आपत्काळाची पूर्वकल्पना मिळूनही ‘दैव देते आणि कर्म नेते’, अशी स्थिती असणारे तथाकथिक बुद्धीप्रामाण्यवादी !

‘वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र स्थापन होणार आहे; मात्र त्यापूर्वीचा ३ ते ४ वर्षांचा कालावधी भीषण आपत्काळ असेल, असे अनेक ऋषि-मुनी, संत आणि भविष्यवेत्ते इत्यादींनी अनेक वर्षांपूर्वीच सांगितले आहे. वर्ष २०१९ मध्ये आलेला भीषण महापूर, वर्ष २०२० मध्ये आलेली कोरोना महामारी या आपत्काळाची चुणूक दाखवणार्‍या नैसर्गिक आपत्ती आहेत. या पार्श्‍वभूमीवर ‘आपत्काळात रक्षण होण्यासाठी कोणती काळजी घ्यावी ? भीषण नैसर्गिक आपत्तीत आणि युद्धकाळात उद्भवणार्‍या अडचणींवर कोणती उपाययोजना करावी ?’, यांविषयीचे लेख ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांतून नियमितपणे प्रसिद्ध होत आहेत. समाजातील तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी आणि विज्ञानवादी मात्र अशा प्रकारच्या लेखांवर टीका करत आहेत.

अश्‍विनी कुलकर्णी

१. निसर्गाला आणि काळाला रोखणे, हे केवळ भगवंताच्या हातात असणे : सत्य, त्रेता, द्वापर आणि कलि या ४ युगांंमध्ये काय काय घडणार आहे, याविषयी ऋषि-मुनी, संत यांनी लक्षावधी वर्षांपूर्वी सांगून ठेवले आहे. त्यानुसार घटना घडल्याची प्रचीतीही इतिहासाने वारंवार दिली आहे. वाल्मिकि ऋषींनी रामायण घडण्यापूर्वीच ते लिहिले होते आणि नंतर ते तसेच घडले, हा सत्य इतिहास सर्वांनाच ज्ञात आहे. सर्वसामान्य व्यक्तीने बुद्धीचा कितीही आव आणला, तरी तिला काही क्षणांनंतर काय घडणार आहे, हेही सांगता येत नाही. असे असूनही तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी केवळ बुद्धीच्या आणि पुस्तक वाचनांतून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे ऋषि-मुनी, संत यांनी सांगितलेल्या भविष्यवाणीला खोटे ठरवतात अन् त्याची अवहेलना करतात, त्यावर टीका करतात. हे कितपत योग्य आहे ? आपण कितीही नाकारला आणि विरोध केला; म्हणून आपत्काळ यायचा रहाणार नाही. निसर्गाला आणि काळाला रोखणे, हे केवळ भगवंताच्या हातात आहे, हे बुद्धीने स्वीकारायला हवे.

२. आपत्काळात प्रत्येक पाऊल कसे टाकावे, याविषयी भगवंत आपल्याला सावध करत असणे; मात्र संकुचित बुद्धीमुळे ते तथाकथित बुद्धीवंतांनी न स्वीकारणे : प्रत्यक्षात आपत्काळ केव्हा येणार ? त्याची तीव्रता किती असेल ? त्यासाठी कोणती उपाययोजना आधीपासून करून ठेवावी लागेल ? हे भगवंताच्या कृपेने आपल्याला किती आधीपासून आणि सहजपणे समजत आहे. त्याविषयी आपल्या प्रत्येकाच्या मनात किती कृतज्ञता असायला हवी. खरेतर आपत्काळात प्रत्येक पाऊल कसे टाकावे, याविषयी भगवंत आपल्याला सावध करत आहे; मात्र ते संकुचित बुद्धीमुळे न स्वीकारणे, त्याला खोटे ठरवणे, समाजाला आपत्काळासाठी सिद्ध होण्यापासून रोखणे, अशा बुद्धीला नेमके काय म्हणावे ? ‘दैव देते अन् बुद्धीहीन कर्म नेते’, अशी तथाकथित बुद्धीवंतांची अवस्था झाली आहे.

विचारवंतांनो, केवळ एका क्षणासाठी ‘आपत्काळ येणार आहे’, असा विचार करून सिद्धता केली, तर त्याने कोणाचीही हानी होणार नाही; पण केवळ विरोधासाठी विरोध केला, तर आपली अवस्था ‘संकटापासून रक्षण होण्यासाठी वाळूत तोंड खुपसून बसलेल्या शहामृगा’सारखी होईल, त्याचसमवेत समाजाला आपत्काळासाठी सिद्ध होण्यापासून परावृत्त केल्याचे पाप लागेल, ते वेगळेच !’

– अश्‍विनी कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.११.२०२०)