‘औरंगजेब हा उत्तम प्रशासक !’ – समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचे हिंदुद्वेषी विधान !

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी

मुंबई – औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या राजवटीत भारताची सीमा ही अफगाणिस्तान आणि ब्रह्मदेश देशापर्यंत होती. त्याच्या काळात भारताला ‘सोने की चिडीयाँ’ म्हणायचे. औरंगजेबाच्या राजवटीत भारताचा जीडीपी २४ टक्के इतका होता. त्यामुळेच इंग्रज भारतात आले, असे विधान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधीमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले.

ते म्हणाले की, देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे. औरंगजेबाने त्याच्या काळात अनेक मंदिरे बांधली होती. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता. त्या काळातील लढाई ही धर्मासाठी किंवा हिंदू-मुसलमान अशी नव्हती.

छत्रपती संभाजी महाराजांविषयीचा प्रश्न ऐकून अबू आझमींचे पलायन !

माध्यम प्रतिनिधींनी अबू आझमी यांना ‘औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना ज्याप्रकारे मारले, ती कृती योग्य होती का ?’, असा प्रश्न विचारला; मात्र ते उत्तर न देताच तेथून निघून गेले.

मान्यवरांच्या प्रतिक्रिया

महापापी औरंगजेबाला उत्तम प्रशासक म्हणणार्‍या अबू आझमी यांना लाज वाटायला हवी ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

औरंगजेबाने हिंदूंवर अन्याय, अत्याचार केले, हिंदूंची मंदिरे तोडली. हिंदु स्त्रियांची अब्रू लुटली. धर्मपरिवर्तन केले, असा औरंगजेब चांगला प्रशासक कसा होऊ शकतो ? त्याला तसे म्हणणे हे दुर्दैवी आहे. उलट औरंगजेब महापापी होता. त्याच्याविषयी असे विधान करणार्‍या अबू आझमी यांना लाज वाटायला हवी. देशभक्त आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान केल्याच्या प्रकरणी अबू आझमी यांनी माफी मागावी. आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान सहन करणार नाही.

अबू आझमी यांना इतिहास ठाऊक नाही ! – राम कदम, आमदार, भाजप

राम कदम, आमदार, भाजप

अबू आझमी यांना इतिहास ठाऊक नाही. त्यांचे वक्तव्य चुकीचे आहे. उद्या ते सभागृहात येतील, तेव्हा मी त्यांना इतिहासाचे पुस्तक देणार आहे. औरंगजेबाने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना कशाप्रकारे बंदीवासात ठेवले, त्यांचा कशा प्रकारे अनन्वित छळ केला, हे अबू आझमी यांना ठाऊक नाही का ?

औरंगजेबाविषयी विधाने करणारे सुपारी घेतात का ? – आदित्य ठाकरे, आमदार, ठाकरे गट

औरंगजेबाविषयी अशी विधाने करणारे सुपारी घेऊन वादाची ठिणगी निर्माण करतात का, हे पहायला हवे. अशा प्रकारे अवमान करणार्‍यांवर कारवाई केली पाहिजे.

संपादकीय भूमिका

  • औरंगजेबाचा हिंदुद्वेष्टेपणा इतिहासात उघड आहे. त्याने आतापर्यंत अनेक मंदिरांचा विध्वंस केला आहे. स्वतःच्या भावांना कपटाने ठार मारले. त्याने जन्मदात्या बापाला कारागृहात डांबले अन् स्वतः बादशाह पद मिळवले. असा औरंगजेब उत्तम प्रशासक कसा होऊ शकतो ? तो क्रूरकर्माच होता, हे सर्व हिंदू जाणून आहेत !
  • सध्या छत्रपती संभाजी महाराजांवरील ‘छावा’ चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळालेली असतांना, तसेच सर्वांसमोर औरंगजेबाचे क्रौर्य उघड झालेले असतांनाही अबू आझमी इतके बेधडक विधान कसे करू शकतात ? याचा अर्थ त्यांना कसलीच भीती उरलेली नाही, हे दिसून येते !
  • छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाचे समर्थन करणार्‍यांवर कारवाईच व्हायला हवी !
  • ‘छावा’ चित्रपट पहाणार्‍या हिंदूंनी केवळ त्याचे कौतुक न करता औरंगजेबाचे समर्थन करणार्‍या अबू आझमी यांना संघटितपणे वैध मार्गाने विरोध करत छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे धर्मकर्तव्य बजावा !