
भारताच्या फाळणीला मान्यता देणार्या गांधींनीही स्वराज्यप्राप्तीच्या (स्वातंत्र्याच्या) उत्सवात भाग घेतला नाही; परंतु भारताच्या फाळणीचे कट्टर विरोधक असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मात्र स्वराज्यप्राप्तीचा संतोष व्यक्त केला आणि स्वत:च्या घरावर भगव्या ध्वजासहच तिरंगी राष्ट्रध्वजही उभारला. सावरकर यांची ही कृती त्यांच्या अनेक अनुयायांना अयोग्य वाटली काहीशी तत्त्वच्युतही वाटली; पण या निमित्ताने त्यांच्यावर घेतल्या गेलेल्या आक्षेपांना उत्तर देतांना सावरकर जे म्हणाले, ते सर्व देशभक्त हिंदूंनी लक्षात ठेवण्यासारखे आहे. सावरकर म्हणाले, ‘‘अरे ! कित्येक दशकापासून मवाळ-जहाल क्रांतीकारक असे सहस्रावधी देशभक्त आपापल्या परीने स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत होते. त्यांत सशस्त्र क्रांतीकारक होते, नि:शस्त्र प्रतिकार करणारे होते. सत्याग्रही होते. काही कारणाने प्रत्यक्ष कार्य करणारे नसले, तरी देशभक्तांच्या सर्व प्रकारच्या चळवळीविषयी मनात सहानुभूती असणारे असेही कित्येक होते. कित्येक फाशी गेले. कित्येक परागंदा झाले. कित्येकांनी फटके खाल्ले. कित्येकांनी दंडाबेडी सोसली. अनेकांनी संसाराकडे पाठ फिरवून वनवास स्वीकारला. असंख्य लोकांनी कारावास पत्करला, तेव्हा कुठे खंडित भारताचे का होईना, स्वराज्य आपणास लाभले आहे. जे पदरात पडले आहे, तेही काही थोडे नाही. पूर्वी कधी नव्हता इतका दोन तृतीयांश भारत आपल्या राजवटीखाली आला आहे. एक तृतीयांश आपल्या सत्तेखाली नाही. आपण सावध राहिलो असतो, दक्षता बाळगली असती, तर हाही प्रसंग आला नसता. आता झाले ते होऊन गेले. पुढील नव्या पिढीने उरलेला एक तृतीयांश भाग प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न साक्षेपाने करावा आणि पुन्हा अखंड भारतावर सार्वभौम सत्ता प्रस्थापित करावी. काहीच हाताशी नव्हते, तरी दोन तृतीयांश मिळाले. आता दोन तृतीयांश स्वाधीन असतांना उरलेला एक तृतीयांश स्वाधीन करून घेणे, हे आपणाला सहज शक्य आहे. तशी उत्कट इच्छा मात्र नव्या पिढीच्या अंत:करणात तीव्रतेने असली पाहिजे आणि सर्व प्रकारच्या प्रयत्नास धैर्याने, उत्साहाने लागले पाहिजे.’’
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ‘संघ प्रार्थना’ या ग्रंथातून)