‘तक्रारी करा’ असे सांगणार्‍या; पण संपर्काची योग्य व्यवस्था न करणार्‍या प्रादेशिक परिवहन विभागाचा बोगसपणा उघड केला !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई आवृत्तीच्या २५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने विशेष लेखमाला !

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांची पत्रकािरता समाजाभिमुख आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून विविध सामाजिक, धार्मिक क्षेत्रांतील अपप्रवृत्तींच्या विरोधात ‘सनातन प्रभात’ने सातत्याने आवाज उठवला. शोध पत्रकारितेद्वारे ‘सनातन प्रभात’ने भ्रष्टाचार उघड केला. ‘सनातन प्रभात’मधील सत्य आणि वस्तूनिष्ठ वृत्तांकनामुळे अपप्रवृत्तींना प्रतिबंध बसला. या वृत्तांकनाचे उमटलेले पडसाद दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई आवृत्तीच्या २५ व्या वर्धापनदिनाच्या या विशेष लेखमालेद्वारा देत आहोत. 

महाराष्ट्रामध्ये विशेषत: सण-उत्सवांच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सकडून भरमसाठ भाडेवाढ केली जाते. याविषयीच्या ऑनलाईन तक्रारीसाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या (‘आर्.टी.ओ.’च्या) संकेतस्थळावर ‘ॲप’द्वारे, तर दूरध्वनीवरून तक्रारीसाठी सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयांत दूरध्वनी दिले आहेत. प्रत्यक्षात हे सर्व नावालाच होते. संकेतस्थळावरील ‘ॲप’ उघडतच नव्हते, तर बहुतांश कार्यालयांतील दूरध्वनी कुणी उचलत नव्हते. ‘आर्.टी.ओ.’कडून नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन तर करण्यात येत होते; मात्र तक्रार घेण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली नव्हती. प्रादेशिक परिवहन विभागाचा हा बोगसपणा दैनिक ‘सनातन प्रभात’ने उघड केला.

१. कार्यालयांतील संपर्क व्यवस्थेचा आढावा घेऊन पोलखोल !

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये विशेष मोहीम राबवून ‘आर्.टी.ओ.’च्या २१ कार्यालयांमध्ये ‘सनातन प्रभात’ प्रतिनिधींनी संपर्क केला. काही कार्यालयांमध्ये ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी स्वत: जाऊन संपर्क व्यवस्थेची माहिती घेतली. २१ पैकी ११ कार्यालयांतील दूरध्वनी बंद होते. ६ ठिकाणी दूरध्वनी उचलला नाही, तर केवळ ४ ठिकाणी तक्रार नोंद करून घेण्याची व्यवस्था कार्यरत होती.

श्री. प्रीतम नाचणकर

२. केवळ वृत्त देणारे नव्हे, उपाययोजना आणि पाठपुरावाही करणारे ‘सनातन प्रभात’ !

‘आर्.टी.ओ.’च्या या भोंगळ कारभाराविषयी केवळ वृत्त देऊन न थांबता दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी तत्कालीन परिवहन आयुक्त विवेक भीवनवार यांना याविषयीची माहिती दिली. त्यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले. या वेळी त्यांना एका निवेदनाद्वारे ‘ऑनलाईन तक्रारीची व्यवस्था’, ‘टोल फ्री’ क्रमांकाची व्यवस्था, खासगी ट्रॅव्हल्सवर तक्रार करण्यासाठी संपर्क क्रमांक लावणे आदी उपाययोजनाही सुचवण्यात आल्या. हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाने वेळोवेळी याविषयी प्रादेशिक परिवहन विभागाकडे तक्रार केली. दैनिक ‘सनातन प्रभात’नेही कार्यवाही होईपर्यंत याविषयीची वृत्ते सातत्याने लावून धरली.

– श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’, मुंबई. (१७.३.२०२५)

प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र संपर्क क्रमांक आणि ‘टोल फ्री’ क्रमांक चालू केला !

यावर उपाययोजना म्हणून नागरिकांना तक्रार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र क्रमांक घोषित करण्याचा आदेश प्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे. अनेक कार्यालयांनी तो चालूही केला आहे. ‘आर्.टी.ओ.’ संकेतस्थळावर ‘टोल फ्री’ क्रमांकही दिला आहे. यावर नागरिकांना स्वत:ची तक्रार आहे त्या ठिकाणाहून करता येणार आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’ने सातत्याने विषय लावून धरल्यामुळेच हा पालट झाला, असे निश्चितच म्हणता येईल.
– श्री. प्रीतम नाचणकर