मुंबईत मालाड येथे ठेकेदाराचा प्रताप; गाळाचे अधिक डंपर दाखवून पैसे लाटण्याचा प्रयत्न !

५० मीटरच्या छोट्या नाल्यातील गाळ नेण्याचे नाटक १५ दिवसांपासून चालू !

गाळ न काढण्यात आलेला नाल्याचा काही भाग

मुंबई, २३ एप्रिल (वार्ता.) – मालाड (पूर्व) मधील प्रतापनगर येथील एका छोट्या नाल्याच्या साधारण ५० मीटर अंतरातील गाळ मागील १५ दिवसांपासून नेण्याचे नाटक ठेकेदाराकडून चालू आहे. आधीच ‘डेब्रिज’ भरून आणलेल्या डंपरमध्ये वरवर गाळ ठेवून गाळाचे अधिक डंपर झाल्याचे दाखवले जात आहेत. हा सर्व प्रकार दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने चित्रीत केला आहे.

प्रतापनगरमधील हा नाला साधारण ७० मीटर लांबीचा आणि साधारण ८-९ फूट रूंद आहे. या नाल्यातील साधारण ५० मीटर भागातील गाळ काढून येथील ‘माऊली डिझायर’ या इमारतीच्या मागे हरित पट्ट्यासाठीच्या राखीव जागेत ठेवण्यात आला आहे. हा गाळ १५-२० डंपरमधून सहज जाईल इतका आहे; मात्र मागील १५ दिवसांपासून केवळ डंपरमध्ये वरवर गाळ ठेवून दिवसाला १०-१२ डंपर गाळ नेल्याचे दाखवण्यात येत आहे.

जागरूक नागरिकांनी ‘सनातन प्रभात’ला माहिती दिली !

गाळ नेण्यासाठी आलेला डंपर

काही स्थानिक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी याविषयी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला माहिती दिली. १६ एप्रिल या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पहाणी करून याविषयी निश्चिती केली. त्या वेळी तेथे चौधरी या अडनावाचे पर्यवेक्षक (सुपरवायझर) कामाची पहाणी करत होते. तेथे गाळ नेण्यासाठी आलेले २ डंपर आधीच ‘डेब्रीज’ने भरलेले उभे होते आणि एका डंपरमध्ये गाळ भरण्यात येत होता. ज्या डंपरमध्ये गाळ भरण्यात येत होता, तोही आधीपासूनच ‘डेब्रिज’ने भरलेला होता. हे सर्व चित्रीकरण दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने केले आहे.

पर्यवेक्षकाचा खोटारडेपणा आणि ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराने हटकल्यावर अपप्रकार केल्याची स्वीकृती !

लाल मातीने आधीच भरलेल्या डंपरमध्ये वरवर टाकण्यात आलेला काळा गाळ

‘एवढ्या छोट्या नाल्यातील गाळ नेण्यासाठी इतके दिवस का लागत आहेत ? किती दिवसांपासून गाळ नेण्याचे काम चालू आहे ?’ असे विचारले असता पर्यवेक्षक चौधरी यांनी ५ दिवसांपासून काम चालू असल्याची खोटी माहिती दिली. त्यावर दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने १० दिवसांपासून काम चालू असल्याचे सांगितल्यावर त्यांनी मान्य केले. गाळ नेण्यासाठी येणारे डंपर आधीच ‘डेब्रिज’ने भरलेले असल्याविषयी विचारणा केल्यावर असे होत असल्याचे मान्य करत हे काम ‘एन्.सी. इंफ्रा’ या ठेकेदाराकडून चालू आहे. हा गाळ घोडबंदर येथे नेण्यात येत आहे. आजूबाजूलच्या अन्यही काही नाल्याचा ठेका या आस्थापनाकडे आहे, अशी माहिती पर्यवेक्षक चौधरी यांनी दिली.

या वेळी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने आजूबाजूच्या काही नागरिकांना कामाविषयी माहिती विचारली असता काही नागरिकांनी ‘डेब्रिज’ने आधीच भरलेले डंपर गाळ नेण्यासाठी येत असल्याचे सांगितले. याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे स्थानिक नेते वैभव मालंडकर यांना दूरभाष केला असता त्यांनी ‘याविषयी माहिती घेतो’, असे सांगितले. या नाल्यातील गाळ उपसाच्या कामाचे उद्घाटन करणार्‍या भाजपच्या माजी नगरसेविका दक्षा पटेल यांना ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने दूरभाष केला असता त्यांनी ‘कार्यालयात प्रत्यक्ष भेटून बोलू’, असे सांगितले.

संपादकीय भूमिका 

प्रतापनगरमधील या नाल्यातील गाळ काढण्याच्या नावाखाली ठेकेदार गाळाचे अधिक डंपर दाखवून कामात भ्रष्टाचार करत आहे. या भ्रष्टाचारात केवळ ठेकेदाराच सहभागी आहे कि प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेतेही सहभागी आहेत ?, याविषयी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने चौकशी करावी !