
मुंबई, १८ मार्च (वार्ता.) – पुण्यात कोणतीही ‘कोयता गँग’ अस्तित्वात नाही. विधीसंघर्षित मुले हातात कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात. सराईत गुन्हेगार या मुलांना हाताशी धरून दहशत निर्माण करून हप्ते गोळा करतात. त्यावर भारतीय न्याय संहितानुसार आता त्या मुलांच्या मागे असणार्या गुन्हेगारांवर अशा प्रकारच्या ‘आका’वर (‘सूत्रधारां’वर) गुन्हा नोंद करण्यास सोपे होणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की,
१. लहान मुलांना प्रोत्साहन देऊन, प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे प्रकार केले जात आहेत. गेल्या ३ वर्षांमध्ये अशा प्रकारच्या ९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. घटना झाल्यानंतर सी.सी.टी.व्ही.च्या माध्यमांतून गुन्हेगारांना पकडण्यात येत आहे.
२. त्या लहान मुलांना अमली पदार्थाचे व्यसन लावण्यात येते, हे खरे आहे. हे अमली पदार्थ ‘डार्क वेब’, ‘इन्टाग्राम’ यांचा वापर करून पुरवण्यात येतात, हे अन्वेषणातून समोर येत आहे.
३. अमली पदार्थ विक्री प्रकरणामध्ये पोलीस असतील, तर त्यांना बडतर्फ करण्यात येत आहे. अशा प्रकारे ७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. (जनतेचे रक्षक नव्हेत, तर भक्षक पोलीस – संपादक)
४. अमली पदार्थ हे पान टपर्यांवर मिळत असतील, तर शहरातील पान टपर्या लवकर बंद करण्यास पोलिसांना आदेश देण्यात येतील.