प्रेमळ आणि संतांप्रती भाव असलेली ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची सांगली येथील कु. स्तुवी नावंधर (वय ११ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. स्तुवी केतन नावंधर ही या पिढीतील एक आहे !

(स्तुवी म्हणजे देवाची स्तुती करणारी.)

चैत्र कृष्ण एकादशी (२४.४.२०२४) या दिवशी कु. स्तुवी केतन नावंधर हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आजीच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. स्तुवी नावंधर

कु. स्तुवी केतन नावंधर हिला तिच्या ११ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

‘वर्ष २०१८ मध्ये ‘कु. स्तुवी केतन नावंधर उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२५ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५९ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१५.४.२०२५)


‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले     


पालकांनो, हे लक्षात घ्या ! 

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ 

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले   

१. प्रेमभाव

‘कु. स्तुवीला सर्वांबद्दल प्रेम वाटते. तिला घरी आलेल्या सर्वांबद्दल आदर वाटतो. तिला प्रत्येकाचा पाहुणचार करायला आवडतो. तिचे सर्वांशी आपुलकीचे वागणे असते.

२. ती साधकांशी जवळीक साधते.

३. देवाची आवड 

अ. स्तुवी गणपतिस्तोत्र, श्रीरामरक्षास्तोत्र, शिवतांडवस्तोत्र, हनुमानचालिसा इत्यादी स्तोत्रे म्हणते. तिला एक वर्षाचा भाऊ आहे. ती त्याला मांडीवर घेऊन श्लोकपठण आणि नामजप करते. ती संध्याकाळी दिवा लावून शुभंकरोती म्हणते. ती प्रार्थना करते.

सौ. निर्मला नावंधर

आ. आमच्या वसाहतीत गणपतीचे मंदिर आहे. स्तुवी शाळेत जाण्याआधी सकाळी ७ वाजता गणपतीच्या मंदिरात जाते. ती शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाते. तिला मंदिरात फळे आणि नैवेद्य देण्यात फार आनंद होतो.

इ. ‘आपला लहान भाऊ कृष्णच आहे’, असा तिचा भाव असतो. तो लहान असल्यामुळे आम्ही घरातील देवघर बंद करतो. त्या वेळी स्तुवीला खंत वाटते. तेव्हा तिला ‘सृष्टीच्या स्वामीला बंद केले’, असे वाटून ती देवाकडे सतत क्षमायाचना करते.

ई. आमच्या घरात प्रत्येक सण-उत्सव एकत्रित साजरे होतात. स्तुवी त्यात आनंदाने सहभागी होते. ती भजने म्हणणे, गरबा खेळणे, नृत्य करणे या सगळ्यात सहभागी होते.

उ. तिला दूरचित्रवाणी वहिन्यांवरील धार्मिक मालिका पहायला आवडतात.

४. तिला सात्त्विक भोजन आवडते. 

५. चुकांविषयी संवेदनशील

शाळेत किंवा अन्यत्र काही घटना घडल्यास ती विचारात अडकते. तेव्हा ‘आपण देवाला विसरलो’, हे तिच्या लक्षात येते. तेव्हा ती देवाच्या चरणी क्षमायाचना करते.

६. देव आणि संत यांच्या प्रती भाव

अ. तिच्याकडून चूक झाल्यास ‘देवाने सर्व चांगले केले. माझ्यामधील स्वभावदोषामुळे चूक झाली’, असे तिला आतून वाटते. तिचा भोळाभाव आहे.

आ. ती नेहमी ‘देवाच्या कृपेने झाले. देवाने साहाय्य केले’, असे सांगते. तिच्यात कृतज्ञताभाव आहे.

इ. एकदा आमच्या घरी पू. सदाशिव परांजपे (सनातनचे ८९ वे संत (वय ८२ वर्षे) आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे (सनातनच्या ९० व्या संत, वय ७६ वर्षे) आले होते. त्या वेळी स्तुवीने त्यांची पाद्यपूजा केली. एकदा आमच्या घरी सद्गुरु स्वाती खाडये आल्या होत्या. तेव्हा स्तुवी त्यांच्याशी बोलली. सद्गुरु स्वातीताई म्हणाल्या, ‘‘तिच्यात अहं नाही, तर सहजता आहे. ‘ईश्वर आपल्या समवेत अखंड आहे’, अशी तिची श्रद्धा आहे.’’

– सौ. निर्मला नावंधर (कु. स्तुवीची आजी, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६३ वर्षे), विश्रामबाग, सांगली. (२०.६.२०२४)