गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाचे पंचांग पूजन आणि श्रवण

गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांगावरील गणपतीचे पूजन करावे आणि पंचांगात दिलेले वर्षफल वाचावे. जुन्या काळात हे वर्षफल प्रत्येक घरी जाऊन ज्योतिषी वाचत असत. तो गुढीपाडव्याचा एक विधीच होता. अजूनही अनेक ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशीच सकाळी पंचांग घरी आणून त्याचे पूजन करून संवत्सर फलाचे वाचन श्रद्धापूर्वक केले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी घरात गोडधोड करणे, तो दिवस आनंदात घालवणे असा रिवाज आहे. हा दिवस आनंदात घालवल्यानंतर संपूर्ण वर्ष आनंदी जाते, अशी त्यामागची श्रद्धा आहे. हा दिवस केवळ आनंदाचाच नव्हे, तर अभिमानाचा म्हणूनही साजरा केला पाहिजे. आपल्याकडे साडेतीन मुहूर्तांना विशेष महत्त्व आहे. त्यांच्यापैकी गुढीपाडवा हा एक शुभमुहूर्त मानला जातो. साखरपुडा, विवाह, मुंज, गृहप्रवेश अशा सर्व मंगलकार्यांसाठी हा दिवस प्रशस्त समजतात.

– ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर (‘देवाचिये व्दारी’ पुस्तकामधून)