कचर्‍याचे ढिगारे बनले कुत्र्यांसाठी प्रजनन स्थळे !

फोंडा येथे ‘मिशन रेबीज’च्या सर्वेक्षणातील दावा

पणजी, २१ एप्रिल (वार्ता.) – दुर्गाभाट, फोंडा येथे १८ एप्रिल या दिवशी सकाळी कुत्र्यांच्या आक्रमणात अनाबिया शेख या १९ मासांच्या बालिकेचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर ‘मिशन रेबीज’ या संस्थेच्या अधिकार्‍यांनी नुकतीच घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा अभ्यास केला आणि गावात जनजागृती मोहीम राबवली.

‘मिशन रेबीज’च्या अधिकार्‍यांनी सर्वेक्षण करून एक अहवाल सिद्ध केला आहे. या अहवालात पुढील निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. या ठिकाणी कुत्र्यांची संख्या प्रचंड आहे. या परिसरात अनेक भटकी कुत्री आहेत आणि ही स्थानिकांना त्रासदायक ठरत आहेत.

उघड्यावर टाकण्यात येणारा कचरा आणि ठिकठिकाणचे कचर्‍याचे ढिगारे हे कुत्र्यांसाठी प्रजनन स्थळ बनले आहे. १८ एप्रिल या दिवशी अनाबिया शेख ही बालिका एकटीच रस्त्यावर आली आणि ती कुत्र्यांची शिकार बनली असावी. या भागात त्वरित आणि दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे, तसेच जनजागृतीसह प्राण्यांची जन्मनियंत्रण योजना राबवणे महत्त्वाचे आहे.