत, म्हणजे ६ वर्षे कारागृहात असलेले मनजीत केरकेट्टा यांचा देहली उच्च न्यायालयाने जामीन संमत केला. ज्या महिलेच्या हत्येसाठी त्यांना कारागृहात पाठवण्यात आले होते, ती सोनी उपाख्य छोटी जिवंत आढळली आहे. तसेच ज्या तरुणीचा मृतदेह सापडला, तिची ओळख अद्याप पटलेली नाही. मनजीत यांच्या जामिनाला अन्य पक्षकाराने विरोध केला. त्या वेळी न्यायालयाने ‘मृत तरुणीची ओळख पटली नाही; म्हणून आरोपीला स्वातंत्र्यापासून वंचित ठेवता येणार नाही’, असे सांगत आरोपीला तात्काळ जामिनावर सोडण्याचे निर्देश दिले. मनजीत हे सोनी हिच्यासमवेत शेवटचे दिसल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

न्यायालयाने पोलिसांना फटकारले !

जामीनसंमत करतांना न्यायमूर्ती गिरीश कठपालिया म्हणाले, ‘‘या प्रकरणाच्या अन्वेषणाने न्यायालयाच्या विवेकाला धक्का बसला आहे. मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही.’’ या प्रकरणात निष्काळजीपणा दाखवल्याविषयी न्यायालयाने पोलिसांनाही फटकारले. न्यायालयाने म्हटले की, अन्वेषणावर देखरेख ठेवणे, ही केवळ अन्वेषण करणार्‍या पोलिसांचे दायित्व आहे, असे नाही, तर वरिष्ठ अधिकारीही याला उत्तरदायी आहेत; पण असे दिसते की, त्यांनी कठोर परिश्रम केले नाहीत.

संपादकीय भूमिका

  • पोलिसांच्या चुकीच्या अन्वेषणामुळे एका निरपराध व्यक्तीची ६ वर्षे कारागृहात गेली. त्याला उत्तरदायी असणार्‍या पोलिसांना कारागृहात टाकणे आवश्यक आहे !
  • या खटल्यामुळे पोलीस कशा प्रकारे अन्वेषण करतात ?, हेच दिसून आले आहे. अशांकडून कायद्याच्या राज्याची काय अपेक्षा करणार ?