हिंदूंनो, जीवनाचे अध्यात्मीकरण करण्यासाठी हे टाळा आणि हे करा !

‘आचारधर्म’ म्हणजे दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्टीचे अध्यात्मीकरण करणे, म्हणजे प्रत्येक गोष्ट सात्त्विक आणि चैतन्यमय करणे होय. धर्माचरण किंवा साधना करण्याची मनाची प्रवृत्ती सत्त्वगुणावर अवलंबून असते. सर्वसाधारण व्यक्ती रजोगुणी-तमोगुणी असल्याने ती लगेच साधनेकडे वळत नाही. आचारधर्माच्या पालनाने व्यक्तीची सात्त्विकता हळूहळू वाढू लागल्याने पुढे ती साधनेकडे वळते. दैनंदिन जीवनातील गोष्टी धर्माने सांगितल्यानुसार करणे, उदा. केर काढतांना आतून बाहेरच्या, म्हणजे दरवाज्याच्या दिशेने काढणे; यांसारख्या अनेक गोष्टी आचारधर्मात येतात. धर्मात सांगितलेल्या विविध आचारांमागील धर्मशास्त्र लक्षात घेतले आणि श्रद्धापूर्वक कृती केली की, त्यातून सात्त्विकता अन् चैतन्य कसे मिळते, हे आपल्या लक्षात येते. जेवढ्या अधिक कृती आपण धर्मशास्त्राप्रमाणे करू (उदा. वेशभूषा, केशभूषा, आहार इ.), तेवढी आपल्याला अधिक सात्त्विकता मिळून आपण सुखी आणि समृद्ध आयुष्य जगू शकतो. हिंदु संस्कृतीतील प्रत्येक आचार हा सात्त्विकता आणि चैतन्य प्रदान करणारा आहे.

सध्या आपण जगत असलेली जीवनशैली (विशेषतः शहरात) पूर्णतः पाश्‍चात्त्य संस्कृतीवर आधारित असल्याचे लक्षात येते. दिनचर्या, खाणे-पिणे, कपडे, अलंकार, आवडी-निवडी, सवयी आदी गोष्टींकडे बारकाईने बघा आणि ‘किती गोष्टी आपल्या मूळ हिंदु संस्कृतीतील आहेत’, असा प्रश्‍न स्वतःला विचारा. त्यांतील जवळजवळ सर्वच गोष्टी आपण पाश्‍चात्त्यांप्रमाणे करत असल्याचे लक्षात येते.

चित्र-विचित्र चित्रांचे टी-शर्ट नको, तर सात्त्विक पेहराव करा !

एखाद्या वस्तूची ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि शक्ती’ हे एकत्रित असतात, या तत्त्वानुसार भुतांच्या चित्रांतून त्रासदायक स्पंदने बाहेर पडतात आणि काळ्या शक्तीचे आवरण मन, बुद्धी अन् शरीर यांच्यावर येते. याउलट सात्त्विक रंगाचा पारंपरिक भारतीय पोषाख केल्याने त्या माध्यमातून देवतेचे चैतन्य कार्यरत राहून त्याचा मन, बुद्धी आणि शरीर यांवर सकारात्मक परिणाम होतो. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘पुरुषांसाठी आध्यात्मिकदृष्ट्या उपयुक्त असलेले कपडे’)

असात्त्विक आहार टाळा आणि सात्त्विक आहार घ्या !

पिझ्झा, बर्गर, फास्ट फूड, मांसाहार, मद्य यांसारख्या तमोगुणी आहाराचे व्यक्तीचे शरीर आणि मन यांवर दुष्परिणाम होतात. विचारही दूषित होतात. जसे विचार असतात, तशा कृती माणसाच्या हातून घडतात. असात्त्विक आहाराने रोग बळावतात, तसेच अनिष्ट शक्तींचा त्रास होण्याची शक्यता असते. घरी केलेले भोजन, फलाहार, दूध, तूप यांसारख्या सात्त्विक आहारामुळे व्यक्ती सत्त्वगुणी बनण्यास साहाय्य होते. सात्त्विक आहाराने मन समाधानी आणि आरोग्य चांगले रहाते. सत्त्वगुणी आहाराने तेज प्राप्त होते.

(संदर्भ : सनातनचे ग्रंथ ‘सात्त्विक आहाराचे महत्त्व’, ‘असात्त्विक आहाराचे दुष्परिणाम’)

केस मोकळे सोडू नका, तर सात्त्विक केशरचना करा !

केस मोकळे सोडणे म्हणजे वाईट शक्तींच्या प्रवेशाचे दार उघडे ठेवणे. मोकळ्या केसांच्या घर्षणातून निर्माण होणारी उष्ण ऊर्जा ब्रह्मांडात कार्यरत असणार्‍या त्रासदायक प्रवाहाला आकर्षित करणारी ठरते; म्हणूनच सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी केस मोकळे सोडून फिरणे यांसारख्या कृती निषिद्ध मानल्या जातात.

केस मोकळे सोडल्याने त्याच्या टोकातून वाईट शक्ती आत शिरतात. केसांतील त्रासदायक लहरींचा प्रवाह खंडित होण्यासाठी केस मोकळे न सोडता वेणी किंवा अंबाडा घालावा. त्यामुळे तोंडवळा सत्त्वगुणी दिसतो.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘केशरचना कशी असावी ?’)