सिंधुदुर्ग – महाराष्ट्र राज्य वीज वितरण आस्थापनाच्या (महावितरणच्या) कोकण परिमंडळातील वीजग्राहकांना एप्रिल किंवा मे महिन्याच्या वीजदेयकासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी स्वतंत्र देयक पाठवण्यात येत आहे. ही अतिरिक्त सुरक्षा ठेव महाराष्ट्र विद्युत् नियामक आयोगाच्या नियमानुसार असून सर्व वीजग्राहकांनी या रकमेचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
महाराष्ट्र विद्युत् नियामक आयोगाच्या विद्युत् पुरवठा संहिता-२०२१ च्या विनियम १३.१ नुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारली जाते. या सुरक्षा ठेवीची प्रतिवर्षी पुनर्गणना केली जाते. ग्राहकांनी भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँकेच्या प्रचलित दरानुसारचे व्याज (सध्याचा व्याज दर ६ टक्के) वीज देयकामध्ये समायोजित करून ग्राहकांना परत केले जाते. लघुदाब वीजग्राहकांना ही अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम घरबसल्या भरण्याची सोय महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर आणि महावितरणच्या ‘मोबाईल ॲप’वर उपलब्ध आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.