Crimson Crescent – Mayank Jain : चित्रपट निर्माते मयंक जैन यांच्या ‘क्रिमसन क्रेसेंट – द लास्ट क्वार्टर’ या “डॉक्युमेंटरी”चा प्रोमो (लघुपट) प्रदर्शित !

डॉक्युमेंटरीमध्ये मदरशांतील धार्मिक कट्टरता, घुसखोरी आणि हिंसेचे समर्थन करणार्‍या विचारधारा यांवर प्रकाश !

नवी देहली – सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते मयंक जैन यांचा १०५ मिनिटांच्या नव्या ‘क्रिमसन क्रेसेंट – द लास्ट क्वार्टर’ या “डॉक्युमेंटरी”चा प्रोमो (लघुपट) प्रदर्शित झाला आहे. या डॉक्युमेंटरीमध्ये पाकपुरस्कृत ‘आय.एस्.आय.’च्या फोफावलेल्या आतंकवादी कारवाया, मदरशांतील धार्मिक कट्टरता, घुसखोरी, तसेच हिंसेचे समर्थन करणारा नाझीवाद, साम्यवाद आणि जिहादवाद या विचारधारा, यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

चित्रपट निर्माते मयंक जैन

मयंक जैन यांची ‘क्रिमसन क्रेसेंट – द लास्ट क्वार्टर’ ही डॉक्युमेंटरी वर्ष २००५ मध्ये ज्येष्ठ ‘आय.पी.एस्.’ अधिकारी स्व. के.पी.एस्. गिल, प्रकाश सिंह आणि स्व. आर्.के. ओहरी यांच्या हस्ते प्रदर्शित झालेल्या ‘बांगला क्रेसेंट’ या माहितीपटाच्या कथानकावर आधारित आहे.

(सौजन्य : Mayank Jain)

१. ‘बांगला क्रेसेंट’ हा माहितीपट बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांत होणार्‍या धार्मिक कट्टरतेवर आधारित होता, तर ‘क्रिमसन क्रेसेंट – द लास्ट क्वार्टर’ या डॉक्युमेंटरीमध्ये या विषयाच्या कक्षा आणखी रूंदावण्यात आल्या आहेत. या डॉक्युमेंटरीमध्ये युरोप, मध्यपूर्व, आफ्रिका आणि पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात होणार्‍या स्थलांतरामुळे निर्माण झालेली अस्थिरता आणि सामाजिक संघर्ष यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

२. या डॉक्युमेंटरीमध्ये नाझीवाद, साम्यवाद आणि जिहादवाद या विचारधारांचा तुलनात्मक अभ्यासही मांडण्यात आला आहे. या तिन्ही विचारधारा सत्ता, संपूर्ण नियंत्रण आणि विरोध दडपणे, या त्रिसूत्रीवर आधारित आहेत. मयंक जैन म्हणतात, ‘‘या विचारधारा हिंसेचे समर्थन आणि उदात्तीकरण करतात. त्या धर्म किंवा क्रांती यांच्या नावावर अंधश्रद्धा पसरवून तर्कशक्तीला नमवतात. तर्कशक्ती हे मानवतेचे सर्वांत मोठे शस्त्र असून शिक्षण, विचारमंथन आणि मुक्त संवाद, हीच कट्टरतेवरची खरी उपाययोजना आहे’, असा विचार यात मांडण्यात आला आहे.’’

३. यासह या डॉक्युमेंटरीमध्ये ‘इस्लाममधील काही सुसंवादी विचारवंत, तसेच शास्त्रनिष्ठ मुसलमान कट्टरतेला आव्हान देत आहेत’, हेही मांडण्यात आले आहे.