गोमंतभूमी (गोवा) असे परमपवित्र । येथे घडतसे श्री गुरूंचे अवतारी चरित्र ॥
येथीलच ३ जीव गुरुचरणी विसावले । साधकजन सारे आनंदसागरात न्हाले ॥
डॉ. पुष्पा दुकळे (वय ८३ वर्षे) यांनी ६३ टक्के, श्री. दुर्गादास फडते (वय ७१ वर्षे) यांनी ६२ टक्के आणि श्री. दिलीप शेट्ये (वय ७१ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी
पणजी, गोवा – गोमंतभूमी ही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दैवी कार्याची भूमी आहे. या भूमीमध्ये सच्चिद़ानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विश्वद़ीप असलेला रामनाथी येथे सनातनचा आश्रम निर्माण करून ते अनेक साधकांना साधनेची दिशा देत आहेत. अशा या पवित्र गोवा भूमीमध्ये जन्मलेल्या आणि रहात असलेल्या साधकांसाठी साधनेची ही सुवर्णसंधीच आहे. त्यातच साधकांच्या आनंद़ात वृद्धी करण्यासाठी १९ फेब्रुवारी या दिवशी आणखी एक सुवर्णयोग जुळून आला. गुरूंप्रती भाव आणि अपार श्रद्धा, सकारात्मकतेने परिस्थिती स्वीकारून सतत आनंदी रहाणे, अशा गुणांमुळे पणजी येथील डॉ. पुष्पा दुकळे (वय ८३ वर्षे) यांनी ६३ टक्के, पाळे येथील श्री. दुर्गादास फडते (वय ७१ वर्षे) यांनी ६२ टक्के आणि पणजी येथील श्री. दिलीप शेट्ये (वय ७१ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता श्रीसत्शक्ति(सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी दिली. त्यामुळे हा दिवस गोव्यातील साधकांसाठी आनंदाची पर्वणी ठरला.
या प्रसंगी डॉ. पुष्पा दुकळे यांची बहिण सौ. अंजली नायक आणि बहिणीचे पती श्री. संजय नायक, श्री. दुर्गादास फडते यांची पत्नी सौ. प्रज्योती फडते, तसेच श्री. दिलीप शेट्ये यांची पत्नी सौ. चित्रा शेट्ये, मुलगी सौ. मिथिला शेणवी-सालेलकर आणि जावई श्री. केतन शेणवी-सालेलकर, तसेच पणजी भागात सेवा करणारे काही साधक उपस्थित होते.
डॉ. पुष्पा दुकळे यांच्या प्रगतीची अशी झाली घोषणा !

डॉ. पुष्पा दुकळे या वयोमानानुसार घरातून बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्या वेळी डॉ. पुष्पा दुकळे यांचे आजारपणातील साधनेचे प्रयत्न, तसेच त्यांच्यामध्ये होत असलेले पालट उपस्थित साधकांनी सांगितले. साधकांप्रती प्रेमभाव, गुरूंप्रती अपार भाव, ‘गुरु माझी काळजी घेणार आहेत’, अशी दृढ श्रद्धा, तसेच परिस्थिती स्वीकारून आनंदी रहाणे या गुणांमुळे डॉ. पुष्पा दुकळे यांनी ६३ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घोषित केले.
श्री. दुर्गादास फडते आणि श्री. दिलीप शेट्ये यांच्या प्रगतीची अशी झाली घोषणा !

पणजी येथे सेवा करणार्या काही साधकांच्या साधनेच्या प्रयत्नांच्या वृद्धीसाठी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या अनौपचारिक सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी साधकांचे साधनेसंदर्भातील प्रयत्न, त्यात येणारे अडथळे, तसेच साधनेचे प्रयत्न केल्यामुळे स्वतःत होत असलेले पालट याविषयी साधकांकडून जाणून घेतले, तसेच त्यांना साधनेच्या प्रयत्नांविषयी मार्गदर्शनही केले. सत्संगात साधकांशी होत असलेल्या संवादाच्या माध्यमातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्री. फडते आणि श्री. शेट्ये यांची गुणवैशिष्ट्ये उलगडून त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीची आनंदवार्ता सर्वांना दिली. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी प्रगती केलेल्या साधकांचा भेटवस्तू द़ेऊन सत्कार केला.

आध्यात्मिक पातळी घोषित केलेल्या साधकांनी व्यक्त केलेले मनोगत
१. डॉ. पुष्पा दुकळे : ‘माझ्या मनात पातळीसंदर्भात कोणताच विचार नव्हता. गुरूंनीच हे करवून घेतले’, असे म्हणून डॉ. पुष्पा दुकळे यांनी हात जोडून गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त केली.
२. श्री. दुर्गादास फडते : ‘गुरु करतात; म्हणून सर्वकाही होते. मी काहीच केले नाही. माझ्याकडून गुरुच सर्वकाही करवून घेतात.’ यावेळी श्री. फडते यांची पुष्कळ भावजागृती होत होती.
३. श्री. दिलीप शेट्ये : ‘बोलायला शब्दच नाहीत’, असे म्हणून श्री. शेट्ये यांनी गुरुचरणी निःशब्द कृतज्ञता व्यक्त केली.
प्रगती केलेल्या साधकांची त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये
१. सौ. अंजली नायक (डॉ. पुष्पा दुकळे यांची बहीण) : ‘ताईमध्ये आधीच्या तुलनेत स्वीकारण्याचा भाग वाढला आहे. वर्ष १९९२ मध्ये प.पू. गुरुदेवांनी आमच्या आईला सांगितले होते की, ‘ताईची (डॉ. पुष्पा द़ुकळे यांची) काळजी करू नका.’ त्याची प्रचीती आज आली. गुरुदेवांनीच आतापर्यंत तिची काळजी घेऊन तिला इथपर्यंत आणले आहे.’
२. सौ. प्रज्योती फडते (श्री. दुर्गादास फडते यांची पत्नी) : ‘ते (श्री. फडते) साधनेचे प्रयत्न पुष्कळ तळमळीने करतात. नियमित चुका लिहितात. तेवढ्याच तळमळीने सेवाही करतात. साधनेमुळे त्यांचे पांढरे केसही काळे होऊ लागले आहेत.’
३. सौ. चित्रा शेट्ये (श्री. दिलीप शेट्ये यांची पत्नी) : ‘श्री. शेट्ये यांची प.पू. गुरुदेवांवर पुष्कळ श्रद्धा आहे. त्यांच्या मनात सर्वांविषयी प्रेम आहे. त्यांच्यामध्ये आधीच्या तुलनेत पुष्कळ पालट जाणवतो. ते आता सकारात्मक आणि आनंदी असतात.’
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |