Ekta Kapoor’s Padma Shri Award : एकता कपूर यांना दिलेला ‘पद्मश्री’ पुरस्कार मागे घ्या ! – १०८ अधिवक्त्यांचे राष्ट्रपतींना पत्र

  • १०८ अधिवक्त्यांचे राष्ट्रपतींना पत्र

  • वेब सिरीजद्वारे देशात अश्‍लीलता पसरवल्याचा आरोप

नवी देहली – चित्रपट निर्मात्या एकता कपूर यांना देण्यात आलेला ‘पद्मश्री’ पुरस्कार परत घेण्याची मागणी होत आहे. भारताच्या विविध भागातील १०८ अधिवक्त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कपूर यांच्याकडून पद्मश्री परत घेण्याची विनंती केली आहे. त्यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना यासंदर्भात एक पत्रही लिहिले आहे. या अधिवक्त्यांंनी एकता कपूर यांच्यावर वेब सिरीजच्या माध्यमातून समाजात अश्‍लीलता पसरवल्याचा आरोप केला आहे. ‘एकता कपूर यांनी बनवलेल्या वेब सिरीज नैतिक मूल्यांचे अध:पतन घडवत आहेत आणि पवित्र मानल्या जाणार्‍या नात्यांचीही हानी करत आहेत’, असा आरोप त्यांनी केला आहे.

१. अधिवक्त्यांनी त्यांच्या पत्रात एकता कपूर यांनी बनवलेल्या अशा अनेक वेब सिरीजची माहिती राष्ट्रपतींना दिली आहे. कपूर यांच्या या ‘कॉन्टेंट’चा (साहित्याचा) भारतीय तरुण आणि समाज यांवर नकारात्मक परिणाम होत आहे. यामुळे पद्मश्री पुरस्काराची प्रतिष्ठाही धोक्यात आली आहे, त्यामुळे तो काढून घ्यावा, अशी मागणी अधिवक्त्यांनी केली आहे.

२. कपूर यांना वर्ष २०२१ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दूरचित्रवाणी आणि चित्रपट या क्षेत्रांतील त्यांच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. (असे कोणते योगदान त्यांनी दिले, ज्याचा लाभ देश आणि समाज यांना झाला, हे जनतेला सांगितले गेले पाहिजे, असेच यावरून लक्षात येते ! – संपादक)