‘इंडियाज गॉट लेटेंट’ कार्यक्रमावर केवळ बंदी नको, कठोर शिक्षेची कारवाई हवी !

(टीप : ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा यू ट्यूबवरील एक विनोदी कार्यक्रम आहे.)

‘सोनी लिव्‍ह’ या ‘ओटीटी’वर (‘ओव्‍हर द टॉप’वर) प्रक्षेपित होणार्‍या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कार्यक्रमाचे जे छोटे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहेत, ते पाहून जिवाचा संतापही होत आहे आणि तरुण पिढीची लाजसुद्धा वाटत आहे. या कार्यक्रमात देशभरातील तरुण-तरुणी स्वतःची कला, कौशल्य द़ाखवण्यासाठी येतात आणि त्यांचे परीक्षण करण्याकरता समाजमाध्यमांतील कथित प्रसिद्ध परीक्षकांना (‘सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर्‍स’ना) बोलावले जाते.

फार थोड्या काळात प्रसिद्धी पावलेले हे समाजमाध्‍यमांमधील परीक्षक त्‍या स्‍पर्धकाला इतके अश्‍लील, असभ्‍य आणि अनैतिक प्रश्‍न विचारतात किंवा त्‍या स्‍पर्धकांवर अशा प्रकारच्‍या अभद्र टिपण्‍या करतात की, ते ऐकून कुणालाही साहजिकपणे राग येईल; पण इथे स्‍पर्धकांनी रागावणे अपेक्षित नसून परीक्षकांचे अश्‍लील प्रश्‍न / टिपण्‍या खिलाडू वृत्तीने स्‍वीकारून त्‍याला उत्तर देणे अपेक्षित आहे. प्रसंगी कुणा स्‍पर्धकाला कधी परीक्षकांचा राग आला आणि तो धावून अंगावर गेला, तर त्‍यांच्‍या सुरक्षेसाठी एक खासगी सुरक्षारक्षक (बाऊंसर) तिथे उभा केलेला असतो.

या प्रश्‍नोत्तरात कोणता परीक्षक किती अश्‍लील बोलतो, याची जणू शर्यत लागलेली असते आणि प्रत्‍येकाच्‍या अशा बोलण्‍यावर उपस्‍थित प्रेक्षकवर्ग अन् इतर परीक्षक उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद देत असतात. कधी कधी हे परीक्षक आपापसांतच एकमेकांवर अश्‍लील टिपण्‍या करत असतात. या एकूण सगळ्‍या प्रकाराला ‘रोस्‍टिंग’ म्‍हटले जाते. यात महिला परीक्षक आणि महिला स्‍पर्धकही मागे नाहीत.

श्री. अनिकेत विलास शेटे

१. समय रैना आणि रणवीर अलाहबादिया यांची पार्श्‍वभूमी 

आता नुकत्‍याच प्रसिद्ध झालेल्‍या व्हिडिओमध्ये समय रैना, रणवीर अलाहबादिया आणि अपूर्वा मखीजा यांनी अश्लील अन् घाणेरडे बोलण्याचे टोक गाठले. ते काय बोलले, हे इथे लिहू शकत नाही; पण यातील समय रैना हा नुकताच अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’, या कार्यक्रमात येऊन गेला होता. तेव्हा त्याने त्याच्या विनोदांनी सर्वांना हसवले होते, म्हणजे इतरांना हसवण्यासाठी शिव्या देणे, अश्लील बोलणे यांची त्याला आवश्यकता नाही.

रणवीर अलाहबादिया हा यू ट्यूबर आहे. त्‍याने त्‍याच्‍या ‘पॉडकास्‍ट’मध्‍ये कला, क्रीडा, साहित्‍य, अध्‍यात्‍म, विज्ञान, सामाजिक सेवा, राजकारण, चित्रपट अशा अनेकविध क्षेत्रांतील प्रसिद्ध व्‍यक्‍तींच्‍या ८५० हून अधिक मुलाखती घेतल्‍या आहेत. वर्ष २०२३ चे ‘बेस्‍ट यूट्यूब कॉन्‍टेंट क्रिएटर’चे (यू ट्यूबवर चांगली माहिती प्रसिद्ध करणारे) पारितोषिक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही त्‍याला एक पारितोषिक मिळालेले आहे. रणवीर हा त्‍याच्‍या ‘पॉडकास्‍ट’ मध्‍ये फार गंभीरपणे आणि अभ्‍यासू वृत्तीने प्रश्‍न विचारण्‍यासाठी प्रसिद्ध झाला होता; पण ‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्‍ये या सर्वांनी सगळ्‍या मर्यादा सोडल्‍या. आपण काय बोलत आहोत ? त्याचे परिणाम कुणावर आणि काय काय होऊ शकतात, याचे भान कुणीही ठेवले नाही. आता समाजमाध्यमांवर सगळीकडून टीका झाल्यावर रणवीरने तोंडदेखली क्षमा मागितली आहे; पण म्हणतात ना ‘जो बूंद से गई, वह हौद से नहीं आती.’

२. अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्यावर कायदा आणि कठोर शिक्षा या माध्‍यमातून चाप हवा !

आता या निमित्ताने परत एकदा पुरोगामी आणि उदारमतवादी यांच्‍याकडून अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याचे दळण दळले जाईल किंवा ‘तुम्‍हाला आवडत नसेल, तर तुम्‍ही बघू नका’, ही लंगडी पळवाट दाखवली जाईल; पण या वेळी या कार्यक्रमाचे निर्माते, दिग्‍दर्शक, परीक्षक, स्‍पर्धक आणि प्रत्‍यक्ष उपस्‍थित प्रेक्षक यांच्‍यावर कठोर कारवाई होणे आवश्‍यक आहे, तरच परत असे धाडस पुन्‍हा कुणी करणार नाही.

राज्‍यघटनेने अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्य हे वाजवी निर्बंधासहित बहाल केलेले आहे. स्‍वातंत्र्य आणि स्‍वैराचार यांतील भेद जर कुणाला कळत नसेल, तर त्‍यासाठीच कायदा व्‍यवस्‍था राबवली जाते. ती या वेळी राबवणे आवश्‍यक आहे. समय रैना आणि रणवीर यांच्‍या पालकांनी योग्‍य वेळी त्‍यांना नैतिकतेचे धडे दिले असते, तर आज त्‍या पालकांविषयी अश्‍लील बोलतांना यांची जीभ १० वेळा चावली असती. पालकांना जे जमले नाही, ते कायद्याने करणे आवश्‍यक आहे.

३. …अशांवर परीक्षण मंडळाचा धाक आवश्‍यक !

अशा परीक्षकांना थोडी प्रसिद्धी मिळाली, समाजमाध्‍यमांवर अनुयायी वाढले, त्‍यातून उत्‍पन्‍न चालू झाले, एखाद-दुसरे पारितोषिक मिळाले की, या परीक्षकांना आकाश ठेंगणे होते आणि आपण आता कसेही वागू शकतो. समाज जीवनातील कुठलीही बंधने आपल्‍याला लागू नाहीत, असा यांचा गैरसमज होतो. हाच गैरसमज वेळीच ठेचून काढणे आवश्‍यक आहे. यासह सरकारने समाजमाध्‍यमांना ‘सेन्‍सॉर’च्‍या (परीक्षण मंडळाच्‍या) कक्षेत आणणे किती आवश्‍यक आहे, हे अशा उदाहरणातून जाणवते. हेच व्हिडिओ आज सगळ्या वयातील मुले-मुली पहात आहेत आणि त्यात उच्चारलेल्या शब्दांचे अर्थ विचारत आहेत. हे असे बोलणे, म्हणजेच विनोद आणि मनोरंजन असा त्यांचा समज झाला अन् त्‌यांनीही असेच बोलणे चालू केले, तर त्याला कारणीभूत केवळ हे परीक्षक नसतील, तर या अनैतिकतेला मूक संमती देणारे आपण सगळे असू. म्हणून जिथे जिथे या परीक्षकांचे कार्यक्रम असतील किंवा जिथे यांना पाहुणे म्हणून बोलावले जाईल, तेथील आयोजकांना जाब विचारणे आणि ‘ते चुकले आहेत’, याची त्यांना स्पष्टपणे जाणीव करू देणे, हे आपल्या सर्‍वांचे सामायिक दायित्व आहे.

४. संहितेमधील जीवन हे वरवरचे !

‘रील लाईफ’ (छोट्या व्‍हिडिओजमधील जीवन) आणि ‘रियल लाईफ’ (प्रत्‍यक्ष जीवन) यांमधील अंतर आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे. ‘रील लाईफ’ हे संहितेमधील असते. ते प्रत्‍यक्षात पडद्यावर येण्‍यासाठी ‘मेकअप’, प्रकाशयोजना, ध्‍वनी, कथा, पटकथा, संवाद यांच्‍या मुलाम्‍याचे थर असतात. म्‍हणून ते वास्‍तविक आणि आदर्श असेलच, असे नाही. नाही तर पडद्यावर अध्‍यात्‍मावर एवढी गहन चर्चा करणार्‍या रणवीरच्‍या डोक्‍यात एवढी घाण भरलेली नसती. त्‍यामुळे पडद्यावरील कामगिरीच्‍या जोरावर कुणालाच पारखण्‍याची चूक करू नये.

५. सनातन धर्मपालनाची आवश्‍यकता !

आज आपण १४४ वर्षांनी आलेल्‍या महाकुंभाचा आनंद घेत आहोत. केवळ आपण भारतीयच नव्‍हे, तर सगळे जग महाकुंभाची अनुभूती घेत आहे आणि या कुंभपर्वाचे आध्‍यात्मिक लाभ सर्व जगाला होत आहेत. पृथ्‍वीवरच्‍या सर्व प्रकारच्‍या समस्‍यांवरील उत्तरे ही सनातन हिंदु धर्मपालनात आहेत, याची जाणीव सार्‍या जगाला होत आहे आणि याच आशेने जग आपल्याकडे आता पहात आहे. हिंदु राष्ट्‍रासाठी आवश्यक घडी बसवण्यासाठी हे कुंभपर्व आणि त्यातील संत समागम मोलाची भूमिका बजावणार आहे, अशा अतीमहत्त्वपूर्ण काळात आपण सध्या आहोत. त्यामुळे असे अनेक परीक्षक येतील आणि त्यांच्यातील दुर्गुणांमुळे बाजूला पडतील; पण ते प्रकाशझोतात असतांना त्यांनी सांगितलेली सूत्रे किंवा त्यांचे वर्तन यांना आदर्श मानून त्यांच्या मागे वहावत जाता कामा नये. सदैव शाश्वत अशा सनातन हिंदु धर्माची साथ अनादि काळापासून आपल्यासमवेत आहे, याची जाण आपण सर्वांनी ठेवून आपल्याकडून प्रत्येक वेळी धर्मपालन कसे होईल आणि जीवन सुसह्य कसे होईल, याची काळजी घेणे आवश्यक आहे.

– श्री. अनिकेत शेटे, चिंचवड, जिल्‍हा पुणे. (१०.२.२०२५)