‘आम्हाला भांडुप येथील जागा अपुरी पडत असल्याने आम्ही भाड्याने मोठी जागा घ्यायची ठरवली. भांडुप येथील घरांचे भाडे अधिक असल्याने आम्ही देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमाशेजारी असणार्या संकुलात घर घेतले. आरंभी मी नोकरी करून उपलब्ध वेळेत देवद आश्रमात सेवेला जात असे. नंतर माझे शारीरिक त्रास वाढल्यामुळे मला नोकरी करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे मी नोकरी सोडली आणि आश्रमात अधिक वेळ सेवेला जाऊ लागले. तेव्हापासून पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्याशी माझा अधिक संपर्क होऊ लागला.

१. साधिकेला आश्रमात सेवा उपलब्ध होणे
मला आश्रमात अनेक सेवा करण्याची संधी मिळाली. एकदा मी एके ठिकाणी सेवेसाठी गेल्यावर तेथे सेवा उपलब्ध नसल्याचे माझ्या लक्षात आले. तेव्हा तेथून पू. (सौ.) अश्विनी पवार (सनातनच्या ६९ व्या संत, वय ३५ वर्षे) जात होत्या. त्यांनी मला आश्रमातील चिकित्सालयात सेवा विचारायला सांगितली. नंतर त्यांनी मला अनेक वैद्यकीय शिबिरांना उपस्थित रहाण्याविषयी सुचवले. नंतर काही दिवसांतच रुग्णाईत साधकांवर वेगवेगळ्या उपचार पद्धतीने उपचार होऊ लागले. मला या सेवेच्या समन्वयाचे दायित्व देण्यात आले. तेव्हा मला वाटले, ‘पू. ताईंनी पात्रता नसणार्या एका जिवासाठी केवढी मोठी सेवा उपलब्ध करून दिली.’
२. साधिका रुग्णाईत असतांना पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी तिची आईप्रमाणे काळजी घेणे
मी पूर्णवेळ साधना करायला लागण्यापूर्वी देवद आश्रमाच्या शेजारी असलेल्या सनातन संकुलात निवासाला होते. त्या वेळी मला पुष्कळ शारीरिक त्रास होत होते. माझ्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण अल्प असल्यामुळे मला प्रचंड थकवा असे. मला उठतांना आणि चालतांना भिंतीचा आधार घ्यावा लागत होता. मी स्वयंपाक करू शकत नव्हते. पू. ताईंना याविषयी समजल्यावर त्यांनी लगेच मला आश्रमात रहायला येण्याविषयी सुचवले. मला आणि माझ्या यजमानांना आश्रमातूनच प्रसाद अन् महाप्रसाद मिळू लागला. त्या वेळी पू. ताईंनी माझी आईप्रमाणे काळजी घेतली.
३. पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी साधिकेला कधी चुका सांगून, तर कधी तिचे कौतुक करून तिला घडवणे
मी वैद्यकीय सेवेशी संबंधित सेवेचा समन्वय पहात असतांना माझा पू. ताईंशी संपर्क येत असे. तेव्हा त्यांनी मला माझ्याकडून होणार्या चुकांची वेळोवेळी कठोरपणे जाणीव करून दिली. त्यांनी माझ्यामधील गुणांचे कौतुकही केले. त्यामुळे मी घडत आहे.
४. पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्यावर मर्दन करण्याच्या वेळी त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

मी पू. अश्विनीताईंना मर्दन करत असतांना मला त्यांना जवळून अनुभवता येते. मी मर्दन सेवा करायला शिकण्यापूर्वी योगासने आणि निसर्गोपचार शिकले होते. त्या वेळी मी जे काही शिकले, त्याहून अधिक प्रमाणात मला पू. (सौ.) अश्विनीताईंकडून शिकायला मिळाले. पू. ताईंनी सांगितलेली काही सूत्रे पुढे दिली आहेत.
अ. ‘आपण जे शिकलो आहोत, केवळ त्यानुसार रुग्णांवर उपचार करण्याऐवजी ‘रुग्णाला नेमका काय त्रास आहे ? त्याला वेदना कुठे आहेत ? कुठल्या स्थानी आहेत ?’, हे सर्व समजून घेऊन उपचार करायला हवेत.
आ. रुग्णांना आपला आधार वाटायला हवा.
इ. आपल्या केवळ स्पर्शानेही रुग्णाच्या वेदना न्यून होतील, एवढे प्रेम रुग्णांवर करायला हवे.
ई. मर्दन करण्याची सेवा करतांना भावाच्या स्तरावर कृती केल्यास सेवा अधिक परिणामकारक होईल.
उ. रुग्णाच्या अवयवांवर पहिल्याच टप्प्याला अधिक दाब न देता रुग्णाच्या स्थितीनुसार आणि ‘त्याला किती सहन होते’, याचे निरीक्षण करून दाब देण्याचे प्रमाण वाढवावे.
ऊ. मर्दन सेवा करतांना रुग्णाच्या वेदनेचे मूळ शोधून काढणे अपेक्षित आहे.’
मी अनेक शिबिरांना उपस्थित रहात असे. तिथे आम्हाला विविध उपचारपद्धती (‘थेरपी’) शिकवल्या जात असत आणि आमच्याकडून प्रायोगिक भागही करून घेतला जात असे. मी पू. ताईंवर उपचार करत असतांना मला त्या उपचारपद्धतींचे १०० टक्के आकलन होत असे. पू. ताईंना त्या उपचारपद्धतीच्या विषयी काही ठाऊक नसतांनाही त्या मला सेवेतील बारकावे शिकवत असत.
५. पू. (सौ.) अश्विनी पवार घेत असलेल्या सत्संगांविषयी जाणवलेली सूत्रे
५ अ. पू. (सौ.) अश्विनी पवार सत्संग घेतांना ‘त्यांच्या मुखातून एक दैवी ज्ञानाचा ओघ प्रवाहित होत असून त्याचा लाभ साधकांना होतो’, असे जाणवणे : पूर्वी मी प्रसारसेवा करत असतांना मला स्वभावदोष निर्मूलनासाठी घेत असलेल्या सत्संगाची भीती वाटत असे; मात्र पू. अश्विनीताई सत्संग घेत असतांना ‘त्यांच्या मुखातून दैवी ज्ञानाचा ओघ प्रवाहित होत असतो आणि त्याचा लाभ साधकांना होतो’, असे मला जाणवते.
५ आ. ‘सत्संगात माझ्यामधील ज्या स्वभावदोषाबद्दल सांगितले जाते, त्या स्वभावदोषाच्या निर्मूलनासाठी सत्संग झाल्यावर विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. तो स्वभावदोष ५० टक्के इतक्या प्रमाणात सत्संगातच नष्ट होतो’, असे मला जाणवते.
६. पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी टप्प्याटप्प्याने आध्यात्मिक मैत्रीण, आई, वडील, मार्गदर्शक गुरु आणि सर्वस्व होऊन विविध रूपांतून साधिकेला घडवणे
मी देवद आश्रमात आल्यावर माझी पहिली जवळची आध्यात्मिक मैत्रीण पू. (सौ.) अश्विनीताई बनल्या. माझ्या आजारपणात त्या माझी ‘आई’ झाल्या. माझ्याकडून गंभीर चुका झाल्या, तेव्हा सत्संगात त्या चुकांची कठोरपणे जाणीव करून देऊन त्या माझ्या ‘वडील’ झाल्या. मला साधनेत क्षणोक्षणी पुढे घेऊन जाण्यास त्या माझ्या ‘मार्गदर्शक गुरु’ झाल्या आणि पू. ताई माझे सर्वस्व झाल्या. परात्पर गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) पू. ताईंच्या रूपात माझ्या जीवनात आले आणि ते क्षणोक्षणी मला घडवत आहेत.
७. पू. (सौ.) अश्विनी पवार देवद आश्रमातील प्रत्येक साधकरूपी मण्याला घडवत असून त्यांना एका माळेत ओवले असणे
पू. (सौ.) अश्विनीताई माझ्यावर जसे भरभरून प्रेम करतात, तसेच प्रेम त्या देवद आश्रमातील प्रत्येक साधकावर करतात. पू. ताई देवद आश्रमातील प्रत्येक साधकरूपी मण्याला घडवत असून त्यांनी साधकांना एका माळेत ओवले आहे. त्यामुळे या सर्व मण्यांची एक घट्ट माळ बनली आहे, जी कधीच तूटू शकत नाही.
प.पू. गुरुदेव आणि पू. (सौ.) अश्विनीताई यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञतापूर्वक नमस्कार !’
– सौ. काव्या कुणाल चेऊलकर, सनातन संकुल, देवद, पनवेल. (१९.१०.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |