रशियामध्ये मुसलमान पुरुषांना मुसलमानेतर तरुणींशी विवाह करण्यावर बंदी

मुसलमान आध्यात्मिक प्रशासनाच्या तज्ञ सल्लागार मंडळाचा निर्णय

लव्ह जिहादच्या सहस्रो घटना घडणार्‍या भारतात कधीतरी अशी बंदी घातली जाईल का ?

मॉस्को (रशिया) – रशियामधील मुसलमान पुरुषांना मुसलमानेतर तरुणींशी विवाह करण्यास बंदी घालणारा धार्मिक निर्णय रशियाच्या मुसलमान आध्यात्मिक प्रशासनाच्या तज्ञ सल्लागार मंडळाकडून या आठवड्यात घेण्यात आला. त्यावर देशभरातील ज्येष्ठ मुसलमान धर्मगुरूंकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. इस्लामचा कायदा मुसलमान तरुणींना मुसलमानेतर पुरुषांशी लग्न करण्यास बंदी घालतो, तर मुसलमान पुरुषांना ज्यू आणि ख्रिस्ती तरुणींशी विवाह करण्याची अनुमती देतो.

१. या मंडळाने दिलेल्या निर्णयानुसार मुसलमान पुरुष आणि मुसलमानेतर तरुणी यांच्यातील आंतरधर्मीय विवाहांना अपवादात्मक घटनांमध्ये अनुमती आहे, ज्याला केवळ स्थानिक मुफ्तीच संमती देऊ शकतात.

२. उलेमा म्हणून ओळखल्या जाणार्‍या तज्ञ मंडळाने या निर्णयामध्ये म्हटले आहे की, बहुतेक आंतरधर्मीय विवादास्पद विवाहांमुळे अनेक समस्या उद्भवतात.

३. या मंडळाने या निर्णयामध्ये मुलांचे संगोपन करण्याविषयी संभाव्य मतभेद आणि अगदी भिन्न जागतिक दृष्टीकोन, संस्कृती अन् शिक्षण या विषयांवर लक्ष वेधले.

४. मंडळाने म्हटले की, रशियामध्ये बरेच आंतरधर्मीय विवाह होत आहेत. या प्रकरणांत असे दिसून आले की, जन्म झाल्यावर मुलांना त्यांचा कोणता धर्म आहे, हे ठाऊक नसते. बहुतेक प्रकरणांमध्ये पती, पत्नी आणि त्यांचे नातेवाइक यांच्यात वारंवार गैरसमज झाल्यामुळे आंतरधर्मीय विवाह मोडतात.

५. धर्मनिरपेक्ष रशियामधील ऑर्थोडॉक्स ख्रिस्त्यांनंतर इस्लाम हा दुसरा सर्वांत मोठा धर्म आहे. पुढील १५ वर्षांत रशियातील सध्याची २ कोटी मुसलमान लोकसंख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे.