‘वर्ष २०१९ मध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मी प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. प्रभाकर कारेकर (वय ८० वर्षे) यांची मुंबई येथे भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी संगीत कलेच्या संदर्भात मार्गदर्शन केले. त्या वेळी मला शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. संगीत साधनेतील पूर्वीची गुरु-शिष्य परंपरा आणि सध्याचे संगीत शिक्षक अन् संगीत शिकणारे विद्यार्थी !
१ अ. पूर्वी शिष्य गुरूंच्या सहवासात राहून शिकत असणे आणि सध्या विद्यार्थ्यांचा गुरूंच्या सहवासात राहून शिकण्याचा कालावधी अल्प असणे : पं. कारेकर आम्हाला म्हणाले, ‘‘पूर्वीची आपली गुरु-शिष्य परंपरा अगदी योग्य होती. शिष्य गुरूंच्या सहवासात राहून सिद्ध होत असत. शिष्याला गुरूंच्या सहवासात पुष्कळ गोष्टी शिकता येतात, उदा. गुरु संगीत गुणगुणतात कसे ? गुरु बोलतात कसे ? ते संगीताविषयी काय बोलतात ? बंदीश (टीप १) कशी म्हटली जाते ? आमच्या वेळी गुरुजी जर ‘चल’ म्हणाले, तर आम्ही त्यांच्या समवेत त्वरित जात असू. आम्ही काहीही झाले, तरीही संगीतालाच प्राधान्य देत होतो. सध्या तसे होत नाही. विद्यार्थी एक घंटा गायनाच्या वर्गात गेला, एक घंट्यात संगीत शिकला आणि तो घरी गेला, असे होत आहे.’’
टीप १ – बंदीश : शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे बोलगीत. यालाच ‘छोटा ख्याल’, ‘बंदीश’ किंवा ‘चीज’ असेही म्हणतात. ही मध्य लयीत किंवा दृत लयीत गातात.
१ आ. पूर्वी गुरूंनी शिकवलेले विद्यार्थ्याकडून मुखोद्गत करून घेण्याची पद्धत असणे आणि आता केवळ पेटीवर धून ऐकवून संगीत शिकवले जाणे : ते म्हणाले, ‘‘आम्ही आमच्या संगीताच्या गुरूंकडे शिकायला होतो, तेव्हा ते आमच्याकडून स्थायी (टीप २) आणि अंतरा (टीप ३) प्रत्येकी १५ ते २० वेळा म्हणवून घेत असत, त्याच प्रकारे आमचे गुरु आमच्याकडून पलटे (टीप ४) म्हणवून घेत असत. त्या वेळी शिकवलेले लिहून घेण्याऐवजी मुखोद्गत करण्याची पद्धत होती. सध्या केवळ पेटीवर धून ऐकवून ‘सा, रे, ग, म..’ म्हटले की झाले ! विद्यार्थ्याचा एक राग शिकवून झाला की, त्याला लगेच दुसरा राग शिकवायचा, असे आताचे संगीत शिक्षण झाले आहे.’’
टीप २ – स्थायी : गीताच्या पहिल्या भागाला ‘स्थायी’ असे म्हणतात.
टीप ३ – अंतरा : गीताच्या दुसर्या भागास ‘अंतरा’ असे म्हणतात.
टीप ४ – पलटे : स्वरांचे विविध अलंकार.
पं. प्रभाकर कारेकर यांचा परिचय

पं. प्रभाकर जनार्दन कारेकर हे शास्त्रीय गायक होते. ते वयाच्या १२ व्या वर्षी गोव्याहून मुंबई येथे गाणे शिकण्यासाठी आले. त्यांनी पं. हळदणकर, पं. जितेंद्र अभिषेकी आणि पंडित सी.आर्. व्यास या गुरूंकडून संगीत शिक्षण घेतले. त्यांनी शास्त्रीय संगीतासह मराठी संगीत नाटकांतील अनेक पदे गायली आहेत. त्यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘तानसेन’ पुरस्कार मिळाला आहे. त्यांना संगीत-नाटक ॲकॅडमीनेही पुरस्कार दिला आहे.
१२.२.२०२५ या दिवशी पं. प्रभाकर कारेकर यांचे दु:खद निधन झाले. या लेखाच्या माध्यमातून महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वहात आहोत !
२. पं. कारेकर यांनी संगीत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन

२ अ. विद्यार्थ्यांनी अनेक गायकांची गाणी ऐकणे आवश्यक ! : तुम्ही जर गाणे शिकत असाल, तर तुम्हाला अनेक गायकांची गाणी ऐकणे आवश्यक आहे. तुमचे गुरुजी ५० वेळा गातील, तर तेवढ्या वेळा तुम्हाला ते ऐकावे लागेल. तुम्ही यमन राग शिकत असाल, तर ‘गुरुजी यमन कशा तर्हेने गातात ?’, याविषयी तुम्हाला समजते. ‘आपण कसे गातो ? आणि गुरुजी कसे गातात ?’, यातील भेद विद्यार्थ्यांच्या लक्षात येतो.
२ आ. पं. प्रभाकर कारेकर यांनी विद्यार्थ्यांनी सराव करण्याचे सांगितलेले महत्त्व ! : संगीत शिकतांना विद्यार्थी जितका सराव करतील, तेवढा अल्पच असतो. संगीतातील शिक्षक विद्यार्थ्याला केवळ १० टक्के भाग शिकवतात, तर शिकणार्या विद्यार्थ्याला ९० टक्के स्वतः कृती करून शिकावे लागते. विद्यार्थ्याला श्रम घेऊन आणि सराव करून ‘स्वतःचे गायन सुरात होत आहे का ?’, हे पहावे लागते.
२ इ. स्वर घोटून पक्का करायला हवा ! : गुरुजी मला सकाळी केवळ ‘सा’ स्वर दीड घंटा लावायला सांगायचे. तेव्हा मला कंटाळा येत असे आणि ‘सा’ स्वर इतका वेळ का लावायचा ?’, असे वाटत असे; पण त्याचेही महत्त्व आहे. तुम्ही तो ‘सा’ गळ्यात जितका घट्ट कराल, तितका तो पक्का होतो. ही जुन्या पिढीची शिकवण आहे. आता तसे करतांना फारसे कुणी दिसत नाही.
२ ई. श्री सरस्वतीदेवीच्या कृपेमुळे कलाकाराला यश प्राप्त होत असणे : तुम्ही कितीही संगीत शिकलेले असाल; पण ते तुमचे कर्तृत्व नसते. ते श्री सरस्वतीदेवीचे कर्तृत्व असते. तुम्ही प्रसिद्ध अधिवक्ता किंवा अभियंता असल्यास ती श्री सरस्वतीदेवीची तुमच्यावर कृपा असते. तिच्यामुळे तुम्हाला शिक्षण आणि मान मिळतो. तुमचे कर्तृत्व केवळ १ टक्का असून उर्वरित ९९ टक्के कर्तृत्व सरस्वतीदेवीचे असते.
३. पं. कारेकर संगीततज्ञ असूनही त्यांच्यातील शिकण्याची वृत्ती
पं. कारेकर यांनी सांगितले, ‘‘माझा पुढचा जन्म संगीत शिकण्यासाठीच हवा. या जन्मात माझे संगीतातील काहीच शिकून झाले नाही. माझे शिकायचे पुष्कळ शेष राहिले आहे.’’
– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के), संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
पं. प्रभाकर कारेकर यांचा आदर्श समोर ठेवून विद्यार्थ्यांनी संगीताकडे साधनेच्या अनुषंगाने पाहिल्यास ते संगीतातील खरा आनंद घेऊ शकतील !‘पंडित प्रभाकर कारेकर हे ज्येष्ठ संगीततज्ञ होते, तरीही ते ‘अजून मी काहीच शिकलो नाही’, असे नम्रपणे सांगत असत. ‘मी जे शिकलो, ते श्री सरस्वतीदेवीच्या कृपेमुळेच शिकलो’, असे ते कृतज्ञताभावाने सांगत असत. संगीत क्षेत्रातील आताच्या विद्यार्थ्यांनी पंडित कारेकर यांच्यामधील ‘नम्रता आणि कृतज्ञताभाव’ या गुणांचा आदर्श समोर ठेवल्यास त्यांनाही संगीत क्षेत्रात प्रगती करता येईल. विद्यार्थ्यांनी संगीताकडे साधनेच्या अनुषंगाने पाहिल्यास ते संगीतातील खरा आनंद घेऊ शकतील.’ – सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के), संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२०.२.२०२५) |