गुढीवरील तांब्याच्या कलशाचे महत्त्व !

गुढीवर तांब्याचा कलश उपडा घालतात. सध्या काही जण स्टीलचे किंवा तांब्याचे पेले किंवा मडक्याच्या आकाराची तत्सम काही भांडी गुढीवर ठेवत असल्याचे पहायला मिळते. ‘तांब्याचा कलश गुढीवर उपडा ठेवावा’ असे धर्मशास्त्र का सांगते ? हे लक्षात येण्यासाठी त्यामागचे अध्यात्मशास्त्रीय विवेचन येथे देत आहोत. यावरून आपल्या संस्कृतीचे अनन्यसाधारण महत्त्व आणि प्रत्येक कृती धर्मशास्त्रानुसार का करावी ?, हेसुद्धा लक्षात येईल !

१. गुढीवरील तांब्या उपडा का ठेवतात ?

तांब्याचे तोंड जमिनीकडे असल्याने तांब्याच्या कलशाच्या पोकळीतून प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे तांब्यात असलेली कडूलिंबाची पाने आणि रेशमी वसन (गुढीवरील रेशमी वस्त्र) हे सात्त्विक लहरींनी भारीत बनते. भूमीच्या आकर्षणशक्तीमुळे हा रूपांतरित सगुण ऊर्जाप्रवाह भूमीच्या दिशेने संक्रमित होण्यास आणि त्याचे भूमीवर सूक्ष्म-आच्छादन बनण्यास साहाय्य होते. तांब्याची दिशा सुलट ठेवली, तर संपूर्णतः ऊर्ध्व दिशेने लहरींचे प्रक्षेपण झाल्याने भूमीलगतच्या कनिष्ठ आणि मध्यम स्तराचे शुद्धीकरण न झाल्याने वायूमंडलातील केवळ ठराविक अशा ऊर्ध्व पट्ट्याचेच शुद्धीकरण होण्यास साहाय्य होते. याउलट तांब्याच्या कलशाच्या तोंडाची दिशा भूमीकडे ठेवल्याने त्यातून प्रक्षेपित होणार्‍या लहरींचा लाभ भूमीलगतच्या आणि मध्यम पट्ट्यातील वायूमंडलाला, यासमवेतच ऊर्ध्वमंडलाला मिळण्यास साहाय्य होते. – एक विद्वान (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या ‘एक विद्वान’ या टोपण नावानेही भाष्य करतात.) (१७.३.२००५, सायं. ६.३३)

२. तांब्याच्या कलशाची ब्रह्मांडातील सात्त्विक लहरी ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असणे !

गुढीवर असलेल्या तांब्याच्या कलशाची ब्रह्मांडातील उच्च तत्त्वाशी संबंधित सात्त्विक लहरी ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असल्याने या कलशातून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक लहरींमुळे कडूलिंबाच्या पानातील रंगकण कार्यरत होण्यास साहाय्य होते. या पानांच्या रंगकणांच्या माध्यमातून रजोगुणी शिव आणि शक्ती लहरींचे वायूमंडलात प्रभावी प्रक्षेपण चालू होते.

३. तांब्याच्या कलशातून संक्रमित झालेल्या निर्गुण लहरींचे कडूलिंब आणि रेशमी वस्त्र यांच्याकडून प्रभावी ग्रहण आणि प्रक्षेपण होणे

तांब्याच्या कलशातून संक्रमित झालेल्या निर्गुण कार्यरत लहरींचे कडूलिंबाच्या पानांच्या स्तराला सगुण लहरींमध्ये रूपांतर होते. त्यानंतर या लहरी रेशमी वसनाच्या (गुढीवरील रेशमी वस्त्राच्या) माध्यमातून प्रभावीपणे ग्रहण केल्या जाऊन त्या आवश्यकतेप्रमाणे अधोदिशेकडे प्रक्षेपित केल्या जातात.

४. कडूलिंब, कलश आणि वस्त्र या तिघांमधून निर्माण होणार्‍या लहरींनी वायूमंडल शुद्ध होणे

कडूलिंबाच्या पानांतून प्रक्षेपित होणार्‍या शिव-शक्तीशी संबंधित कार्यरत रजोगुणी लहरींमुळे अष्टदिशांचे वायूमंडल, तसेच तांब्याच्या कलशातून प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे ऊर्ध्व दिशेचे वायूमंडल आणि रेशमी वसनातून प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे अधोदिशेचे वायूमंडल शुद्ध अन् चैतन्यमय बनण्यास साहाय्य होते.

५. तांब्याचे तोंड भूमीच्या दिशेला असूनही ऊर्ध्व दिशेचे वायूमंडल शुद्ध होणे

गुढीतील घटकांना देवत्व प्राप्त झाल्यामुळे तांब्याच्या कलशाच्या पोकळीत घनीभूत झालेल्या नादलहरी कार्यरत होतात. या नादलहरींमध्ये वायू आणि आकाश ही उच्च तत्त्वे सामावलेली असल्याने तांब्याच्या कलशातून प्रक्षेपित होणार्‍या लहरींची गती ही उसळणार्‍या कारंजाप्रमाणे अन् ऊर्ध्वगामी असल्याने या लहरींच्या प्रक्षेपणामुळे ऊर्ध्व दिशेचे वायूमंडल शुद्ध होते.

६. तांब्यावर स्वस्तिक का काढावे ?

स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे. स्वस्तिकातून सात्त्विक स्पंदने बाहेर पडतात आणि त्यातील चैतन्यामुळे वातावरणातील त्रासदायक आवरण दूर होण्यास साहाय्य होते. त्यामुळे तांब्यावर कुंकवाने स्वस्तिक काढावे.