१. पू. (श्रीमती) राधा प्रभु यांनी बनवलेले हार ध्यानमंदिरात घेऊन जातांना आनंद मिळणे आणि ‘देवाला यातून काय शिकवायचे आहे ?’, याचे चिंतन करणे
‘पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी मंगळुरू सेवाकेंद्रातील ध्यानमंदिरातील देवतांच्या प्रतिमांसाठी प्रतिदिन पारिजातकाच्या फुलांचे हार बनवतात. त्यांनी बनवलेले फुलांचे हार आरतीच्या पूर्वी ध्यानमंदिरात आणायचे असतात. श्रीमती अश्विनी प्रभु अनेक दिवस ही सेवा करायच्या. ७ – ८ दिवसांपूर्वी पू. प्रभुआजींनी मला हाक मारली आणि ध्यानमंदिरात हार घेऊन जाण्यास सांगितले. ते हार नेतांना मला पुष्कळ आनंद मिळाला. मी हे पू. प्रभुआजींना सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘तुमची ही सेवा राहिली होती. ईश्वर प्रत्येकाकडून लहान-सहान सेवा करवून घेत असतो.’’ नंतर त्या प्रतिदिन मला हाक मारायच्या आणि मी फुलांचे हार ध्यानमंदिरात न्यायचे. फुलांचे सुंदर आणि चैतन्यदायी हार घेऊन जातांना माझे मन आनंदी व्हायचे.
मी चिंतन करत होते, ‘देवाला यातून मला काय शिकवायचे आहे ?’
२. सद्गुरु आणि संत यांनी ‘कर्तेपणा कसा घालवायचा ?’, याविषयी मार्गदर्शन करणे
२ अ. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी देवाला हार घालण्याच्या माध्यमातून भगवंताला शरण जाण्याविषयी सांगणे : २३.६.२०२० या दिवशी सकाळी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी भाववृद्धी सत्संगात सांगितले, ‘‘आपण देवाला (फुलांचा) हार घालतो; पण आपण देवापुढे हार (शरणागती) मानली आहे का ? तुम्ही हार मानली असेल, तरच देवाला हार घाला. जो हार मानून देवाला हार घालतो, त्याचा उद्धार होतो. ‘मी स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांच्याशी लढू शकत नाही. ते दूर करण्यासाठी मी बुद्धीने प्रयत्न करू शकत नाही आणि स्वतःच्या प्रयत्नांनी स्वतःत पालट करू शकत नाही’, हे जाणून भगवंताला शरण जायला हवे.’’
हे सूत्र ऐकल्यानंतर ‘पू. प्रभुआजी माझ्याकडून जी सेवा करवून घेत आहेत, त्यातून ‘मी कर्तेपणा सोडून भगवंताला शरण जायला हवे’, हे मला शिकवायचे आहे’, याची प.पू. गुरुदेवांनी मला जाणीव करवून दिली. पू. प्रभुआजी मला म्हणाल्या होत्या, ‘‘तुमची एवढी सेवा राहिली आहे.’’ त्यातून त्यांना मला ‘मी कर्तेपणा सोडून भगवंताला शरण जायला हवे’, असे सांगायचे होते’, याची मला जाणीव झाल्यानंतर माझी भावजागृती झाली. गुरुदेव संतांच्या माध्यमातून ‘मी कुठे अडले आहे ?’, हे सांगत आहेत आणि पुढील दिशा देत आहेत’, याची मला जाणीव होऊन माझी कृतज्ञता व्यक्त झाली.
२ आ. पू. राधा प्रभु यांनी ‘सेवा आनंदाने आणि निरपेक्षपणे केली, तर कर्तेपणा निघून जातो’, असे सांगणे : मी पू. राधा प्रभु यांना वरील अनुभूती सांगितली आणि त्यांच्या चरणी प्रार्थना केली, ‘‘आपल्या कृपेने माझ्यातील कर्तेपणा नष्ट होऊ शकतो. आपण माझ्यावर कृपा करा आणि माझ्यातील कर्तेपणा नष्ट करा.’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘सर्वांमध्ये कर्तेपणा असतो. सेवा आनंदाने आणि निरपेक्षपणे केली, तर आपल्यातील कर्तेपणा निघून जातो.’’ नंतर त्या मला म्हणाल्या, ‘‘तुमच्यातील कर्तेपणा निघून गेला आहे.’’ हे ऐकून माझी भावजागृती झाली आणि मला त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटली.
२ इ. मी ३ दिवसांपूर्वी पू. रमानंदअण्णा यांना ‘कसे प्रयत्न करू ?’, असे विचारले होते. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘स्वतःचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.’’
२ ई. या प्रसंगातून संतांची कृपा अनुभवणे : पू. प्रभुआजींनी मला सेवा देऊन प्रयत्नांची दिशा दिली; पण माझ्यात त्यामागील कार्यकारणभाव कळण्याची क्षमता नव्हती. गुरुदेवांनी सद्गुरु पिंगळेकाकांच्या माध्यमातून कार्यकारणभाव सांगितला. पू. रमानंदअण्णा यांनी मला स्थुलातून प्रयत्नांची दिशा दिली. यातून ‘संतांची कृपा कशी असते !’, हे मला शिकायला मिळाले.
३. प्रार्थना
‘गुरुदेवा, माझ्यातील कर्तेपणा केवळ आपल्याच कृपेने नष्ट होऊ शकतो. माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांचा नाश केवळ आपल्या अन् संतांच्या कृपेने नष्ट होऊ शकतो. त्यासाठी प्रयत्न करणेही माझ्या हातात नाही. मी आपल्या चरणी संपूर्णपणे शरण आले आहे. ‘आपणच माझ्यातील कर्तेपणा नष्ट करा’, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
४. कृतज्ञता
‘हे गुरुदेवा, तुम्ही मला संतांचा सत्संग आणि स्थुलातून संतांचे अस्तित्व अनुभवायला दिलेत अन् त्यांचे मार्गदर्शन देऊन माझ्यावर फार मोठी कृपा केली आहे. आपणच संतांच्या रूपाने माझ्यासारख्या अज्ञानी जिवाचे बोट धरले आहे. तुम्ही मला साधनेच्या प्रयत्नांची दिशा देऊन माझ्याकडून प्रयत्न करवून घेत आहात’, त्याविषयी आपल्या आणि आपले सगुणातील रूप असलेल्या सद्गुरु पिंगळेकाका, पू. (श्रीमती) राधा प्रभु आणि पू. रमानंदअण्णा यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– गुरुचरणी,
डॉ. (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे, मंगळुरू (२४.६.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |