पुणे – सरकारी रुग्णालयांना लागणारा औषधांचा पुरवठा करूनही महाराष्ट्रातील पुरवठादारांची सरकारकडे अनुमाने १७० कोटी रुपयांची रक्कम थकीत राहिली आहे. सरकारने ही रक्कम येत्या १७ नोव्हेंबरपर्यंत न दिल्यास सरकारी रुग्णालयांना पुन्हा औषधांचा पुरवठा थांबवण्यात येईल, अशी चेतावणी ‘ऑल इंडिया ड्रग अँड फूड लायसन्स होल्डर्स फाऊंडेशन’ने दिला आहे.
हाफकीन संस्थेकडून सरकारी रुग्णालयांसाठी औषधांची खरेदी प्रक्रिया राबवली जाते. जानेवारीमध्ये हाफकीन संस्थेने रुग्णालयांच्या औषधांसाठी निविदा प्रक्रिया जाहीर केली होती. अनुमाने २५० कोटी रुपयांच्या औषधांचा पुरवठा करण्यात आला होता. त्यातील पुरवठादारांची २२० कोटी रुपयांची रक्कम थकीत होती. ही रक्कम मिळवण्यासाठी ३ मासांपासून प्रयत्न करण्यात येत होते. सरकारकडून मागणीची नोंद घेतली जात नव्हती. अखेर १२ नोव्हेंबरपासून पुरवठादारांनी औषधांचा पुरवठा करण्यास नकार दिला. त्यानंतर हाफकीन संस्थेचे संचालक सौरव विजय यांनी सरकारद्वारे आम्हा पुरवठादारांची ४० ते ५० कोटी रुपयांची रक्कम दिली. त्यामुळे तूर्त आम्ही पुरवठा थांबवण्याची भूमिका स्थगित केली आहे. सरकारच्या आश्वासनामुळे आम्ही पूर्ववत् पुरवठा करीत आहोत, अशी माहिती ‘ऑल इंडिया ड्रग अँड फूड लायसन्स होल्डर्स फाऊंडेशन’चे राष्ट्रीय अध्यक्ष पांडे यांनी दिली.