मडगाव – सौदी अरेबिया सरकारकडून नियमावली जारी करत यावर्षी देशभरातून केवळ ३५ सहस्र भाविकांनाच हज यात्रेसाठी प्रवेश देण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्यामुळेच देशभरातील हज यात्रेसाठीची २१ पैकी ११ प्रस्थान स्थळे रहित करण्यात आली आहेत. त्यांपैकीच गोवा हे एक असल्याचे हज समितीचे अध्यक्ष जिना शेख यांनी सांगितले. काँग्रेसने याविषयी माहिती घ्यावी आणि त्यानंतरच भाजप सरकारवर टीका करावी, असेही शेख म्हणाले.
काँग्रेसच्या अल्पसंख्यांक गटाचे अध्यक्ष नाझीर खान यांनी २ दिवसांपूर्वी दाबोळी विमानतळ हे प्रस्थान स्थळ म्हणून रहित करणे, हे अन्यायकारक आहे, असे सांगून भाजप शासनावर टीका केली होती. यावर मडगाव येथे पत्रकार परिषद घेत हज समितीचे अध्यक्ष जिना शेख यांनी काँग्रेसच्या वतीने शासनावर करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन केले. या वेळी त्यांच्यासमवेत महबूब मकानदार, मलाली शेख, समीर बादेसाब हे हज समितीचे सदस्य उपस्थित होते. या वेळी जिना शेख म्हणाले की, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून कोणतीही माहिती न घेता चुकीचा संदेश पोचवला जात आहे.
याआधी गोव्यातील जनतेसाठी केवळ ६८ व्यक्तींनाच हज यात्रेसाठी अनुमती होती. मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर असतांना हज समितीच्या वतीने पाठपुरावा घेऊन ही अनुमती २०० व्यक्तींपर्यंत वाढवून घेण्यात आली. यानंतर राज्यातील मशिदींमध्ये जाऊन हज यात्रेसाठी भाविकांना आवाहनही केले; मात्र गेल्या ३ वर्षांची आकडेवारी पहाता पहिल्या वर्षी १२०, दुसर्या वर्षी १४० आणि मागील वर्षी १८० भाविकांनीच अर्ज केला होता. (हज यात्रेला जायचे नाही आणि विमानसेवा गोव्यातून नसल्याने मुसलमानांची हानी झाल्याचा कांगावा करायचा ! याला काँग्रेसचे राजकारण नाही तर काय म्हणायचे ? – संपादक)