नुकताच ‘छावा’ हा छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील हिंदी चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आणि त्यात प्रामुख्याने छत्रपती संभाजी महाराज यांचे बलीदान पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावले; मात्र हे बलीदान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनखाली गेली ३५ वर्षांहून अधिक काळ ‘छत्रपती संभाजी महाराज बलीदानमास’ आणि ‘मूकपदयात्रा’ यांच्या माध्यमातून रूजवले जात आहे. हा बलीदानमास आज महाराष्ट्रासह आजूबाजूच्या राज्यात सहस्रो ठिकाणी पाळला जातो आणि या माध्यमातून जाज्वल्य इतिहासाचे स्मरण केले जाते.
संकलक : श्री. अजय केळकर, कोल्हापूर (१६.२.२०२५)
१. कसा साजरा केला जातो बलीदानमास !
छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्मासाठी बलीदान केले. क्रूरकर्मा औरंगजेबाने पकडल्या दिवसापासून छत्रपती संभाजी महाराज यांनी अन्न आणि पाणी वर्ज केले अन् महिनाभर झुंज दिली. संभाजीराजांच्या बलीदानाची आठवण म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रतिवर्षी फाल्गुन शुक्ल प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या या कालावधीत ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदानमास’ पाळण्यात येतो. या मासाच्या शेवटी दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिकात्मक चितेला अग्नी देण्यात येतो. या चितेसाठी प्रतिवर्षी संभाजी महाराज यांच्या वढूबुद्रुक (जिल्हा पुणे) येथील समाधीपासून ज्योत आणली जाते आणि ती मारुति चौक येथे मारुति मंदिरासमोर ठेवण्यात येते. ज्या प्रकारे ही ज्योत सांगली जिल्ह्यात येते, अगदी त्याच प्रकारे ही ज्योत पुणे येथून निघून प्रत्येक जिल्ह्यात नेण्यात येते आणि धारकरी तेथून जिल्ह्यातील प्रत्येक गावात घेऊन जातात !

२. मूकपदयात्रेचा अन्वयार्थ
पकडले गेलेल्या क्षणापासून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पाशवी छळ करून प्रतिदिन एकेक अवयव तोडण्यात आला. फाल्गुन अमावास्येच्या दिवशी महाराजांच्या देहाचे तुकडे करून त्यांना ठार मारण्यात आले. त्या वेळी छत्रपती संभाजी महाराज यांची अंत्ययात्रा निघाली नाही. त्यांच्या न निघालेल्या अंत्ययात्रेचे स्मरण म्हणून त्यांना श्रद्धांजली वहाण्यासाठी फाल्गुन अमावास्येच्या दिवशी मूकपदयात्रा काढून संभाजी महाराज यांच्या प्रतिकात्मक चितेला अग्नी देण्यात येतो.

व्यक्ती जीवन सुखरूप होण्यासाठी देहातील रोगबीज, अन्नातील विषबीज आणि घरातील अग्नीबीज जसे नष्ट करणे आवश्यक आहे, तसे हिंदुस्थानचे राष्ट्र जीवन चिरंतन ठेवण्यासाठी हिंदुस्थानच्या भूमीवरील पाकिस्तानच्या रूपातील इस्लामी शत्रूबीज, विषबीज आणि अग्नीबीज संपवण्याचा हिंदु समाजाने ध्यास घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज त्यासाठीच आयुष्यभर झुंजले. तोच आदर्श आपण सर्वांनी ठेवला पाहिजे.
‘यंदाचा बलीदानमास !
२८ फेब्रुवारी, म्हणजेच फाल्गुन शुक्ल १ ते २९ मार्च (फाल्गुन अमावास्या) या कालावधीत आहे. तरी या कालावधीत हा मास प्रत्येकाने पाळावा’, असे आवाहन ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रावसाहेब देसाई यांनी केले आहे.
– श्री. अजय केळकर
‘धर्मवीर बलीदानमासा’चे महत्त्व !

‘आजचा भारत पुढे ‘हिंदुस्थान’च ठेवायचा असेल, तर सर्व हिंदूंनी नवरात्र आणि गणेशोत्सव यांप्रमाणेच ‘धर्मवीर बलीदानमास’ हिंदु धर्माचा अविभाज्य आचार म्हणून पाळला पाहिजे. हा मास कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर पाळणे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य आहे, राष्ट्रकर्तव्य आहे आणि तीच खरी स्वातंत्र्याची प्रखर उपासना आहे’, असे आवाहन ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ने केले आहे.
– श्री. अजय केळकर
३. धारकर्यांचे व्रत
बलीदानमासाचे महत्त्व हिंदूंना समजण्यासाठी पू. संभाजीराव भिडेगुरुजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत जातात आणि त्यांना हे बलीदान समजावून सांगतात. या मासात ठिकठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमा लावून त्यासमोर धारकरी ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र म्हणतात, तसेच संभाजी महाराजांनी केलेल्या अतुलनीय शौर्याचे स्मरण करतात. अनेक ठिकाणी त्यांचे चरित्रवाचन केले जाते.
धारकरी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानाची आठवण म्हणून महिनाभर गोड पदार्थ न खाणे, चप्पल न घालणे, महिनाभर दूरचित्रवाहिन्या न बघणे, तसेच अन्य प्रकारचे व्रत घेतात. डोंबिवली येथील सुप्रसिद्ध प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे हे गेली अनेक वर्षे हा मास पाळतात आणि त्यांच्याकडून विशेष प्रचार केला जातो.
४. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे इतर उपक्रम
गडकोट मोहीम अर्थात् धारातीर्थ यात्रा, श्री दुर्गामाता दौड, श्री शिवराज्याभिषेकदिन, ‘राजा श्रीशिवछत्रपति ग्रंथ’ पारायण, कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव, पुणे विद्यापिठाचे ‘जिजामाता विद्यापीठ’ म्हणून नामकरण व्हावे यांसाठी आंदोलन, राजा शिवछत्रपती पारायण, इतिहास परिषद, विवेक सभा, असे अनेक उपक्रम राष्ट्रोद्धार, राष्ट्रोन्नती आणि राष्ट्रसाक्षात्कार यांच्या जाणिवा निर्माण होण्यासाठी सातत्याने वर्षभर चालू असतात.