पलूसचे (जिल्हा सांगली) साक्षात्कारी संत सद्गुरु श्री धोंडीराज महाराज !

पलूसचे साक्षात्कारी संत सद्गुरु श्री धोंडीराज महाराज यांच्या ११७ वी पुण्यतिथी आणि १८ वा रथोत्सव सोहळा यानिमित्ताने पलूस (जिल्हा सांगली) येथे विविध कार्यक्रम होत आहेत. यामध्ये २५ एप्रिलपासून यात्रा चालू होत आहे, तर २८ पासून पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने कार्यक्रम चालू होत आहेत. ते ६ मेपर्यंत चालणार आहेत. यात प्रतिदिन श्रींना अभिषेक, सकाळी ७ ते दुपारी १२ गाथा वाचन, दुपारी २ ते ४.३० महिला भजन, दुपारी ४.३० ते सायंकाळी ५.३० हरिपाठ, सायंकाळी ६ ते रात्री ८ कीर्तन होत आहे. सोमवार, ५ मे या दिवशी दुपारी २.३० ते रात्री ८ या वेळेत भव्य रथोत्सव आणि ग्रंथदिंडी सोहळा होणार आहे. यानंतर ६ मे या दिवशी काल्याचे कीर्तन होईल.

सद्गुरु धोंडीराज महाराजांनी त्यांचे गुरु अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने भरवलेली ही यात्रा होय. त्या निमित्ताने नामस्मरण, भजन, कीर्तन, अन्नदान सेवा असे या यात्रेचे स्वरूप असते. त्यासाठी मिष्टान्न म्हणून खिराचा सेवा असे या यात्रेचे स्वरूप असे. पुढे ही यात्रा धोंडीराज महाराज यात्रा म्हणूनच प्रचलित झाली. त्या निमित्ताने यात्रा झाल्यावर वैशाख शुक्ल प्रतिपदेला गाथा पारायण सोहळा चालू होऊन नामस्मरण, भजन, कीर्तन आणि अन्नदानाचा कार्यक्रम चालू रहातो. सद्गुरु धोंडीराज महाराज यांनी देह ठेवतांना आदल्या दिवशी पलूस येथील सर्व देवतांचे दर्शन घेतले, तो दिवस अष्टमीचा होय. त्यादिवशी रथोत्सव सोहळ्याचे आयोजन आणि नवमीला महाराजांची पुण्यतिथी साजरी केली जाते. महाराजांनी वैशाख शुक्ल नवमी वर्ष १९०८ ला देह ठेवला. पलूस आणि पंचक्रोशीतील लोकांसाठी सद्गुरु धोंडीराज महाराज हे आराध्य दैवत आहेत.

सांगली जिल्ह्यातील एक मोठी आणि प्रमुख यात्रा म्हणून या यात्रेचे स्वरूप आहे. श्री गजानन महाराज, श्री साईबाबा, गोंदवलेकर महाराज यांचे समकालीन आणि येथील श्रद्धास्थान असलेले महाराज समाधी मंदिर आणि गादीभक्तांकडून याचे आयोजन होत असते. दत्त अवतारी विदेही सत्पुरुषांचे पलूस या गावी पाय लागल्याने आणि त्यांनी केलेली भाकीते तंतोतंत खरी ठरली असून त्याप्रमाणे घटनाक्रम होऊन पलूस तालुक्यात त्यांचा साक्षात्कार होत आहे. म्हणूनच या सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी दिलेला गुरुमंत्र, नामस्मरण आणि अन्नदान या कार्यक्रमांचे आयोजन असते. याचसमवेत सोहळा उत्साहात पार पडतो. तरी सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्यात उपस्थित राहून लाभ घ्यावा, तसेच नवीन चालू असलेला सभा मंडप, अन्नछत्र, भोजनगृह यांच्या कार्यास यथाशक्ती तन-मन-धन यांनी हातभार लावावा, असे आवाहन सेवाधारी व्यवस्थापकांच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराजांच्या समाधीसमोरील सभा मंडप, अन्नछत्र निवारा, भोजनगृह, रंगरंगोटीच्या कार्याचा आरंभ !

महाराजांचे नामस्मरण आणि अन्नदान या उपदेशाप्रमाणेच वर्ष २००८ मध्ये पुण्यतिथी शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने श्री सद्गुरु धोंडीराज महाराज समाधी मंदिर सेवाधारी व्यवस्थापक श्री. धनंजय पाटील आणि सेवा मंडळाने संकल्प सोडत सातत्याने अन्नछत्र अन् नामस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यास प्रारंभ केला. समाधी मंदिराची धार्मिक आणि सेवा कार्याची परंपरा आजतागायत चालू आहे.

वर्ष २००८ मध्ये श्रीरामनाम जप संकल्प विविध नामसंकीर्तन आणि पारायणाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात येऊन वर्ष २०१२ मध्ये मंदिराचे अंशत: नूतनीकरण करण्यात आले. वर्ष २०१६ मध्ये अन्नछत्र मंडपाची आणि भोजनगृहाची उभारणी करण्यात आली आणि अन्नदानाचे कार्य आजअखेर अखंड आणि अव्याहतपणे चालू आहे. वर्ष २००८ मध्ये महाराजांचे समाधीपूर्वी केलेल्या नगरप्रदक्षिणा प्रीत्यर्थ नवीन रथाची निर्मिती करण्यात आली. अशा पद्धतीने श्रद्धाळू भाविक भक्तांच्या सहयोगाने वर्ष २०२५ पर्यंत अव्याहतपणे या पवित्र कार्याची वाटचाल चालू आहे. समाधी मंदिरे हे खर्डेकर सरकारची खासगी मालमत्ता असल्याने अधिकृत साहाय्य मिळत नसल्याने या वर्षी म्हणजे ११७ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने नवीन संकल्प हाती घेतला आणि समाधी समोरील सभा मंडपाचे, अन्नछत्र निवारा, भोजनगृह, रंगरंगोटीचे कार्य दानपेटीतील निधीतून करण्याच्या संकल्पास भक्तजनांकडून भरगोस प्रतिसाद मिळत आहे. हे काम आता पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहे. त्यासाठी अजून निथीची आवश्यकता आहे आणि तो निधीही महाराजांच्या कृपेने अन् सर्वांच्या सहयोगाने मिळेल. सर्वसामान्यांच्या यथाशक्ती सहयोगाने या परिसराचा कायापालट झाला आहे. समाधी मंदिर परिसरात करण्यात आलेल्या या सुविधांमुळे भक्तजनांना अनुसंधानासाठी सोय होत आहे. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धातील आणि २० व्या शतकाच्या पूर्वार्धातील महाराष्ट्रातील जे श्री गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, प.पू. गोंदवलेकर महाराज या समकालीन साक्षात्कारी संतांच्या प्रमाणेच श्रींचे कार्यही सर्वदूर पोचावे आणि समस्तांना लाभ होईल, हीच पारमार्थिक अपेक्षा !

– सेवाधारी व्यवस्थापक, समाधी मंदिर, पलूस

समाधी मंदिराच्या बाहेर चालू असलेले सभामंडपाचे काम