पू. वामन राजंदेकर (वय १ वर्ष ११ मास) आणि त्यांची ६५ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून  पृथ्वीवर जन्माला आलेली बहीण कु. श्रिया राजंदेकर (वय ९ वर्षे) यांच्यातील आध्यात्मिक स्तरावरील दैवी नाते !

आज श्रावण पौर्णिमा (३.८.२०२०) या दिवशी असलेल्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने …

फोंडा (गोवा) येथील पू. वामन राजंदेकर आणि त्यांची बहीण कु. श्रिया राजंदेकर यांच्यात भावा-बहिणीचे कौटुंबिक नाते नसून आध्यात्मिक नाते आहे. कु. श्रिया ‘पू. वामन हे देव आहेत आणि स्वतः त्यांची भक्त आहे’, या भावाने विविध खेळ खेळते. श्रिया पू. वामन यांची आईसारखीच काळजी घेते. पू. वामन यांना श्रियाविना करमत नाही; मात्र असे असले, तरी ते तिला मानसिक स्तरावर न पहाता आध्यात्मिक स्तरावर पहातात. आज रक्षाबंधनानिमित्त त्यांच्या आईने त्यांच्यातील अशा या आगळ्या-वेगळ्या नात्यातील उलगडलेले विविध पैलू पुढे दिले आहेत.

भाग १

पू. वामन राजंदेकर
कु. श्रिया राजंदेकर

१. कु. श्रियाचा पू. वामन यांच्याप्रतीचा प्रेमभाव

अ. ‘पू. वामन आणि कु. श्रिया या दोघांचेही एकमेकांवर पुष्कळ प्रेम आहे. ती पू. वामन यांची अगदी आईसारखीच काळजी घेते. ते बाळ असल्यापासून बाहेर कुठेही जायचे असल्यास ‘मी सर्व साहित्य घेतले आहे ना ?’, याची ती स्वतः निश्चिती करते. बाहेर गेल्यावरही तिचे त्यांच्याकडे सतत लक्ष असते.

आ. श्रियाला पू. वामन यांना त्रास झालेला सहन होत नाही. त्यांना रात्री कितीही वाजता त्रास झाला किंवा ते उठले, तरी ती स्वतःहून उठते आणि ते झोपेपर्यंत प्रार्थना अन् नामजप करते.

इ. काही वेळा पू. वामन रडत असतांना श्रिया त्यांच्याजवळ जाऊन बसली आणि त्यांच्याशी बोलली की, ते रडायचे लगेच थांबतात.

२. श्रियाने पू. वामन यांना त्यांच्या जन्मापासून देवता आणि संत यांच्या गोष्टी सांगणे अन् नामजप अन् स्तोत्रे म्हणून दाखवणे

पू. वामन बाळ असल्यापासून त्यांना समजतील अशा परात्पर गुरु डॉक्टर, संत आणि श्रीकृष्ण यांच्या गोष्टी श्रिया त्यांना सांगते. पू. वामन मनापासून आणि लक्षपूर्वक गोष्टी ऐकतात अन् जमेल तसा प्रतिसादही देतात. श्रिया त्यांना नामजप आणि स्तोत्रे म्हणून दाखवते. तेव्हा पू. वामन तिच्याकडे एकटक पहात स्तोत्रे ऐकत असतात.

कु. श्रियाने पू. वामन यांना भावपूर्ण नमस्कार केल्यानंतर तिला आशीर्वाद देतांना पू. वामन

३. श्रियाचा समंजसपणा

पू. वामन जसजसे मोठे व्हायला लागले, तसे श्रिया त्यांना स्वतःसह खेळायला आणि चित्रे रंगवायला घेऊन बसते. ती बाहुली किंवा भातुकली खेळत असली, तरी पू. वामन यांना इतके छान समजावून सांगते की, तेसुद्धा आनंदाने तिच्यासह खेळतात. त्यांनी एखादे खेळणे मागितले, तर ती गार्‍हाणे न करता लगेच त्यांना देते. पू. वामन यांच्यासह त्यांना हवे तसे खेळण्यात श्रिया इतकी रमते की, तिला अन्य कुणी मैत्रीण लागत नाही.

४. पू. वामन बोलायला लागल्यावर सर्वप्रथम ‘ताई’ या शब्दातील ‘ता ता’ असे म्हणणे

पू. वामन यांचेही त्यांच्या ताईवर पुष्कळ प्रेम आहे. ते कुठेही असले, तरी त्यांना ‘श्रिया त्यांच्यासह असायला हवी’, असे वाटते. पू. वामन पहिल्यांदा बोलायला लागले. तेव्हा त्यांनी सर्वप्रथम श्रियाला ‘ता’ म्हणायला आरंभ केला. ते सतत ‘ता ता (म्हणजे ताई, ताई)’, असे म्हणतात. पू. वामन यांना कुणी खाऊ दिला, तर ते आधी ‘ता (म्हणजे ताईलापण द्या)’ असे म्हणतात. बाहेर कुठे जायचे असेल, तर ते आधी ‘श्रिया आमच्या समवेत आहे ना ?’, याची निश्चिती करतात.

५. श्रिया पू. वामन यांना बर्‍याच गोष्टी समजावून सांगत असणे

पू. वामन यांना समजायला लागल्यापासून (ते साधारण ४ मासांचे असल्यापासून) श्रिया त्यांना बर्‍याच गोष्टी समजावून सांगते. त्यामध्ये साधना, सेवा, घरातील कामे आणि तिचा अभ्यास, अशा अनेक अन् वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, उदा. पू. वामन १० मासांचे असतांना आम्ही फोंडा (गोवा) येथे रहायला आलो; मात्र अनिरूद्ध यांना काही कामानिमित्त सतत पुण्याला जावे लागायचे. बाबा घरी नाहीत; म्हणून पू. वामन रात्री रडायचे. तेव्हा श्रिया पू. वामन यांना मांडीवर घेऊन बसायची आणि सांगायची, ‘‘बाबा पुण्याला गेले आहेत. आपले तिकडे काम चालू आहे ना ! आपण चांगली साधना करायला इकडे आलो आहे. मग असे रडायचे नाही. तू रडलास, तर आई-बाबांना वाईट वाटेल ना ? चल, पटकन हस पाहू.’’ त्यानंतर खरेच पू. वामन काही वेळातच हसायचे.

कु. श्रिया गोष्ट सांगत असतांना ती लक्षपूर्वक ऐकून प्रतिसाद देणारे पू. वामन

६. आई रुग्णाईत असतांना श्रिया पू. वामन यांना अंघोळ घालत असणे आणि पू. वामन यांनीही त्या वेळी आनंदी अन् शांत राहून अंघोळ घालून घेणे

कधी मला बरे नसले, तर श्रिया पू. वामन यांना अंघोळसुद्धा घालते. मी तिला काहीही शिकवले नाही. केवळ माझे पाहून ती पू. वामन यांना ते ८ मासांचे असल्यापासून अंघोळ घालून सिद्ध करते. मी करत असलेल्या सर्व कृती तिने बारकाईने आणि क्रमानुसार समजून घेतल्या अन् ती त्या सर्व कृती तशाच करते. पू. वामन यांना अंघोळीला नेण्यापूर्वीच त्यांना नंतर लागणार्‍या सर्व वस्तू, म्हणजे त्यांचे घालायचे कपडे, पावडर, काजळ, औषध आणि दुधाची बाटली, असे सर्व ती व्यवस्थित काढून मांडून ठेवते, तसेच त्यांच्या झोपण्याची सिद्धता करते. पू. वामनसुद्धा आनंदाने आणि शांतपणे अंघोळ घालून घेतात. जणूकाही त्यांना कळत असावे, ‘आपली ताई वयाने लहान आहे; पण आपल्याप्रती भाव असल्याने इतक्या प्रेमाने ती आपले करते.’

७. श्रिया शाळेत गेल्यावर तिला आणि पू. वामन यांना एकमेकांची पुष्कळ आठवण येणे

श्रिया शाळेतून घरी आली की, ते दोघे एकमेकांना असे भेटतात, जणूकाही पुष्कळ दिवसांनी भेटले. कितीतरी वेळा वामनला सोडून शाळेत जावे लागते; म्हणून श्रिया रडते. तिला ते आवडत नाही. तिला त्यांची पुष्कळ आठवण येते, तसेच पू. वामनही ती शाळेत असतांना तेवढा वेळ ‘ता ता’ असेच करत असतात.

८. पू. वामन वयाने श्रियापेक्षा लहान असूनही तिने सात्त्विक वेशभूषा केल्यास त्यांनी तिच्याकडे कौतुकाने पहाणे

पू. वामन वयाने श्रियापेक्षा लहान आहेत; परंतु जेव्हा श्रिया एखाद्या कार्यक्रमासाठी सात्त्विक वेशभूषा करून सिद्ध होते, तेव्हा पू. वामन तिच्याकडे कौतुकाने पहात असतात. ‘ता, छान छान, सुंदर सुंदर’, असे ते हातांच्या हालचाली करून सांगत असतात. त्यांना श्रियाला बघून आनंद होत असतो.

९. श्रियाने परात्पर गुरुदेव, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासाठी रंगीत कागदापासून कमलपुष्प बनवणे अन् त्याचे पू. वामन यांना पुष्कळ कौतुक वाटणे

आता परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या काळात श्रियाने परात्पर गुरुदेव, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासाठी रंगीत कागदापासून कमलपुष्प बनवले होते. हे पुष्प बनवतांना पू. वामन पूर्णवेळ तिच्या समवेत बसले होते. त्यांना श्रियाचे पुष्कळ कौतुक वाटत होते. ते सारखे टाळ्या वाजवून तिचे कौतुक व्यक्त करत होते, तसेच त्या कमलपुष्पांना प्रार्थना करत होते. ते भावपूर्ण होण्यासाठी तिला आठवण करून देत होते. नंतर काही दिवसांनी त्यांनी ते कमलपुष्प आश्रमातील भोजनकक्षात पटलावर ठेवलेले पाहिले. त्या वेळी पू. वामन सर्व साधकांना फुलाकडे बोट करून ‘ता ता’, असे हसून म्हणत दाखवत होते. त्या वेळी ‘त्यांना श्रियाविषयी प्रेम आणि कौतुक वाटते’, याची अनुभूतीच येत होती.

१०. इतर साधक पू. वामन यांचे कौतुक करत असतांना श्रियाला ती आणि पू. वामन एकच असल्याचे जाणवणे

पू. वामन संत असल्यामुळे बर्‍याच वेळा त्यांची ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे चाचणी घेतात, तसेच साधक आणि इतरही त्यांचे कौतुक करत असतात. ‘याविषयी तुला काय वाटते ?’, असे श्रियाला विचारल्यावर ती म्हणते, ‘‘मी आणि पू. वामन एकच आहोत’, असे वाटते. त्यामुळे ‘त्यांचे कौतुक तेच माझे’, इतकेच वाटते. त्या वेळी माझ्या मनात वेगळा काहीच विचार येत नाही.’’

१० अ. पू. वामन आणि श्रिया आतून एकच असल्याची देवाने विविध प्रसंगातून प्रचीती देणे : ‘पू. वामन आणि श्रिया आतून एकच आहेत’, याची प्रचीती देवानेही बर्‍याच वेळा दिली आहे. पू. वामन यांच्या नामकरणाच्या वेळी देवाने श्रियाची आध्यात्मिक प्रगती झाल्याविषयीची बातमी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेखातून देऊन तिला आनंद दिला. (तिची आध्यात्मिक पातळी ६३ टक्क्यांवरून ६५ टक्के पातळी झाल्याची बातमी होती.) पुढे पू. वामन यांच्या संत सन्मान सोहळ्यात आणि नंतर होणार्‍या सर्वच भावसोहळ्यांमध्ये ‘पू. वामन आहेत, तेथे श्रियाच्या असण्याचे नियोजन देवच करतो’, असे मला जाणवले.

११. पू. वामन आणि श्रिया यांच्या बर्‍याच आवडी एकसारख्या असणे

श्रीकृष्ण आणि नारायण यांची भजने अन् रामायण बघणे दोघांनाही आवडते. त्यांचे घरातील कामे करणे, उदा. झाडणे, भांडी लावणे आणि स्वयंपाकघरात रमणे, हे समान आहे.

१२. पू. वामन आणि श्रिया यांचा खट्याळ अन् गोड असा हसण्या-रुसण्याचा खेळ !

आता पू. वामन यांना पळता येते. त्यामुळे ते श्रियाच्या मागे धावत असतात. काही वेळा पू. वामन बाळकृष्णाप्रमाणे तिचे एखादे खेळणे, पेन्सिल किंवा पुस्तक तिला दाखवतात आणि त्या वस्तू घेऊन पळत जातात अन् तिला देत नाहीत. मग श्रिया त्यांना वेगवेगळ्या प्रकारे हसत-खेळत ती वस्तू द्यायला सांगत असते. ते त्यांच्या लक्षात आल्यामुळे श्रियाच्या कोणत्याच प्रलोभनाला ते भुलत नाहीत. तिच्याकडे पाहून हसत असतात. शेवटी ती थकून त्यांना म्हणते, ‘‘जा वामन, मी नाही बोलणार.’’ मग ते तिला वस्तू देतात.

काही वेळा पू. वामन खोटे खोटे रडून दाखवतात. त्या वेळी ते श्रियाजवळ जातात. कधी रुसून बसतात. तेव्हा श्रिया त्यांची समजूत काढते. ‘ती आपली समजूत काढत आहे’, हे पाहून ते हळूहळू हसतात आणि एकदम मोठ्याने हसून दोघेही उत्साहात टाळ्या वाजवत नाचत असतात.’

– श्री. अनिरुद्ध आणि सौ. मानसी राजंदेकर (आई-वडील), फोंडा, गोवा. (२३.७.२०२०)

(क्रमशः उद्याच्या अंकात)

(भाग २. https://sanatanprabhat.org/marathi/387139.html या लिंकवर पाहू शकता)


येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक