भूमीच्या हद्द निश्चितीसाठी ५० लाख रुपयांची लाच घेणार्‍या २ अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा नोंद !

प्रतीकात्मक छायाचित्र

पुणे – भूमीची हद्द निश्चित करण्यासाठी एका व्यावसायिकाकडे ५० लाख रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणी भूमी अभिलेख विभागातील उपअधीक्षक अमरसिंह पाटील, भूकरमापक किरण येटोळे यांच्याविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला. लाच मागितल्यानंतर व्यावसायिकाने थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार दिली होती.

हडपसर परिसरातील तक्रारदाराच्या जागेची शासकीय शुल्क भरून मोजणी करण्यात आली होती. त्यांनी हद्द निर्धारण प्रक्रियेविषयी भूमी अभिलेख विभागाकडे अर्ज केला होता. भूमी अभिलेख विभागातील अधिकारी अमरसिंह पाटील आणि किरण येटोळे यांनी जून २०२४ मध्ये संबंधित कामासाठी ५० लाख रुपयांची मागणी केली. या प्रकरणी आरोपी येटोळे याने तडजोडीत २५ लाख रुपयांची मागणी केली होती, तसेच पैसे न दिल्यास काम होणार नाही, अशी धमकी दिली होती. अन्वेषणात दोन्ही आरोपींनी तक्रारदाराची हानी होण्याच्या उद्देशाने चुकीची ‘क’ प्रत सिद्ध केल्याचे उघडकीस आले.

संपादकीय भूमिका

लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांची समाजात छी थू होईल अशी शिक्षा त्यांना केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !