
१. उत्तरप्रदेशामधील अलीगड जिल्ह्यातील लधौली येथे ५० ख्रिस्ती कुटुंबांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
‘१२.१.२०२५ या दिवशी अलीगड जिल्ह्यातील लधौली येथे ५० ख्रिस्ती कुटुंबांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. यासाठी गार्गी कन्या गुरुकुल आणि अग्नी समाज यांनी प्रयत्न केले. या वेळी गावात आयोजित स्वागत यज्ञात या कुटुंबांनी आहुती टाकल्या आणि त्यांची मूळ सांस्कृतिक अन् धार्मिक ओळख कायम ठेवण्याचा संकल्प घेतला. गार्गी कन्या गुरुकुलाच्या आचार्य डॉ. मनू आर्य यांनी या कार्यक्रमाचे पौरोहित्य केले. गुरुकुलातील इतर विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केलेली कुटुंबे अनुसूचित जाती जमातीसह विविध जातींची होती. हिंदूंचे धर्मांतर थांबवणे आणि हिंदूंना त्यांच्या धार्मिक अन् सांस्कृतिक परंपरा यांच्याशी जोडून ठेवणे, हा या यज्ञाचा उद्देश होता. यापूर्वी साधारणत: ८ मासांपूर्वी राजस्थानातील अजमेरमध्ये अनेक मुसलमान कुटुंबांनी मौलवींच्या (इस्लामच्या धार्मिक नेत्यांच्या) त्रासाला कंटाळून हिंदु धर्मात प्रवेश केला होता, तसेच नोव्हेंबर २०२३ मध्ये काही कुटुंबांनीही गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे हिंदु धर्मात प्रवेश केला होता.

२. अनेक शतकांपासून धर्मांतराला फसणारे हिंदू
गेली अनेक शतके परकीय आक्रमक आणि ख्रिस्ती प्रचारक यांनी भारताला लुटले, तसेच येथील लोकांचे तलवारीच्या धाकावर धर्मांतर केले. ज्यांनी धर्मांतर केले नाही, त्यांचा क्रौर्याने छळ करून त्यांना ठार मारले. हा इतिहास आहे. अलीकडे प्रलोभने देऊन मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती प्रचारक गोरगरीब हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. दुसरीकडे धर्मांध तरुण ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुलींचे धर्मांतर करत आहेत.
३. हिंदु धर्माची महानता
भगवान विष्णूचे दशावतार किंवा ४ वेद, १८ पुराणे, उपनिषदे, रामायण, महाभारत, भागवत इत्यादी ग्रंथ वाचले की, हिंदु धर्माची महानता लक्षात येते. जुन्या काळात मौखिक परंपरेने वेदांचे अध्ययन होत असे. त्यानंतर त्यांना संस्कृतमध्ये लिपीबद्ध करण्यात आले. वेदाचे अध्ययन करणार्या व्यक्तींना द्विवेदी, त्रिवेदी आणि चतुर्वेदी अशा नावाने ओळखायचे. त्यांच्या अध्ययनावरून त्यांना गुणवत्ता आणि उपाधी देण्यात येत असे.
४. जागतिक पातळीवरील वलयांकित लोकांचा हिंदु धर्मात प्रवेश
गेल्या काही वर्षांत ख्रिस्ती किंवा मुसलमान पंथातील अनेक वलयांकित लोकांनी वैशिष्ट्यपूर्ण हिंदु धर्मात प्रवेश केला आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री जुलिया रॉबर्ट्स हिने हिंदु धर्म स्वीकारला. त्यानंतर न्यूयॉर्कमधील लेखिका एलिझाबेथ गिल्बर्ट यांनी वर्ष २००६ मध्ये हिंदु धर्मात प्रवेश केला. प्रख्यात गिटार वादक जॉर्ज हॅरीसन यांनीही वर्ष १९६० मध्ये हिंदु धर्म स्वीकारला. विनोदी कलाकार, लेखक आणि निर्माते रसेल ब्रांड यांनी वर्ष २०१० मध्ये हिंदु धर्म स्वीकारला. प्रसिद्ध गिटारवादक आणि गायक जो मासिस, तसेच अमेरिकेचे प्रख्यात संगीतकार जेरी गार्सिया यांनीही हिंदु धर्म स्वीकारला. दक्षिणात्य ख्रिस्ती अभिनेत्री नयनतारा, लॉरेन्स कृष्णा पारकर, अमेरिकी गायक के.आर्.एस्. वन यांनी हिंदु धर्मात प्रवेश केलेला आहे.
वर्ष १९४७ मध्ये हिंदुस्थानची फाळणी झाली. त्यानंतर पाकव्याप्त प्रदेशातून भारतात येणार्या हिंदूंवर धर्मांधांनी अनन्वित अत्याचार केले. त्याचा पश्चाताप होऊन मूळ पाकिस्तानी आणि नंतर ब्रिटनमध्ये स्थायिक झालेले अन्वर शेख यांनी वर्ष १९४७ मध्ये मुसलमान पंथ सोडून हिंदु धर्म स्वीकारला. अशी सहस्रो उदाहरणे देता येतील.
५. महाकुंभमेळ्याच्या धर्तीवर अन्य पंथीय हिंदु धर्मात प्रवेश करण्याची पुरो(अधो)गाम्यांना भीती
प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला ५५ कोटींहून अधिक लोकांनी अमृतस्नान केले आहे. ही गोष्ट इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिली जाईल. हिंदु धर्माची ही महानता पाहून ख्रिस्ती आणि मुसलमान पंथांतील लोक हिंदु धर्मात प्रवेश करतील, या भीतीने पुरोगामी अन् नास्तिक महाकुंभमेळ्याला विरोध करत आहेत. अर्थात् कोंबडा आरवला नाही; म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही. त्यामुळे कुणी कितीही विरोध केला, तरी त्रिकालज्ञानी संतांनी भविष्य वर्तवल्याप्रमाणे ‘हिंदु राष्ट्र’, म्हणजेच ‘रामराज्य’ लवकरच स्थापित होईल, यात संशय नाही.’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय