आयुर्वेदीय वैद्यांना नाक, कान, गळा, डोळे, दात आणि हाडे यांच्यावर शस्त्रकर्म करण्याची केंद्र सरकारची अनुमती

आयुर्वेदाला प्रोत्साहन देणारा केंद्र सरकारचा अभिनंदनीय निर्णय !

नवी देहली – केंद्र सरकारने आयुर्वेदीय वैद्यांना आता नाक, कान, गळा, डोळे, दात आणि हाडे यांच्यावर शस्त्रकर्म करण्याची अनुमती दिली आहे. आयुर्वेदातील पदव्युत्तर विद्यार्थी हे शस्त्रकर्म करू शकणार आहेत.  देशात आयुष चिकित्सेद्वारे उपचार करणार्‍या वैद्यांकडून अ‍ॅलोपॅथीप्रमाणे अधिकार देण्याची मागणी सातत्याने केली जात होती.

(सौजन्य : TV9 Bharatvarsh)

१. केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आयुर्वेदाच्या शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये शस्त्रकर्म प्रक्रियेमध्ये प्रशिक्षणाचे सूत्र जोडण्यात येणार आहे. या अधिनियमाचे नाव आता ‘भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषद (स्नातकोत्तर आयुर्वेद शिक्षण) संशोधन विनियम, २०२०’ असे करण्यात आले आहे.

२. आता नव्या नियमानुसार शल्य (सर्जरी) आणि शालक्य चिकित्सा यासंदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना शल्यचिकित्सेच्या २ कलमांतर्गत प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच त्यांना एम्.एस्. (आयुर्वेद) जनरल सर्जरी आणि एम्.एस्. (आयुर्वेद) शालक्य तंत्र (नेत्र, कान, नाक, गळा, डोके आणि दंत चिकित्सा ) यांसारखी शस्त्रकर्म पदवी देण्यात येईल.

३. ‘इंटीग्रेटेड मेडिकल असोसिएशन’चे (‘आयुष’चे) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आर्.पी. पराशर यांनी म्हटले की, जगातील पहिले सर्जन सुश्रुतार्चाय होते. ते आयुर्वेद वैद्य होते. जगामध्ये शस्त्रकर्म ही आयुर्वेदाची देणगी आहे. अशा वेळी सरकार आयुर्वेदीय वैद्यांना शस्त्रकर्म करण्याची अनुमती देते, तर त्यामुळे कोणत्याच पॅथीवर संकट येणार नाही. ही अनुमती मिळणे हा आयुर्वेदाचा अधिकार आहे आणि तो आता मोदी सरकारने दिला आहे.

भारतीय वैद्यकीय परिषदेची सरकारच्या निर्णयावर टीका

भारतीय वैद्यकीय परिषदेने (इंडियन मेडिकल असोसिएशनने) या निर्णयावर टीका केली आहे. या परिषदेचे अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांनी म्हटले आहे की, मिश्रित चिकित्सा पद्धतीमुळे देशात संकरित डॉक्टरांना प्रोत्साहन मिळेल.

(म्हणे) ‘वैद्यकीय संस्थांमध्ये प्रवेश करण्याचा चोर दरवाजा उघडला जात आहे !’ – भारतीय वैद्यकीय परिषद

भारतीय वैद्यकीय परिषदेने (आय.एम्.ए.ने)  सरकारच्या या निर्णयाचा प्रखर विरोध केला आहे. तिने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वैद्यकीय संस्थांमध्ये प्रवेश करण्यासाठी आता चोर दरवाजा उघडला जात आहे. असे असेल, तर ‘नीट’सारख्या परीक्षांना काहीच अर्थ रहाणार नाही. सरकारने हा निर्णय मागे घेतला पाहिजे. आय.एम्.ए.ने लक्ष्मण रेषा ओढली आहे. ती ओलांडल्यास त्याचे घातक परिणाम होऊ शकतात.

आयुर्वेद चिकित्सा संस्थेने प्राचीन ज्ञानावर आधारित शस्त्रकर्मावर त्यांचे तंत्र विकसित करावे. आधुनिक वैद्यकीय शास्त्रावर आधारित हे अजिबात असू नये. त्यापासून दूरच रहावे. तसेच अशा वैद्यांची नियुक्ती आय.एम्.ए.च्या महाविद्यालयांमध्ये करू नये.