तेलंगाणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणार्‍या व्यक्तीची हत्या !

मृत एन्. राजलिंग मूर्ती आणि तेलंगाणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव

भाग्यनगर (तेलंगाणा) – तेलंगाणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणार्‍या एका व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. कालेश्वरम् प्रकल्पांतर्गत मेडिगड्डा बॅरेजच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत मृत ५० वर्षीय एन्. राजलिंग मूर्ती यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा ‘भारत राष्ट्र समिती’ या राजकीय पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर राव आणि इतरांविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती.

१९ फेब्रुवारी या दिवशी जयशंकर भूपालपल्ली शहरात जमिनीच्या वादातून दोन अज्ञात व्यक्तींनी राजलिंग मूर्ती यांची चाकूने वार करून हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. घटनेच्या वेळी राजलिंग मूर्ती मोटारसायकलवरून प्रवास करत होते. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे. या घटनेच्या दुसर्‍याच दिवशी उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार होती.