रत्नागिरी – रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ३ वर उभ्या असलेल्या ‘रत्नागिरी-दिवा पॅसेंजर’मध्ये २२ फेब्रुवारीच्या पहाटे ५.१५ वाजता एका तरुणीचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी निफ्रान इन्तिखाब अल्जी (वय ३० वर्षे, रहाणार रत्नागिरी) या तरुणाला पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
पीडित तरुणी २२ फेब्रुवारीला सकाळी ५.३० वाजता रत्नागिरी- दिवा पॅसेंजर गाडीने खेड येथे जाण्यासाठी निघाली होती. सकाळची वेळ असल्याने गाडीत प्रवासी अल्प होते. तरुणी बसलेल्या डब्ब्यात प्रवासी नसल्याचे पाहून संशयित निफ्रान गाडीत शिरला आणि त्याने तरुणीला पाठीमागून पकडून ठेवले. अचानक घडलेल्या प्रसंगामुळे तरुणी गोंधळून गेली; मात्र प्रसंगावधान दाखवत तिने सुटका करून घेतली. संशयित निफ्रान नंतर पसार झाला. या प्रकरणी पीडित तरुणीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन संशयित निफ्रान याला चिपळूण रेल्वे स्थानकातून कह्यात घेतले. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.