‘दैनिक सनातन प्रभात’चे कार्य !
मागील २५ वर्षांच्या कालावधी पहाता ‘दैनिक सनातन प्रभात’ आता ‘धर्मरक्षक’ होऊन हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी आहे. हिंदूसंघटन, मंदिररक्षण, धर्मांतर रोखणे, मंदिर सरकारीकरण रोखणे, गड-दुर्ग मोहीम, मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू करणे, विरोधकांना रोखणे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी निर्भीडपणे मांडणे, लव्ह जिहाद, लँड (भूमी) जिहाद, हलाल याविषयी समाजजागृती करत हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी अखंड कार्यरत आहे.
वाचकांचा सहभाग !
आरंभी दैनिकाने समाजाच्या विरोधाला सामोरे जाऊन सत्य समोर आणले आणि समाजाला सकारात्मक केले. परिणामी समाजातील बरेच जण राष्ट्र-धर्माच्या कार्यात सहभागी होऊन सनातन संस्था सांगत असलेले साधनेचे प्रयत्न करत आहेत. दैनिकातून हिंदु धर्माची माहिती मिळाल्यामुळे बरेच वाचक साधनेस प्रवृत्त झाले आहेत.
विरोधकांवरही कौतुक करण्याची वेळ !

ज्यांनी दैनिक अधिक काळ चालणार नाही’, असे म्हटले होते, ते दैनिकाला २५ वर्षे झाल्याविषयी आश्चर्य व्यक्त करत आहेत.
ईश्वराचे दैनिक !
हे दैनिक ईश्वराचे असल्यामुळे अखंड सेवारत असते. दैनिकाशी सेवा करणार्या साधकांनी यासंदर्भातील कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण घेतलेले नाही. तरीही लेखांचे संकलन करणे, बातम्या करणे, संरचना करणे, लेख लिहिणे, विज्ञापने मिळवणे, वितरण करणे आदी सर्व सेवा साधक ईश्वराची सेवा म्हणून करतात. ‘साधकांच्या माध्यमातून ईश्वरच कार्य करतो’, हे अनुभवायला मिळते, या सेवेतून मिळणारा आनंद आम्हा साधकांसाठी अवर्णनीय-अनमोल आहे.
ईश्वरनिष्ठ दैनिक !
कुठलेही वर्तमानपत्र विज्ञापनांविना चालवणे हे उद्योजक अथवा राजकारणी यांच्या सहकार्याविना कठीण आहे. काही विज्ञापनदात्यांनी त्यांचे गिर्हाईक आणि अन्य धर्मीय यांच्या विरोधामुळे सनातन प्रभातला विज्ञापन देणे थांबवले. तरीसुद्धा काही वाचक, साधक, धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी आणि हितचिंतक यांच्या सहकार्यामुळे दैनिक ‘सनातन प्रभात’ प्रकाशित होत आहे. दैनिकामुळे साधकांना सच्चिदानंद गुरुदेवांच्या सत्संगाचा लाभ होतो.
दैनिक ‘सनातन प्रभात’ने समाजकंटक, देशद्रोही, धर्मद्वेष्टे यांविरुद्ध वैचारिक लढा दिला. धर्मांधता, अनैतिकता, भ्रष्टाचार यांविरुद्ध आवाज उठवला. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ या कार्यात सहभागी झाले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी समाजाला ‘दैनिक सनातन प्रभात’सारखा धर्मरक्षक दिल्याविषयी त्यांच्या चरणी कृतज्ञता ! दैनिकाला असाच पाठिंबा मिळू दे, अशी प्रार्थना !
– श्रीमती स्मिता नवलकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७३ वर्षे) सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.२.२०२५)