गत ५० वर्षांपासून सातारावासियांचे ‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४’शी जिव्हाळ्याचे नाते आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या रस्त्याचे विशेष महत्त्व सातारकर अनुभवत आहेत. पूर्वीपासूनच या रस्त्यावर प्रचंड वाहतूक असल्याने या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचे मानांकन प्राप्त झाले. एकाच रस्त्यावर दुहेरी वाहतूक चालू असल्यामुळे नागरिकांना अपघात, वाहतूककोंडी अशा समस्यांना तोंड द्यावे लागत होते. स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात ‘स्वप्नील स्वर्णीम चतुर्भूज राष्ट्रीय महामार्गा’चे काम मार्गी लागले. महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक वाढली. पर्यायाने रस्त्याचे देखभाल-दुरुस्तीचे उत्तरदायित्वही वाढले. त्यामुळे कालपरत्वे ‘टेंडर पद्धती’ने जन्म घेतला.
आता कोणताही रस्ता बांधायचा किंवा रस्त्याचा पुनर्विकास करायचा झाला, तर किती ‘मलई’ खायला मिळेल, असा विचार रस्ते विकास आस्थापने करतात. ‘राष्ट्रसेवा’, ‘जनसेवा’ हे शब्द आता लुप्त होत चालले आहेत. रस्त्याच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार करून अत्यल्प दर्जाचे सिमेंट उपयोगात आणले जाते. महामार्गावर शेकडो किलोमीटर प्रवास केला, तरी कुठेही शौचालयाची सोय उपलब्ध नसते. पथकर नाक्यावर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणारे कर्मचारी, गुंड आदींचा भरणा असतो. महामार्गालगत असलेल्या संलग्न रस्त्यांची दुरावस्था झाली, तरी त्याकडे संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जाते. पादचार्यांसाठी पदपथ, गावाशेजारी महामार्गावर पादचारी पूल, महामार्गाला दुतर्फा जाळ्या या गोष्टी क्वचितच आढळतात. कोणत्याही राष्ट्राचा विकास हा तेथील दळणवळण यंत्रणेवर अवलंबून असतो. आता सातारा येथील राष्ट्रीय महामार्गाचे रूपांतर आंतरराष्ट्रीय महामार्गात झाले आहे. ‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४’ नाव पालटून आता ‘आंतरराष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८’, असे करण्यात आले. हा आंतरराष्ट्रीय महामार्ग देशातील देहली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू अशा ७ राज्यांतून जाणार आहे. या रस्त्याची लांबी अनुमाने २ सहस्र ८०० किलोमीटर एवढी असणार आहे. त्यामुळे हा महामार्ग देशाच्या प्रगतीमधील मैलाचा दगड ठरणार आहे; परंतु महामार्ग रस्ते विकास महामंडळाने वरील असुविधा टाळून या महामार्गाशी संबंधित सर्व सुविधांचा विकास केला, तर जनतेला सोयीचे होईल.
– श्री. राहुल कोल्हापुरे, सातारा