दायित्व चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळो ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांखळी येथील श्री दत्त मंदिरात केली पूजा

सांखळी,  २४ एप्रिल (वार्ता.) – राज्यातील जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास टिकवून ठेवणे, हेच माझे सर्वांत मोठे दायित्व आहे. हे दायित्व मला अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळू दे. जनतेची सेवा करणे, हेच माझे ध्येय आहे आणि त्यासाठी मी सदैव कटीबद्ध आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा २४ एप्रिल या दिवशी वाढदिवस होता. त्यानिमित्त त्यांनी सकाळी सांखळी येथील श्री दत्त मंदिराला भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील जनतेला शांती, समृद्धी आणि आनंद मिळावा, यासाठी प्रार्थना केली. मंदिर समितीच्या पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे स्वागत केले आणि त्यांना दत्तगुरूंचा प्रसाद भेट दिला.

केक, पुष्पुच्छ स्वीकारण्यास दिला नकार !

पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वाढदिवस साजरा करणे रहित केलेले असले, तरी सांखळी येथील निवासस्थानी सकाळीच त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली. अनेकांनी वाढदिवसाचे केक आणले होते; मात्र मुख्यंमत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केक कापण्यास सरळ नकार दर्शवला, तसेच पुष्पगुच्छ स्वीकारण्यासही सरळ नकार दिला. केवळ हस्तांदोलन करून मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सकाळी श्री देव रुद्रेश्वर, दत्तवाडी येथील श्री दत्त मंदिर आणि सुर्ल येथील देवतांचे दर्शन घेतले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांखळी येथील वैद्यकीय शिबिराला दिली भेट

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्यावर राज्यभरातून चाहत्यांनी विविध माध्यमांतून शुभेच्छांचा वर्षाव केला. पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची वाढदिवस साजरा करण्याचे कार्यक्रम रहित केलेले असले, तरी २४ एप्रिल या दिवशी विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. ‘आपले आरोग्य निरोगी राखा, हीच आपणास गोमंतकियांकडून मोठी भेट ठरेल’, असे मुख्यंमत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वेळी म्हटले. वाढदिवसानिमित्त सांखळी येथील रवींद्र भवनात विनामूल्य वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराच्या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तेथे भेट दिली. या शिबिरात विविध तज्ञ डॉक्टरांकडून विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन करण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळांना विनामूल्य क्रिकेट साहित्य

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘गोवा क्रिकेट असोसिएशन’ने अभिनव उपक्रम घोषित केला आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत सर्व शाळा आणि उच्च माध्यमिक विद्यालये यांना विनामूल्य ‘क्रिकेट किट बॅग्स’ वितरित करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव शांभा देसाई यांनी केली.